ball

विश्वचषकाची पात्रता फेरी

by कौस्तुभ चाटे

जागतिक क्रिकेट कसोटी आणि पाठोपाठ सुरु झालेल्या ऍशेसच्या गदारोळात कालपासून अजून एक स्पर्धा सुरु झाली आहे. बहुतेक क्रिकेटप्रेमींचं तिकडे कदाचित लक्ष पण नसेल. कारण साधं सोपं आहे… त्या स्पर्धेत ना भारत आहे, ना ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड. ही स्पर्धा आयसीसीची आहे, आणि ती या वर्षातली एक महत्वाची स्पर्धा मानली गेली पाहिजे. येत्या काही महिन्यात भारतात ५० षटकांचा विश्वचषक खेळला जाणार आहे. या विश्वचषकात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बहुतेक संघ सहभागी होत असले तरीदेखील अजूनही २ संघांची निवड होणे बाकी आहे. आणि त्या संघांची निवड करण्यासाठीचे सामने म्हणजे झिम्बाब्वे मध्ये खेळली जात असलेली ही पात्रता स्पर्धा. विश्वचषकात एकूण १० संघ भाग घेतील. पैकी ८ संघ आधीच पात्र ठरले आहेत. ३ आठवडे चालणाऱ्या या स्पर्धेतील अंतिम फेरीत खेळणाऱ्या २ संघांना विश्वचषक स्पर्धेत स्थान मिळेल. आणि त्याच दृष्टीने ही स्पर्धा महत्वाची ठरते. 


झिम्बाब्वे मधील हरारे आणि बुलावायो या दोन शहरात या स्पर्धेचे सामने खेळवले जातील. या सर्वच सामन्यांना एकदिवसीय सामने म्हणून ओळखले जाईल. स्पर्धेतील सहभागी संघांची दोन गटात वर्गवारी करण्यात आली असून प्रत्येक गटात ५ संघ आहेत. ‘अ’ गटात झिम्बाब्वे, नेपाळ, वेस्ट इंडिज, नेदर्लंड्स आणि अमेरिका या संघांचा समावेश असून, ‘ब’ गटातून आयर्लंड, ओमान, श्रीलंका, स्कॉटलंड आणि संयुक्त अरब अमिराती (युएई) हे संघ खेळतील.   या सर्वच संघांसाठी ही स्पर्धा निश्चितच महत्वाची आहे. वरवर पाहता, वेस्टइंडीज आणि श्रीलंका या संघांना या स्पर्धेतून पात्र ठरून विश्वचषकात भाग घेण्याची चांगली संधी आहे. पण क्रिकेट हा खेळाचं अनिश्चिततेचा आहे. त्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्या दिवशी जो संघ चांगली कामगिरी करेल, तो पुढे जाईल. आणि त्यात या स्पर्धेद्वारे विश्वचषक स्पर्धेत पात्र होण्याची संधी आहे, त्यामुळे ही स्पर्धा नक्कीच चुरशीची होईल. वेस्टइंडीज आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी विश्वचषक जिंकला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हे संघ कधीकाळी अतिशय बलवान संघ म्हणून ओळखले जात असत. पण तो इतिहास झाला. आजच्या घडीला या संघांना पात्रता फेरीत खेळावं लागणं हीच शोकांतिका आहे.  त्याबरोबरच झिम्बाब्वे आणि आयर्लंड सारखे कसोटी संघ देखील या स्पर्धेत खेळतील. या दोन्ही संघांची कसोटी क्रिकेट मधील अवस्था फारशी चांगली नाही. पण एकदिवसीय स्पर्धेत हे संघ कोणत्याही संघांना भारी पडू शकतात. त्याचबरोबर नेदर्लंड्स, स्कॉटलंड, युएईसारख्या संघांना देखील विश्वचषक स्पर्धा खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्या कामगिरी कडे देखील लक्ष असेल. त्यामानाने नेपाळ, ओमान आणि अमेरिका हे तसे लिंबूटिंबू आहेत. पण तेही चांगला खेळ करून दाखवण्यासाठी उत्सुक असतील. 


