विश्वविजेत्या ‘छोरीया’ (दैनिक केसरी, पुणे)
क्रिकेटच्या बाबतीत दक्षिण आफ्रिकेचं आणि आपलं काहीतरी वेगळं नातं आहे. २००७ साली आफ्रिकेत पहिला टी-२० विश्वचषक खेळला गेला होता, आणि धोनीच्या नेतृत्वाखाली आपण तो विश्वचषक जिंकला होता. काही दिवसांपूर्वी आपल्या युवतींच्या संघाने त्याची पुनरावृत्ती केली. शफाली वर्माच्या नेतृत्वाखाली आपला संघाने कमाल केली, आणि अंतिम सामन्यात इंग्लिश संघाला पराभूत करत विजेतेपद पटकावलं. काल परवा पर्यंत यापैकी एकही नाव आपल्या परिचयाचं नव्हतं पण आज पार्श्वी चोप्रा, अर्चना देवी, श्वेता सेहरावत, फलक नाझ, मन्नत कश्यप, गोंगडी त्रिशा ही नावं घराघरात गाजताहेत. या प्रत्येकीची पार्श्वभूमी वेगळी, प्रत्येकीची गोष्ट वेगळी पण एक संघ म्हणून त्यांनी जे कमावलं आहे त्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. यापैकी कोणाचे वडील शाळेत शिक्षक आहे, कोणाचे वडील साधे कामगार, तर कोणाला मुलीच्या खेळापायी स्वतःची जमीन विकावी लागली आहे. अंतिम सामन्यात अप्रतिम झेल घेणारी अर्चना…तिची कहाणी तर एखाद्या बॉलिवूड चित्रपटालाही लाजवेल अशी. वडिलांच्या निधनानंतर आईने कष्ट करून मुलीला वाढवलेलं, शिकावं म्हणून शाळेत घातलं तर तिथे तिचे खेळातले गुण दिसू लागले. पुढे जाऊन तिला आईने कानपूरला शिक्षणासाठी पाठवलं, विचार होता की मुलगी खेळात प्रगती करेल. मुलगी पुढे जात राहिली पण त्या छोट्याश्या गावाने मात्र त्या मायलेकींना शब्दशः वाळीत टाकलं. मुलगी भारतासाठी क्रिकेट खेळते आहे ह्याचंच आईला अप्रूप. पण मुलीला खेळताना टीव्हीवर बघण्यासाठी गावात वीज देखील नव्हती. मग एका पोलीस अधिकाऱ्यानेच जनरेटरची सोय करून आईला मुलीचा सामना दाखवला. आज मुलीने विजेतेपद मिळवल्यानंतर संपूर्ण गाव आनंदाने बेहोष आहे. ‘अपने गांव की छोरी’ म्हणून तिला डोक्यावर घेत आहेत.
आयसीसी गेली अनेक वर्षे १९ वर्षांखालील मुलांचा विश्वचषक आयोजित करत आलंय. आता त्या विश्वचषकाला एक वेगळं ग्लॅमर देखील लाभलंय. मुलींसाठी असा विश्वचषक भरवण्याची ही पहिलीच वेळ. या भारतीय संघाची कर्णधार होती शफाली वर्मा. खरं तर ती आता भारताच्या महिला संघात चांगली स्थिरावली आहे. अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव तिच्या पाठीशी जमा आहे. त्या अनुभवाचीच शिदोरी बांधून शफालीने तिच्या साथीदारांसह या विश्वचषकाला गवसणी घातली. शफाली सारखी तडाखेबंद फलंदाज, जोडीला तिचीच आवृत्ती असलेली श्वेता सेहरावत…. दोघींनी या विश्वचषकात धुमाकूळ घातला. जवजवळ प्रत्येक सामन्यात दोघींनी भारतीय संघाला अप्रतिम सुरुवात करून दिली आणि तिथेच आपला पाया भक्कम होत गेला. गोलंदाजी मध्ये पार्श्वी चोप्रा, मन्नत कश्यप आणि अर्चना देवी चमकल्या. श्रीलंकेविरुद्ध पार्श्वीने केवळ ५ धावात घेतलेले ४ बळी म्हणजे उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना होता. फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोडीला आपलं क्षेत्ररक्षण देखील अप्रतिम होतं, आणि या सगळ्याचाच परिपाक म्हणजे हा विजय असं नक्की म्हणता येईल. आता मोहम्मद कैफ, विराट कोहली, उन्मुक्त चंद, पृथ्वी शॉ आणि यश धूल नंतर आपण शफालीचं नाव देखील तितक्याच अभिमानाने घेऊ शकू. या विश्वविजयासाठी कारणीभूत ठरलेल्या अजून एका व्यक्तीचा या प्रसंगी उल्लेख होणं अतिशय आवश्यक आहे ती म्हणजे नूशीन अल खदिर. नूशीन या संघाची प्रशिक्षक होती. ती स्वतः भारताच्या विश्वचषक संघाचा भाग होती. २००५ साली तिला विश्वचषक स्पर्धेत खेळायची संधी लाभली, पण तिला त्या वेळी उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. त्याच नूशीनच्या मार्गदर्शनाखाली आज भारतीय युवतींनी हे विजेतेपद मिळवलं आहे. तिच्याही मनात एक वर्तुळ पूर्ण झाल्याची भावना असेल.
