संघनायकांची अशी वेगळी शाळा असते का? म्हणजे कुठल्याही सांघिक खेळातल्या मुख्य क्षमतेची शिकवणी देणारे असंख्य वर्ग, शाळा, महाविद्यालये सगळ्यांना ठाऊक आहेत. मात्र संघनायकीची प्रचलित शाळा शोधून सापडणे अवघड आहे. संघनायक हा जन्मावा लागतो असं क्रिकेटचा इतिहास सांगतो. मग संघातला प्रमुख क्षमता सगळ्यात जास्त असलेला खेळाडू चांगला संघनायक होऊ शकतो का? वादाचा मुद्दा आहे. इतिहासाच्या पानांवर वेगळ्याच नोंदी आहेत. माईक ब्रियरली तर उघड उघड बंड पुकारेल या वाक्याच्या निषेधार्थ. क्रिकेटमध्ये कर्णधाराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. माईक ब्रियरली, बराचसा ली जर्मोन, थोडाफार ग्रॅहम स्मिथ यांसारखी अपवादात्मक उदाहरणे सोडली तर आतापर्यंत संघातला ज्येष्ठ खेळाडू, ज्याची जागा संघात पक्की आहे असा खेळाडू कर्णधार होण्याची जास्त परंपरा आहे. मग खरं काय? मी फार लांब जाणार नाही पण माझ्या लहानपणापासून जेवढे क्रिकेट पाहिले, जेवढे कर्णधार बघितले त्यातून मला त्यांच्या वेगवेगळ्या आभासी शाळा जाणवल्या. त्या शाळांचा आणि विद्यार्थ्यांचा लेखाजोखा बघू या.
सुरुवात माझ्या आवडत्या अर्जुना रणतुंगापासून. अर्जुनाची कौटुंबिक पार्श्वभूमी राजकीय असल्याने कदाचित त्याचे कर्णधार होणे नैसर्गिक असावे. मात्र त्या वारशाबरोबर कर्णधार म्हणून त्याने पचवलेले अपमान, पराजय ह्यांनी त्याला कणखर कर्णधार केले हे निश्चित. रणतुंगाच्या कर्णधारपदाची शाळा ही धूर्त, डावपेच शिकवणारी, सहकाऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं शिकवणारी, मैदानात आणि मैदानाबाहेर दोन्हीकडे कर्णधाराचा कस पाहणारी. आपल्या संघाचे कच्चे आणि पक्के दुवे माहिती असणे, ते मान्य करून आखणी करणे, मैदानाबाहेर पक्के दुवे कच्चे करण्याचे प्रतिस्पर्ध्याचे प्रयत्न हाणून पाडणे या सगळ्यासाठी जबरदस्त नेतृत्व गुण लागतात. माझ्या मते अर्जुना ह्या सगळ्यात जास्त तरबेज असलेला कर्णधार होता. अॅलन बॉर्डर हा ह्या शाळेचा अजून एक हुशार विद्यार्थी. तळात गेलेला संघ आपल्या नेतृत्वगुणांनी वर काढणे हे ह्या शाळेचे ब्रीदवाक्य. मात्र बॉर्डर ज्या देशाचे प्रतिनिधित्व करतो तिथली माती क्रिकेटसाठी सुपीक आहे त्यामुळे अर्जुनाइतके सोसणे सुदैवाने त्याच्या नशिबात नव्हते. डावपेचांबाबत बोलायचे झाले तर १९९६चा वर्ल्ड कप अर्जुनाने त्याच्या मनात आधीच जिंकला होता. जयसूर्या, कालूने दिल्लीत भारताविरुद्ध जो धिंगाणा घातला त्यावरून पंधरा ओव्हर्समध्ये श्रीलंका काय करू शकते याकडे चाणाक्ष कर्णधारांचे लक्ष असणारच हे अर्जुना जाणून होता. त्याने तिसऱ्या क्रमांकावर असांका गुरुसिंघे आणि चौथ्यावर अरविंदा, पाचव्यावर कधी महानामा कधी स्वतः अशी अभेद्य रचना केली. एवढे करून जर सगळे पडले तर हसन तिलकरत्ने खालच्या धर्मसेना आणि वासला घेऊन किल्ला लढवेलच. उपखंडातल्या विश्वचषकात फिरकीसाठी मुरली हा हुकमी एक्का आहे, त्यामुळे धर्मसेना आणि वासच्या जोडीला सुरुवातीला धावा रोखणारा सजीवा डिसिल्वा अशा जोड्या त्याने तयार केल्या. