ball

एक होता वेस्टइंडीज 

by कौस्तुभ चाटे

वेस्टइंडीजचा संघ २०२३ च्या विश्वचषकात दिसणार नाही. ही गोष्ट किती त्रास देणारी आहे याची कल्पना तरी करू शकतो का आपण. १९३०-३२ पासून सुरु झालेला वेस्टइंडीज क्रिकेटचा प्रवास आपण सगळेच बघतो आहोत. मुळात वेस्टइंडीज हा एक देश नाही. कॅरेबियन द्वीपसमूहात वसलेल्या अनेक देश आंतरराष्ट्रीय क्रिकेटपुरते ‘वेस्टइंडीज’ या नावाने एकत्र येतात. या खेळाडूंनी आपल्याला खूप काही दिलं आहे. जुन्या काळातील  हेडली, वॉरेल, विक्स, वॉलकॉट, रामाधीन, व्हॅलेंटाईन पासून आत्ताच्या लारा, चंदरपॉल किंवा ख्रिस गेल पर्यंत अनेक वेस्टइंडीज क्रिकेटपटू आमच्या गळ्यातले ताईत होते. १९७५-१९९० या काळातले खेळाडू – लॉइड, रिचर्ड्स, हॅन्स, ग्रिनीज, दुजाँ, मार्शल, होल्डिंग, गार्नर, रॉबर्ट्स यांनी तर आमचं बालपण समृद्ध केलं. ते ना आमच्या देशाचे होते, ना आमच्या रक्ताचे… पण त्यांचं क्रिकेट खेळणं आमच्यासाठी सूख होतं. आम्ही त्यांना बघत बघत शिकत गेलो. सोबर्स सारखा खेळाडू तर शतकात एखादा यावा. या सगळ्यांच्या खेळाने नटलेला तो वेस्टइंडीज नावाचा संघ २०२३ च्या विश्वचषकात दिसणार नाही ही खरोखर वेदनादायक गोष्ट आहे. प्रत्येक साम्राज्याची कधी ना कधी वाताहत होते. क्रिकेटवर राज्य करणाऱ्या वेस्टइंडीजची होऊ नये अशी इच्छा होती, पण…. 


मुळात ही सगळी कॅरेबियन बेटं अमेरिकेच्या जवळ वसलेली. सर्वच बेटांमध्ये आर्थिक परिस्थिती तशी यथातथाच. पोटापाण्यासाठी माणसं अमेरिकेला जाऊ लागली, ती संस्कृती जवळ करू लागली. मग त्यांचे खेळ आले, कदाचित तेच जास्त जवळचे झाले. बास्केटबॉल, बेसबॉल, फुटबॉलच्या नादात क्रिकेटकडे दुर्लक्ष होत गेलं. गेल्या ३०-३५ वर्षातली वेस्टइंडीजची स्थिती बघता हे होणारच होतं. १९९०-२००० च्या दशकापर्यंत त्यांचं क्रिकेट जिवंत होतं, पण हळूहळू त्याचा अस्त होऊ लागलाच होता. त्यात एकीकडे क्रिकेट देखील बदलत चाललं होतं. एकूणच जग वेगवान होत होतं, मग कसोटी क्रिकेट संपू लागलं आणि आता वेस्टइंडिजचं एकदिवसीय क्रिकेट देखील बंद होईल का अशी भीती वाटू लागली आहे. वेस्टइंडीजचे क्रिकेटपटू जगभर प्रसिद्ध होते, ते त्यांच्या दिलखुलास खेळामुळे. ते पैशांसाठी इंग्लिश काउंटी, ऑस्ट्रेलियातील देशांतर्गत क्रिकेट काय किंवा दक्षिण आफ्रिकेत रेबेल टूर्स देखील खेळले, पण सगळीकडेच त्यांनी आपल्या खेळामुळे वाहवा मिळवली. तोंडात च्युईंग गम चघळत फलंदाजी करणारा व्हिव रिचर्ड्स असेल किंवा समोरच्या खेळाडूच्या नजरेत भेदकपणे बघणारा मायकल होल्डिंग, माल्कम मार्शल असतील, बहुतेक खेळाडूंनी मैदानावर आपल्या खेळाने प्रेक्षकांना खुश केलं. ही माणसं आपल्यासारखीच वागली, आपल्यासारखीच राहिली. त्यांची लफडी, त्यांची भांडणं, त्यांची माणुसकी, त्यांची दोस्ती, त्यांची खिलाडूवृत्ती संपूर्ण क्रिकेट जगताने बघितली, जगली, अनुभवली.  कदाचित म्हणूनच हे खेळाडू आपल्याला आपले वाटले. 