मुळात महिला क्रिकेटकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदलत चाललाय. आता महिला क्रिकेटने केलेली प्रगती पाहता पुढे येणाऱ्या काळात त्यांच्यासाठी अनेक स्पॉन्सर्स उभे राहतील, त्यांना देखील मुख्य प्रवाहात सामील केले जाईल. आणि अर्थातच या सगळ्याचा फायदा महिला क्रिकेटलाच होणार आहे. युवती विश्वचषकानंतर आता महिला टी-२० विश्वचषक दक्षिण आफ्रिकेतच सुरु झाला आहे. या युवती विश्वचषकात खेळलेल्या काही खेळाडू वरिष्ठ गटात खेळताना दिसतील. या विश्वचषकावर खास करून भारतीय खेळाडूंची नजर असेल, कारण हीच एक ट्रॉफी अजून भारताकडे आली नाहीये. लगोलग पुढच्याच महिन्यात महिलांची आयपीएल स्पर्धा सुरु होईल. त्यावेळी देखील या युवा खेळाडूंचा विचार केला जाईल. आपल्या खेळाडू आता महिला बीबीएल आणि इंग्लिश टी-२०, हंड्रेड स्पर्धेत देखील खेळताना दिसतात. चांगल्या कामगिरीच्या जोरावर कदाचित या खेळाडूंना तिथे खेळण्याची देखील संधी असेल. एकूणच मिळणाऱ्या संधी आणि त्यामुळे येणारी आर्थिक सुबत्ता याचा विचार करता या युवा खेळाडूंचं भविष्य उज्ज्वल असेल. ही स्पर्धा जिंकून आल्यानंतर बीसीसीआयने त्यांचा यथोचित सत्कार केला. अहमदाबाद मध्ये साक्षात सचिन तेंडुलकरच्या हस्ते या युवतींना गौरवण्यात आलं. तो सोहळा बघताना १९८३ साली कपिलच्या संघाने विश्वचषक जिंकल्यानंतरची आठवण झाली. त्यावेळी बीसीसीआय कडे त्या खेळाडूंचा सत्कार करण्यासाठी देखील पैसे नव्हते. आज भारतीय क्रिकेट इतकं बदललं आहे की या युवतींचा यथोचित सन्मान करणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आपल्या क्रिकेट बोर्डाला सहज शक्य आहे.
येणाऱ्या काही वर्षात शफाली, श्वेता, अर्चना, पार्श्वी ही नावं भारतीयच काय पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील खूप मोठी होऊ शकतात. त्याचा पाया या स्पर्धेत रचला गेला आहे. या मुलींच्या भाळी विश्वविजेतेपदाचा शिक्का लागला आहे, आणि तो त्यांना आयुष्यभर खूप काही देणारा आहे. खेळाचं मैदान ही अशी एक जागा आहे जिथे प्रत्येक क्षणी तुम्हाला स्वतःला सिद्ध करावंच लागतं. आज या पहिल्या पायरीवर भारतीय युवतींनी स्वतःला निश्चितच सिद्ध केलं आहे. आयसीसीने प्रथमच घेतलेल्या या स्पर्धेत भारतीय युवतींनी केलेली ही कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे. शफाली आणि तिच्या संघाकडे बघून अभिमानाने म्हणावसं वाटतं – ‘म्हारी छोरीयां छोरोंसे कम हैं क्या !!’
– कौस्तुभ चाटे