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्याने madmax अरविंदाचा मॅच विनर अरविंदा केला. कलकत्त्यात अरविंदा त्याच्या आयुष्यातील एक संस्मरणीय खेळी खेळून गेला पण अर्जुनाने जाणले होते की अंतिम सामन्यात गाठ त्याच्याच शाळेच्या मार्क टेलरशी आहे. मार्क टेलर हा माझ्या मते स्टीव्ह वाॅपेक्षा गुणवान कर्णधार होता. पुण्यात केनियाकडून अपमान झाल्यावर वेस्ट इंडीजने फिनिक्स बाणा दाखवत उपांत्य फेरी गाठली होती. १५/४ वरून स्टुअर्ट लाॅ आणि बेवन ऑस्ट्रेलियाला २०७पर्यंत घेऊन गेले. चंदरपॉल आणि लाराने सामना हातात आणून दिला होता. टेलरने लारा आणि चंदरपॉलसाठी लावलेले सापळे यशस्वी ठरल्यावर त्याच्या एक्क्याने एकहाती सामना फिरवला. वेस्ट इंडीज अंतिम फेरीत आले असते तर कदाचित अर्जुनाला अजून डोके वापरावे लागले असते कारण रिची रिचर्डसन आणि ब्रायन लारा पुण्यातल्या अपमानाने पेटून उठले होते. धूर्त टेलर विरुद्ध चाणाक्ष अर्जुना यांच्या झुंजीत अरविंदाने अप्रतिम शतकी खेळी केली. लक्ष्याचा पाठलाग पूर्ण होईपर्यंत अर्जुना स्वतः अरविंदाबरोबर होता, मग अर्जुनाच्या हातात विश्वकप येणे अटळ होते. टेलर आणि रणतुंगा हे दोघेही धूर्त कर्णधार.
धूर्त, चाणाक्ष, आत्मविश्वासाने ठासून भरलेला असा या गटातला पुढचा कर्णधार हॅन्सी क्रोनिए. मला कधी कधी प्रश्न पडतो की या माणसाला काय गरज होती त्या दुष्टचक्रात पडण्याची. त्याने मनात आणले असते तर तो द. आफ्रिकेचा पंतप्रधान झाला असता इतका प्रभावशाली कर्णधार, व्यक्ती होता हॅन्सी क्रोनिए. सचिन तेंडुलकर ज्या गोलंदाजांना वचकून खेळायचा त्यातला एक होता क्रोनिए. सचिनला त्याने बऱ्याच वेळा अडचणीत टाकणारे चेंडू टाकले आहेत. आफ्रिकेच्या पुनरागमनानंतर क्रोनिएने जुन्या -नव्यांना घेऊन संघबांधणी केली आणि आफ्रिकेच्या संघाला फार वर नेले. क्रोनिएचा त्या सगळ्या प्रकरणातला समावेश ही क्रिकेटमधली अत्यंत दुर्दैवी घटना आहे. अन्यथा आज त्याच्या कर्णधारपदाचे गोडवे नक्कीच गेले असते. या यादीत अजून एक नाव घालायचे असेल तर मी मार्टिन क्रोचे घालेन. ९२चा विश्वकप हा क्रोच्या कल्पनांचा विश्वकप म्हणावा लागेल. छोटी मैदाने, ३० यार्ड सर्कल, मार्क ग्रेटबॅचची डावखुरी फलंदाजी आणि दीपक पटेलचा नव्या चेंडूवरचा ऑफस्पिन यावर बरेच जण फसले आणि न्यूझीलंड उपांत्य सामन्यात धडकली.
१९९२च्या अंतिम सामन्याचा दरवाजा न्यूझीलंडसाठी उघडत असताना शेवटच्या क्षणी धाडकन बंद झाला एका कर्णधारामुळेच. इम्रान खान हा स्वतः पुढे राहून आक्रमक धोरण शिकवणाऱ्या शाळेचा विद्यार्थी. प्रतिस्पर्ध्याच्या किनाऱ्यावर पाऊल टाकल्यावर आपल्या जहाजाचे दोर कापून टाकणे हा इम्रानच्या शाळेत शिकवला जाणारा पहिला धडा. कपिल देव, सौरव गांगुली, ब्रेंडन मॅकलम आणि थोडाफार विराट कोहली ही नावे ह्या शाळेच्या हजेरी पुस्तकात सापडतील. इम्रानने निवड समितीला न जुमानता इंझमाम नावाच्या एका वादळाला थेट गल्लीतून पाकिस्तानच्या संघात आणले होते. ते वादळ उपांत्य सामन्यात घोंघावलं आणि क्रोची स्वप्नं उद्ध्वस्त झाली. इम्रानने स्वतःच्या प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाने क्रिकेटच्या सगळ्यात सृजनशील कर्णधाराचा पराभव केला. हव्या त्या खेळाडूच्या मागे उभे राहणे, अडचणीच्या वेळी स्वतः पुढे येऊन संघाला विजयी करणे, वेळ पडल्यास प्रचलित पद्धती मोडून गुणवत्तेची पारख स्वतः करणे हे इम्रान, कपिल, सौरव ची शाळा शिकवते.
