ball

भारतीय क्रिकेटचा सर्वात अविस्मरणीय दिवस (२५ जून)

by कौस्तुभ चाटे

२५ जून या दिवसाचे भारतीय क्रिकेटमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. बरोबर ४० वर्षांपूर्वी म्हणजे २५ जून १९८३ रोजी कपिल देव च्या संघाने क्रिकेट विश्वकप जिंकला होता. त्यानंतर देखील भारतीय संघाने अनेक एकदिवसीय मालिका जिंकल्या. अगदी १९८५ ची B&H मालिका असेल, हिरो कप असेल, Natwest Trophy असेल किंवा २०११ चा विश्व कप. १९८३ चं विजेतेपद खऱ्या अर्थाने भारतीय क्रिकेट मधला मैलाचा दगड (mile stone) आहे. या विजेतेपदाच्या अनेक आख्यायिका अनेकांनी सांगितल्या असतील, आणि पुढे देखील सांगतील, पण प्रत्येक वेळी त्याची मजा काही औरच असेल, सांगणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला देखील. 


भारतीय संघाने तोपर्यंत विश्वचषक स्पर्धेत यथातथाच कामगिरी केली होती. १९७५ साली पूर्व आफ्रिकेविरुद्ध एक विजय, १९७९ साली तर एकही विजय नाही अशा पार्श्वभूमीवर आपण १९८३ चा विश्वचषक खेळायला इंग्लंडला गेलो होतो. १९८३ च्या विश्वचषक स्पर्धेत भारताचा कप्तान होता कपिल देव. ह्या संघाला कोणीही विजेतेपदाच्या शर्यतीत जमेस धरलं नव्हतं, आणि ह्याच underdogs नी अखेर विजयश्री खेचून आणली. भारतीय क्रिकेटचं रूप पालटलं ते ह्याच स्पर्धेनंतर. 
आपण साखळी सामन्यात बऱ्यापैकी कामगिरी केली. या स्पर्धेत प्रत्येक संघ गटातील इतर संघांशी दोन वेळा खेळला. आपल्या गटात बलाढ्य वेस्टइंडिज आणि ऑस्ट्रेलिया, तसेच आपला पदार्पण करणारे झिम्बाब्वे असे तीन संघ होते. आपण साखळी स्पर्धेत वेस्टइंडीज आणि ऑस्ट्रेलियाला एकदा हरवून बरी कामगिरी केली होती. अर्थात आपल्यासाठी संस्मरणीय सामना ठरला तो म्हणजे १८ जून १९८३ रोजी झालेला भारत विरुद्ध झिम्बाब्वे हा सामना. त्यादिवशी कपिलदेव निखंज या माणसाने ५ बाद १७ धावसंख्येवरुन अशक्य फलंदाजी करून भारतीय संघाला विजय मिळवून दिला. हो-नाही करता करता आपण उपांत्य फेरीत पोहोचलो, जिथे आपण इंग्लंडचा पराभव केला. आणि अंतिम फेरीत कपिलच्या संघाने २ वेळच्या विश्वविजेत्या वेस्टइंडीजला धूळ चारली. 

अंतिम सामन्यात भारताची गाठ परत एकदा वेस्ट इंडीजशी होती. २ विश्वचषक विजयांचा अनुभव असलेला वेस्ट इंडीजचा संघ विरुद्ध पूर्णपणे अननुभवी भारतीय संघ अशी विषम लढाई. भारताने पहिली फलंदाजी करताना केवळ १८३ धावा केल्या. त्यात सर्वात जास्त धावा होत्या श्रीकांतच्या – ३७. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजीच्या चौकडीसमोर भारतीय संघ कोसळला आणि विजय वेस्ट इंडीजचाच होणार अशी क्रिकेट रसिकांची खात्री पटली. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. बलविंदर संधूच्या एका आतमध्ये येणाऱ्या चेंडूवर ग्रीनीज चकला आणि त्याचा त्रिफळा उडाला. नंतर आलेला रिचर्ड्स २०-२० च्या सामन्यासारखा खेळत होता. मदनलालच्या चेंडूवर कपिलने त्याचा अप्रतिम झेल घेतला आणि रिचर्ड्स बाद झाला. आणि खऱ्या अर्थाने तिथेच सामना फिरला. पुढे काही वेळातच वेस्ट इंडिजचा संघ १४० च्या धावसंख्येवर सर्वबाद झाला आणि भारताने अशक्य वाटणारा विजय खेचून आणला. खरोखर १९८३ चा विश्वकप म्हणजे भारतीय क्रिकेट मधला मैलाचा दगड आहे. ह्या विजयाबद्दल भारतीय क्रिकेट रसिक ह्या संघाचे आणि खास करून कर्णधार कपिलचे कायमच ऋणी राहतील. 

