युवा खेळाडूंपुढे ‘कॅरेबियन’ आव्हान
२०२३-२०२५ या दोन वर्षांसाठीच्या टेस्ट चॅम्पियनशीपची आता सुरुवात झाली आहे. एकीकडे इंग्लंड-ऑस्ट्रेलिया मधील ऍशेस मालिकेला सुरुवात झाली, तर दुसरीकडे वेस्ट इंडिज आणि भारत या दोन संघांमधील मालिकेचे बिगुल देखील वाजले. पुढच्या महिन्यात भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ३ कसोटी, ३ एकदिवसीय आणि ५ टी-२० सामने खेळेल. याच दौऱ्यातील कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. प्रत्येक नवीन दौऱ्यासाठी संघाची घोषणा होत असताना एक वेगळीच उत्सुकता असते. पण हा दौरा काही अर्थाने खास असणार आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आपण दारुण पराभव स्वीकारला होता, आपले बहुतेक सर्वच रथी महारथी तलवारी म्यान करून तंबूत परतले. आपण सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला असला तरी, दोन्ही वेळा आपण पराभव स्वीकारला. प्रश्न पराभवाचा नक्कीच नाही, पण गेल्या १० वर्षात अनेकदा संधी मिळून देखील आपला संघ एकही आयसीसी स्पर्धा जिंकू शकला नाहीये, ती जखम जास्त बोचते. याच पार्श्वभूमीवर या दौऱ्यावर जाणारा भारतीय संघ, खास करून कसोटी संघ कसा असेल याकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष होते.
या दौऱ्यासाठी कसोटी संघ निवडताना निवड समितीने ३ नवीन खेळाडूंना संघात स्थान दिले. यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड आणि मुकेश कुमार कसोटी संघाचा भाग असतील. या तीनही खेळाडूंनी गेल्या काही हंगामात घरगुती क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याचेच फळ त्यांना मिळाले आहे असे नक्की म्हणता येईल. मुख्य म्हणजे हे तीनही तरुण खेळाडू चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. त्यांना योग्यवेळी संधी मिळणे आवश्यक होते, आणि ही मिळालेली संधी त्यांना बरंच काही देऊन जाईल हे नक्की. वेस्टइंडीजचा दौरा त्यांच्यासाठी सोपा नक्की नसेल. वेस्टइंडीजचा संघ आता पूर्वीसारखा राहिला नाहीये, त्यांचे टी-२० क्रिकेटकडे जास्त लक्ष आहे वगैरे गोष्टी कितीही बरोबर असल्या तरी देखील वेस्टइंडीज मध्ये कसोटी पदार्पण करणे नक्कीच सोपे नसेल. अंतिम ११ मध्ये संधी मिळाल्यास या तीनही खेळाडूंना चांगली कामगिरी करून दाखवणे महत्वाचे असेल. त्याचबरोबर हे देखील लक्षात घेतले पाहिजे की एखाद्या खेळाडूने भारतात पदार्पण करून पहिल्याच कसोटीत शतक ठोकणे आणि वेस्टइंडीज सारख्या – भिन्न खेळपट्टी आणि हवामान असलेल्या – प्रदेशात पदार्पण करून ५०-६० धावा करणे यामध्ये देखील फरक आहे. कदाचित हे खेळाडू पहिल्या दौऱ्यात चुकतीलही, पण त्यांना योग्य तो आधार देऊन, साथ देऊन चांगल्या संधी देणे आवश्यक आहे.