कपिल ने १९८३ च्या विश्वचषकात टर्नब्रिज वेल्सच्या त्या एका खेळीने आपण कुठूनही जिंकू शकतो हे दाखवून दिले. तीच गोष्ट १९९९ला वाॅने केली. मात्र स्टीव्ह वाॅला माझ्या मते नेहमीच चांगला संघ मिळाला त्यामुळे मला तो थोडा सुदैवी कर्णधार वाटतो. मात्र अडचणीच्या वेळी संघाला खड्ड्यातून बाहेर काढणे वाॅने जितक्या वेळेला केलंय तितक्या वेळा कुणीही केलं नसेल. मॅकलम हा तसा फार मोठा फलंदाज नव्हता पण कर्णधार असताना त्याने न्यूझीलंडला जिंकायला शिकवलं ते त्याच्या आक्रमक स्वभावामुळे आणि सहकाऱ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करण्याच्या विलक्षण हातोटीमुळे. सौरव गांगुलीने मैदानाबाहेरही कर्णधाराला बरीच मेहनत करावी लागते हे दाखवून दिले. २००३च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सौरवने कर्णधार म्हणून केलेली तयारी हा अभ्यासाचा विषय होऊ शकेल. ऑस्ट्रेलियात जायचे तर जिंकायलाच, मग तिथली मैदाने कशी आहेत हे बघण्यासाठी तो एक महिना आधीच तिथे पोचला. त्यानंतर हेडन, लँगर चारच्या धावगतीने धावा काढतात तशा आपल्याकडे कोण करू शकेल याचा विचार करता करता त्याला सेहवाग सापडला. ब्रिस्बेनला भारत अडचणीत असताना सौरवने शानदार शतक झळकवत ऑस्ट्रेलियाला आम्ही आलोयची वर्दी दिली. कुंबळेच्या निवडीसाठी त्याने हट्ट धरला आणि कुंबळेने सिडनीत पोत्याने विकेट्स काढल्या. झहीर, हरभजन, युवराज आणि वीरू ह्यांच्यामागे तो खंबीरपणे उभा राहिला.
महेंद्रसिह पानसिंग धोनीने संघनायकांची एक वेगळी शाळा बांधली. ह्याचा बराचसा अभ्यासक्रम हा रणतुंगा आणि मार्क टेलरच्या शाळेशी संलग्न असणारा. एन्ड गेमचा प्रभावी वापर हे नवीन प्रकरण धोनीने ह्या अभ्यासक्रमात टाकले. मात्र हे फक्त पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटपुरतेच मर्यादित आहे. मर्यादित षटकातील क्रिकेटच्या मर्यादा ह्याच्याइतक्या कुणी ओळखल्या नसतील. आधी ५० षटके, मग २० षटके यांचा पट त्याने अनेक वेळा आपल्या तल्लख मेंदूत मांडला. त्यात बुद्धिबळाच्या चाली रचल्या. शत्रूच्या एका चालीसाठी ह्याने ३ प्लॅन्स तयार केले त्यातल्या तिसऱ्या चालीचा पत्ता कोणालाच नसायचा. जवळजवळ एक दशक तो हा बुद्धिबळाचा खेळ यशस्वी करत राहिला. यष्टींच्या पाठीमागे सतत वास्तव्य असल्यामुळे त्याने फिरकी गोलंदाजांना दिशा देण्याचे अजून एक महत्त्वाचे योगदान दिले. ह्याचा प्रभाव इतका होता की तो मागे नसेल तर फिरकी गोलंदाज अस्वस्थ व्हायला लागले. त्याच्या घरी बर्फाची फॅक्टरी असावी. प्रत्येक सामन्यात बर्फाची एक लादी हा डोक्यावर घेऊन खेळला. विजयाचा उन्माद नाही की पराभवात ऊर बडवणे नाही. विजय, पराजय हा खेळाचा भाग आहे आणि दोन्हीही तितक्याच साधेपणाने स्वीकारले पाहिजेत, हा धडा त्याच्या शाळेने शिकवला. निकालाचा विचार न करता ज्यावर नियंत्रण आहे त्यांवर नियंत्रण ठेवण्यावर भर देणे, हादेखील धोनीच्या शाळेच्या पुस्तकातला महत्त्वाचा धडा. एकदा योजना ठरवली की ती अमलात आणायची. सामना शेवटच्या षटकात गेला आणि तुम्ही गोलंदाज आहात तर जिथे चेंडू टाकायचे ठरले आहे तिथेच तो टाकण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे अर्धी जबाबदारी पूर्ण होते. हा साधासुधा विचार. भलेभले दडपणाखाली कोसळतात पण धोनीने अनेक वेळा सामान्य गोलंदाजांकडून यशस्वी कामगिरी करून घेतलीय ती ह्याच साध्या विचाराने.