दासून शनका च्या नेतृत्वाखाली खेळणारा श्रीलंका संघ तसा बलवान आहे. संघातील इतर खेळाडू – कुशल मेंडिस,धनंजया डिसिल्वा, हसरंगा, पाथीराणा, करुणारत्ने, तीक्षना आदी खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा चांगला अनुभव आहे. त्यांचे खेळाडू आयपीएल आणि इतर लीग्स मध्ये देखील खेळतात. अशावेळी त्यांना या खेळाडूंच्या अनुभवाचा नक्कीच फायदा होईल. तीच गत वेस्टइंडीजची देखील आहे. त्यांचा कप्तान शाय होप तसेच संघातील इतर खेळाडू – पॉवेल, चेस, अलझारी जोसेफ, जेसन होल्डर, कायले मायर्स, निकोलस पूरन आदी खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएल मध्ये चांगली कामगिरी केली आहे. कदाचित याच कारणामुळे या दोन्ही संघांचे पारडे जड ठरू शकते. त्याचबरोबर घरच्या मैदानावर खेळणारा झिम्बाब्वे देखील धोकादायक ठरू शकतो. कप्तान क्रेग आयर्विन, शॉन विलियम्स, सिकंदर रझा, रायन बर्ल, तेंडाई चटारा हे त्यांचे प्रमुख खेळाडू. गेल्या काही वर्षात झिम्बाब्वे क्रिकेट देखील जणू रसातळाला गेले आहे. अशावेळी उत्तम खेळ करून विश्वचषकासाठी पात्र होण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. तिकडे अजून एक कसोटी संघ – आयर्लंड देखील या स्पर्धेत खेळत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये फारसे प्रभावी न ठरलेले आयर्लंड क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅट मध्ये कायमच शर्थीचे प्रयत्न करताना दिसतात. अनेक गोष्टी त्यांच्या बाजूने घडल्यास त्यांनादेखील या स्पर्धेच्या विजेतेपदाची संधी आहे. कप्तान अँडी बलबर्नी, पॉल स्टर्लिंग, कर्टीस कॅम्फर, हॅरी टेक्टर. लोरकॅन टकर, जोश लिटिल, जॉर्ज डॉकरेल या खेळाडूंवर आयर्लंडची भिस्त असेल. सारासार विचार करता, या चार संघांपैकी कोणतेही दोन संघ २०२३ च्या विश्वचषकासाठी पात्र ठरू शकतील. 


इतर संघांपैकी ओमान,नेपाळ आणि अमेरिका या संघांना क्रिकेटमध्ये काही करून दाखवण्याची चांगली संधी असेल. गेल्या काही वर्षात या संघांनी पुढे येण्यास सुरुवात केली आहे. नेपाळमध्ये  क्रिकेट बऱ्यापैकी पसरते आहे. गेल्या १२ पैकी ११ सामन्यात विजय मिळवून त्यांनी या ‘छोट्यांच्या’ क्रिकेटमध्ये आपली चुणूक दाखवून दिली आहे. ओमान आणि अमेरिका हे दोन्ही देश (आणि काही अंशी युएई देखील) भारत, पाकिस्तान आणि श्रीलंकेतून त्या त्या देशात स्थायिक झालेल्या खेळाडूंवर विसंबून आहे. अमेरिकेत क्रिकेटचा जम बसावा यासाठी आयसीसी देखील मोठे प्रयत्न करताना दिसतात. त्यादृष्टीने त्यांच्यासाठी ही स्पर्धा महत्वाची असेल. नेदर्लंड्स आणि स्कॉटलंड या दोन्ही संघांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि विश्वचषक देखील खेळण्याचा अनुभव आहे. त्यांचे खेळाडू इंग्लिश काउंटी मध्ये देखील खेळताना दिसतात. पण आजच्या घडीला या संघांची कामगिरी फारशी प्रभावी नाही. जी गत या संघांची तीच यूएईची देखील. त्यामुळे या तीनही संघावर कोणाची फारशी भिस्त नसेल. अर्थात त्या त्या दिवशी अमुक एक संघ कशी कामगिरी करतो, त्यावर त्यांचे भवितव्य अवलंबून असेल. 

कालपासून सुरु झालेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना ९ जुलै रोजी खेळवला जाईल, आणि त्याचवेळी आपल्याला या वर्षीच्या विश्वचषकासाठी पात्र झालेले दोन संघ मिळतील. स्पर्धेतील दोन सर्वोत्तम संघ जिंकून विश्वचषकासाठी पात्र ठरावेत, आणि मुख्य स्पर्धेत त्यांनी आपली छाप सोडावी, तरच या पात्रता फेरीत खेळलेल्या संघांचे महत्व वाढेल. 

To know more about Crickatha