यशस्वी आणि ऋतुराजच्या निवडीवरून समाज माध्यमांत चांगलीच उहापोह झाली. या दोन खेळाडूंची निवड झाली, पण सर्फराज खानला मात्र भारतीय संघात स्थान मिळत नाही यावरून चांगलेच वाद रंगले. अनेक माजी खेळाडूंनी देखील निवड समितीवर टीका केली. सर्फराझची निवड झाली नाही हे एका अर्थाने चुकीचेच आहे, पण त्याची तुलना यशस्वी आणि ऋतुराज बरोबर होणे खचितच अयोग्य आहे. मुळात सर्फराझची निवड मागच्याच वर्षी व्हायला हवी होती. त्याने गेली २-३ वर्षे रणजी स्पर्धेत खोऱ्याने धावा केल्या आहेत हे देखील खरे. पण अजूनही त्याच्यासाठी संघाचे दरवाजे उघडले जात नाहीत. त्याचबरोबर प्रियांक पांचाळ आणि अभिमन्यू ईश्वरन यांना देखील डावलले गेल्याची थोडीफार भावना आहे. पण राष्ट्रीय संघात एकावेळी १५-१७ खेळाडूच खेळू शकू शकतात, त्यामुळे अनेक गुणवान खेळाडूंना संघाबाहेर राहावे लागते. अर्थात ही ओरड भारतीय क्रिकेटची सुरुवात झाल्यापासून आहे, आणि अनेक खेळाडूंना भारतीय संघात स्थान न मिळाल्याचे आपण वेळोवेळी बघत असतो.
हा संघ निवडतानाच चेतेश्वर पुजारा आणि उमेश यादव या दोघांनाही वगळले गेले. उमेश कदाचित आपल्याला परत भारतीय संघात दिसणार नाही, पण पुजाराचे काय? पुजाराने (अजिंक्य प्रमाणे) आता दुलीप, रणजी स्पर्धेत चांगली कामगिरी करून परत संघात येण्याचे लक्ष ठेवले पाहिजे. अर्थात यावेळी त्याची स्पर्धा तरुण रक्ताशी असेल.गेल्या काही सामन्यात पुजाऱ्याने अपेक्षित कामगिरी केली नाहीये, त्यामुळे त्याचे संघाबाहेर जाणे क्रमप्राप्त होते. पण तितकीच वाईट कामगिरी रोहित आणि विराटची देखील आहे. त्या दोघांनीही मोक्याच्या क्षणी संधी घालवल्या आहेत. रोहितच्या कर्णधारपदावर प्रश्न निर्माण व्हावे अशी परिस्थिती अनेकदा निर्माण झाली आहे. आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून काम करणे आणि भारतीय संघाचा कर्णधार असणे या दोन सर्वस्वी भिन्न गोष्टी आहेत. विराट देखील त्याच्या कर्तुत्वाला साजेसा खेळ करू शकत नाहीये. अशावेळी संघातून बाहेर जाण्याची कुऱ्हाड फक्त पुजारावर कोसळावी? पुढील दोन वर्षात कोणकोणते खेळाडू भारतीय संघासाठी कसोटी खेळून आपल्याला विजय मिळवून देऊ शकतील याचा निश्चितच विचार व्हायला हवा आहे. कोणाच्याही स्टार दर्जावरून त्याचे संघातील स्थान अबाधित असणे चुकीचेच आहे. अर्थात भारतीय क्रिकेटमध्ये ही गोष्ट काही नवीन नाही हे देखील खरे.
असो. हा वेस्टइंडीज दौरा अनेक अर्थांनी महत्वाचा असेल. यशस्वी आणि ऋतुराज सारख्या फलंदाजांना आपले नाणे खणखणीत वाजवण्याची संधी आहे, तर विराट आणि रोहित सारखे दिग्गज कशी कामगिरी करतात याकडे देखील लक्ष असेल. संघात ईशान किशन आणि शुभमन गील सारखे तरुण खेळाडू देखील आहेत. एकूणच भविष्याच्या दृष्टीने भारतीय संघाची बांधणी सुरु करण्याची वेळ आली आहे. पुढील वर्षभरात आपल्याला अनेक कसोटी सामने – घरच्या मैदानावर आणि बाहेर देखील खेळायचे आहेत. या सर्वच खेळाडूंनी समर्थपणे भारतीय संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेण्याची वेळ आली आहे.