विराट कोहली हा थोडाफार इम्रान, सौरवच्या शाळेचा विद्यार्थी आहे. मात्र मैदानावरची त्याची आक्रमकता ही कदाचित एकमेवाद्वितीय असावी. वैयक्तिक आयुष्यात एकदा आरशात पाहिल्यावर त्याला फिटनेसचे महत्त्व समजले. तिथून पुढे विराट कोहली अंतर्बाह्य बदलला आणि खेळाडू म्हणून एका वेगळ्या उंचीवर पोहोचला. ह्याच अनुभवाचा आधार घेत कर्णधार झाल्यावर त्याने फिटनेसचा मंत्र सगळ्या टीमला म्हणायला लावला आणि यो-यो चाचणीसारख्या कस पाहणाऱ्या चाचण्या त्याने सर्व खेळाडूंना उत्तीर्ण व्हायला लावल्या. भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षणाच्या दर्जात आमूलाग्र बदल घडवण्याचे बरेचसे श्रेय विराटच्या या आग्रहाला जाते. सौरवने जसा फलंदाजी करताना धावगती वाढवण्याचा चंग बांधला तसा विराटने वेगवान गोलंदाजांना भक्कम पाठिंबा दिला. भारताच्या कसोटीतल्या परदेशी विजयाचा पाया ह्याच वेगवान गोलंदाजांनी पोत्याने घेतलेल्या बळींनी रचला ज्याचे बरेच श्रेय विराटला द्यायला हवे. पण जसा धोनी हा फक्त पांढऱ्या क्रिकेटचा राजा आहे तसा विराट हा कदाचित फक्त कसोटी क्रिकेटमधला यशस्वी कर्णधार आहे. त्याचा आक्रमकपणा त्याला जिथे शांत राहण्याची गरज असते तिथे मदत करत नाही म्हणून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधली अनिश्चितता जशी धोनी नियंत्रित करतो तशी कोहलीला करता येत नाही, हे कटू असले तरी सत्य आहे. कोहलीच्या नेतृत्वातील अजून एक महत्त्वाचा साईड इफेक्ट म्हणजे तो कायम अत्त्युच्च शिखरावर चढायची तयारी करतो. इतर सहकारी कदाचित छोट्या टेकड्याच मनात ठेवत असतात. त्यामुळे कोहलीच्या बरोबर धावताना इतरांना धाप लागते किंवा त्याची भीती वाटते. हीच गोष्ट सचिन यशस्वी कर्णधार न होण्यामागे असू शकेल. सगळ्या सहकाऱ्यांना त्यांच्या पातळीवर येऊन बरोबर घेऊन जायचा धडा शिकणेही संघनायकाला आवश्यक आहे. कोहली आणि सचिनसारखे कर्णधार सगळ्यांना स्वतःच्या मागे यायला लावतात आणि मग जरा गडबड होते.
कर्णधार म्हणून काहीच कौशल्ये न दाखवताही यशस्वी असा शिक्का बसलेले कोणी आहे का? पटकन एकच नाव समोर येते, ते म्हणजे मोहम्मद अझहरुद्दीन. १९९८ला अझहरने १०पैकी ७ चषक उचलले आणि त्या सातही चषकांत सचिनने धावांचा रतीब ओतला. अझहर फलंदाज म्हणून आणि क्षेत्ररक्षक म्हणून खूप वरच्या दर्जाच्या खेळाडू होता पण कर्णधार म्हणून त्याचा विशेष प्रभाव कधी जाणवला नाही. त्याच्या बहराच्या काळात स्वतः दिलेले फलंदाजीचे योगदान सोडले आणि स्लिपमधले ते अविस्मरणीय झेल सोडले तर अजून काही उल्लेखनीय स्मरत नाही.