पण २५ जून या दिवसाचे एवढेच महत्व नाही. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वात महत्वाची घटना २५ जून रोजी घडली आहे, ती म्हणजे भारताने आपला पहिला कसोटी सामना २५ जून १९३२ रोजी खेळला आहे. त्यादिवशी भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध लॉर्ड्सवर पहिल्यांदा कसोटीसाठी उतरला होता. साधारण १९२७-२८ पासून भारतीय संघाला कसोटी क्रिकेटचे वेध लागले होते, पण पहिली कसोटी खेळण्यासाठी १९३२ साल उजाडले. आपल्या १९३२ च्या त्या दौऱ्याला एक वेगळेच महत्व आहे. काही संस्थानिकांनी जमा केलेल्या पैशातून आपला तो दौरा घडला. त्या पूर्ण दौऱ्यासाठी पोरबंदरचे महाराज कर्णधार होते, तर लिंबडीच्या राजांकडे उपकर्णधारपद सोपवले गेले होते. त्यावेळी खेळले जात असलेले क्रिकेट पूर्णपणे संस्थानिकांच्या ताब्यात होते. या दोघांनीही कसोटी सामन्यासाठी आपली अनुपस्थिती कळवली आणि सी. के. नायुडू यांच्याकडे कसोटीचे कर्णधारपद आले.  

त्यावेळी भारतीय संघात अमरसिंग आणि मोहम्मद निसार असे दोन अत्यंत वेगवान गोलंदाज होते. या दोघांनीही पहिल्याच सामन्यात इंग्लिश फलंदाजांना सळो की पळो करून सोडले होते. एक वेळ अशी आली की पहिल्या डावात इंग्लिश संघाची अवस्था ३ बाद १९ अशी होती. पण मधल्या फळीतील फलंदाजांनी चांगला खेळ करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारण्यासाठी मदत केली. त्यात इंग्लिश कर्णधार डग्लस जार्डीनच्या अर्धशतकाचा समावेश होता. मोहम्मद निसारने या डावात ५ बळी घेतले. इंग्लिश संघाने पहिल्या डावात २५९ धावा केल्या तर भारतीय फलंदाजांनी १८९ धावा करून त्याला प्रतिउत्तर दिले. दुसऱ्या डावात इंग्लिश फलंदाजांनी बऱ्यापैकी कामगीरी करत ८ बाद २७५ या धावसंख्येवर आपला डाव घोषित केला, आणि भरती संघापुढे ३४६ धावांचे लक्ष्य ठेवले. अर्थात पहिलीच कसोटी खेळत असलेल्या भारतीय संघाला ते लक्ष्य मानवले नाही, आणि आपण १८७ धावत बाद झालो. इंग्लिश संघाने तब्बल १५८ धावांनी विजय मिळवला. या कसोटीत भारतीय संघाचा पराभव झाला असला तरीही भारताने कसोटी क्रिकेट मध्ये पदार्पण केले. 

२५ जून १९३२ रोजी भारतीय संघ लॉर्ड्सवर आपला पहिला कसोटी सामना खेळला आणि त्यानंतर बरोबर ५१ वर्षांनी म्हणजे २५ जून १९८३ रोजी कपिलदेवने त्याच लॉर्ड्स मैदानावर पहिल्यांदा विश्वचषक उंचावला. खरोखरच हा दिवस भारतीय क्रिकेटमध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल यात काही वाद नाही. 

To know more about Crickatha