गेल्या काही वर्षात वेस्टइंडीज क्रिकेट अधोगतीला जायला सुरुवात झालीच होती. कोणीही यावं आणि टपली मारून जावं अशी त्यांची स्थिती झाली होती. मुळात वेस्टइंडीज विश्वचषकासाठी पात्रता फेरी खेळते आहे हीच दुर्दैवाची गोष्ट. वेस्टइंडीज २ वेळचे विश्वविजेते आहेत. १९७५ ते १९८३ पर्यंतच्या स्पर्धा त्यांनी गाजवल्या आहेत. अशावेळी हा संघ पात्रता फेरीत खेळतो हे क्रिकेटप्रेमींना न पचणारंच आहे. खेळाचे नियम बदलले आहेत. आता पात्रता फेरीला देखील तेवढंच महत्व आलं आहे, इतर देश देखील विश्वचषकात पात्र होण्यासाठी प्रयत्न करत आहेत वगैरे वगैरे गोष्टींनी आम्ही आमची समजूत करून घेतली. पण पात्रता फेरीत एकामागून एक तीन पराभव बघितल्या नंतर मात्र या संघाच्या हाराकिरीवर विश्वास बसला. होय, हाराकीरीच ती. जो संघ पात्रता फेरीत खेळताना झिम्बाब्वे, नेदरलँड्स आणि स्कॉटलंड कडून पराभव पत्करतो, त्याच्या खेळाला दुसरं काय म्हणायचं? संघाला बांधून ठेवणारा एकही खेळाडू नाही, फलंदाज आणि गोलंदाज म्हणावी तशी कामगिरी करत नाहीत, समोरच्या दुबळ्या प्रतिस्पर्ध्याला तुम्ही योग्य टक्कर देऊ शकत नाही, मग तुम्ही जिंकणार कसे? 

पात्रता फेरीत वेस्टइंडीजने झिम्बाबे कडून पराभव पत्करला. २६९ धावांचा पाठलाग करताना वेस्टइंडिज फक्त २३३ धावा करू शकले. सिकंदर रझा आणि तेंडाई चटारा यांच्या गोलंदाजीसमोर वेस्टइंडीजचे फलंदाज खेळू शकले नाहीत. पुढे साखळी सामन्यात त्यांना नेदरलँड्सने हरवले. खरे तर या सामन्यात वेस्टइंडीजने चांगली फलंदाजी केली होती. ५० षटकात ३७५ धावांचा पाठलाग करताना नेदरलँड्सचा संघ तोडीत तोड ठरला. हा सामना सुपर ओव्हर मध्ये गेल्यानंतर घडलेला थरार जगणे बघितला. लोगन फॅन डर  बीक या डच खेळाडूने वेस्टइंडीजला एकहाती पराभूत केलं. इतेच वेस्टइंडीजच्या विश्वचषकातून बाहेर पडण्याची घंटा वाजली. आणि सुपर सिक्समध्ये त्यांना स्कॉटलंडकडून दारुण पराभव स्वीकारावा लागला. वेस्टइंडीज या विश्वचषकात दिसणार नाहीत यावर शिक्कामोर्तब झालं आणि क्रिकेट विश्वात खळबळ माजली.  

यापुढची वेस्टइंडीज क्रिकेटची अवस्था सांगणे अवघड आहे. आता ते विश्वचषक खेळणार नाहीत. आधीच कसोटी क्रिकेटमध्ये त्यांची परिस्थिती भीषण आहे. आता विश्वचषकात न खेळल्यामुळे तिथलं क्रिकेट अजून मागे जाईल. याचा खेळावर तर परिणाम होईलच, पण खेळाडू आणि क्रिकेट रसिक यांच्यावर देखील होईल. हे क्रिकेट एकूणच काही वर्षे मागे जाईल. पुढची पिढी बेसबॉल आणि बास्केटबॉल कडे अधिक आकर्षिली जाईल. कदाचित यापुढे वेस्टइंडीज समूह न राहता प्रत्येक देश स्वतंत्रपणे क्रिकेट खेळू लागला तर? ही शक्यता देखील नाकारता येत नाही. मग वेस्टइंडीजची ती झिंग दिसणार नाही, ती तडफ दिसणार नाही, आणि वेस्टइंडीज क्रिकेट इतिहासजमा होऊ शकेल. आता खऱ्या अर्थाने गरज आहे ते वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने पाय घट्ट करून उभं राहण्याची. आपापसातील हेवेदावे दूर करून एकत्र येण्याची आणि वेस्टइंडीज क्रिकेटला गतवैभव मिळवून देण्याची. वेस्टइंडीजने आम्हा क्रिकेट रसिकांना खूप काही दिलं आहे, आम्हाला ते वैभव परत आलेलं नक्की बघायचं आहे. गोष्ट सोपी नाहीये, अडथळे खूप आहेत. पण वेस्टइंडिज परत आले तर क्रिकेटचे सोनेरी दिवस परत येतील हे देखील खरे. तूर्तास, या विश्वचषकात वेस्टइंडीज नसेल याची सवय करून घेऊया. 

To know more about Crickatha