केवळ उत्तम नेतृत्वगुण हे कौशल्य तुम्हाला देशाचा कर्णधार करू शकते का? माईक ब्रियरली ‘हो’ म्हणेल. “द आर्ट ऑफ कॅप्टन्सी” या त्याच्या पुस्तकात तो याच गोष्टीचा सविस्तर ऊहापोह करतो. इंग्लंडमधल्या कौंटी क्रिकेटच्या रचनात्मक चौकटीत कर्णधाराचे अनन्यसाधारण महत्त्व तो विशद करतो. बॉब विलिसला एका ठरावीक एन्डकडून गोलंदाजी करायची होती पण त्या वेळी ते कॅप्टन म्हणून त्याला योग्य वाटले नाही मग त्याने तोच एन्ड चालू ठेवला आणि थोड्या वेळाने विलिसला लय आणि विकेट्स दोन्ही मिळाल्या. संघ निवडताना कनिष्ठ खेळाडू, ज्येष्ठ खेळाडू यांचे मिश्रण कसे असावे, कनिष्ठ खेळाडूंना पुढच्या मोसमात तयार करण्यासाठी नेमके काय करायला हवे, संघातील सर्व खेळाडूंची आर्थिक गरज क्लब कशी भागवतो आहे, अशा बारीकसारीक मुद्द्यांचा विचार माईकला महत्त्वाचा वाटतो. परिपूर्ण कर्णधार म्हणून इतिहासात ज्याची नोंद अग्रक्रमाने आहे असा माईक ब्रियरली, वेळप्रसंगी संघातल्या प्रमुख खेळाडूने ऐन वेळी बाहेरच्या तज्ज्ञाचे ऐकून आपल्या तंत्रात बदल करू नये, असेही मत आपल्या पुस्तकात आग्रहाने मांडतो. इयान बोथमसारखा हिरा अपयशी ठरणे आणि ब्रियरलीकडे पुन्हा इंग्लंडचे कर्णधारपद येणे ही ८०च्या दशकातली एक महत्त्वाची घटना ठरली ती ब्रियरलीच्या याच असाधारण कौशल्यामुळे. मानसशास्त्राचा अभ्यासक असणारा हा विरळा कर्णधार आजच्या T20 च्या काळातही संघनायकांच्या मूलभूत कौशल्यासाठी अभ्यासाचा विषय ठरू शकेल. ली जर्मोनची कर्णधार पदावरची निवड ही न्यूझीलंड क्रिकेटच्या हितासाठी केलेली योजना होती. कँटरबरीचा यशस्वी कर्णधार एवढाच शिक्का त्याला न्यूझीलंडच्या राष्ट्रीय संघाचे कर्णधारपद देऊन गेला. १९९६ विश्वचषकात त्याने चांगली फलंदाजीही केली. ब्रियरली आणि जर्मोन ह्या दोघांतले आणखी एक साम्य म्हणजे ते दोघेही यष्टिरक्षक होते. ह्या दोघांपेक्षा फलंदाज म्हणून अधिक गुणवान असणारा पण संघात इतर ज्येष्ठ खेळाडू असतानाही तरुणपणी कर्णधारपदाची माळ गळ्यात घालणारा एक यशस्वी कर्णधार म्हणजे द. आफ्रिकेचा ग्रॅहम स्मिथ. स्मिथने समकालीन खेळाडूंबरोबर ज्येष्ठांना योग्य तऱ्हेने हाताळले.
आक्रमकपणा, धूर्तपणा, राजकारणी असणे, हुकूमशाही स्वभाव असणे, मैदानावर प्रचंड ऊर्जेने वावर करणे, मैदानाबाहेर माध्यमात जोरदार पोपटपंची करणे अशी नेतृत्वाची वेगवेगळी कौशल्ये असणारी अनेक उदाहरणे आपण पाहिली. एक विद्यालय असेही आहे की ज्यात शिकलेले कर्णधार विलक्षण सज्जन खेळाडू आहेत. ते हरू नयेत असं त्यांच्या प्रतिस्पर्ध्यालाही वाटावे इतके सज्जन. काही नावे अग्रक्रमाने समोर येतात. पहिला केन विल्यमसन आणि दुसरा आपला अजिंक्य रहाणे. २०१९च्या उपांत्य फेरीत भारताला हरवल्यावर विल्यमसनने एक प्रेमळ आवाहन केले, ज्यात तो म्हणाला, “क्रिकेटवर सर्वात जास्त प्रेम करणाऱ्या भारतीयांनो, अंतिम सामन्यात माझ्या संघाला प्रोत्साहन द्या.” अंतिम सामन्यात न्यूझीलंड जिंकावे म्हणून अनेक कोटी भारतीयांनी देव पाण्यात ठेवले. अंतिम सामना ज्या पद्धतीने संपला तिथे दुसऱ्या कुठल्याही कर्णधाराची कल्पना करा, तुम्हाला वेगळाच चेहरा दिसला असता. केन मात्र तेच स्मितहास्य करत, “मी जिंकलोही नाही आणि हरलोही नाही, कमाल आहे!“ असं म्हणत होता. टीव्हीला चिकटलेले तमाम भारतीयच काय, जगभरातील सारेच क्रिकेटप्रेमी (ज्यात कदाचित थोडे इंग्रजही असतील) त्या दिवशी हळहळले. ३६वर ऑल आऊट झाल्यावर त्याने सूत्रे हातात घेतली तेव्हापासून ते टाळ्यांच्या कडकडाटात त्याच्या लेकीला कडेवर घेऊन त्याच्या सोसायटीतील भव्य स्वागत स्वीकारतानाही तो एखाद्या सज्जन माणसासारखा स्मितहास्य करत होता. अफगाणिस्तान भारताबरोबर पहिला कसोटी खेळला आणि हरला. जल्लोष चालू असताना याने अफगाणिस्तानच्या कर्णधारालाही फोटोत येण्यासाठी बोलावले. अजिंक्य रहाणे हा विल्यमसनच्या वर्गात असावा कदाचित. तिसरा विल्यमसनच्याच देशाचा स्टीफन फ्लेमिंग. अनेक वर्ष न्यूझीलंड क्रिकेटची धुरा सांभाळून कांगारूंना काँटे की टक्कर देणारा फ्लेमिंग हा असाच सज्जन कर्णधार. ह्यांच्या शाळेचा अजून एक विद्यार्थी आहे ज्याचे नाव घेतले नाही तर हा लेख पूर्ण होणार नाही.
पाकिस्तानसारख्या देशाचे कर्णधारपद म्हणजे काटेरी मुकुट. तिथे इम्रानसारखा आक्रमक कर्णधारच यशस्वी होऊ शकतो हा समज खोटा ठरवला इंझमाम उल हक या सज्जन खेळाडूने. अनेक वर्षं केवळ आपल्या बॅटने सगळ्या प्रश्नांना उत्तर देत, आपल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेत, शांत राहून इंझीने पाकिस्तानकडून चांगली कामगिरी करून घेतली. ह्या मंडळींचा प्रमुख भर हा अभ्यासावर, स्वतःच्या योगदानावर, खेळाडूंना विश्वासात घेऊन त्यांना सतत प्रोत्साहित करण्यावर, मैदानावर शांत राहून, कोणावरही न ओरडता प्रतिस्पर्ध्यावर दडपण कसे ठेवता येईल याकडे राहिला आहे. हे युद्ध नव्हे तर हा खेळ आहे. कोणीतरी हरतो म्हणून कोणीतरी जिंकतो असा मानवतावादी विचार कायम ठेवणारी यांची शाळा आहे. मात्र आपल्या जबाबदारीची पूर्ण जाणीव ठेवून, शंभर टक्के खेळावर फोकस करणे ते विसरत नाहीत. “क्रिकेट हा सभ्य माणसांचा खेळ आहे,” ह्याचा पुरावा प्रत्येक पिढीत टिकून राहावा म्हणून कोणीतरी ह्या शाळेत प्रवेश घेतोच. ह्या प्रकारच्या कर्णधारांनाही यश वश होतं, हे सिद्ध झालंय त्यामुळे आता अभ्यासक्रमात तेच जुने धडे न देता हा नवीन धडाही शिकवायला हरकत नाही. त्यामुळे क्रिकेट समृद्ध व्हायला ह्या शाळेची नक्की मदत होईल.
– सांबप्रसाद कुवळेकर