कहाणी षटकारांची
क्रिकेटच्या इतिहासात एका षटकात सहा षटकार मारणे ही काही सोपी गोष्ट नाही. केवळ आकड्यांच्या आणि शक्यतेच्या भाषेत बोलायचे झाले तर हे सहज शक्य आहे, पण हे गणित नाही. क्रिकेट हा खेळ आहे, आणि प्रत्येक चेंडूवर षटकार मारणे हे खरोखरच अवघड आहे. अर्थात हे घडलं नाहीये असं देखील नाही. क्रिकेटच्या जवळजवळ सव्वाशे-दीडशे वर्षांच्या इतिहासात ही गोष्ट आतापर्यंत केवळ ११ वेळा घडली आहे, पैकी ४ वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (२ वेळा एकदिवसीय क्रिकेटमध्ये आणि २ वेळा आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यात), २ वेळा फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये आणि बाकी वेळा टी-२० अथवा लिस्ट ए सामन्यात ही घटना घडली आहे. पूर्वीच्या काळी फलंदाजाला चेंडू हवेतून मारू नये असे शिकवले जात असे. चेंडू हवेत गेला तर फलंदाज बाद होण्याची शक्यता अधिक, त्यामुळेच कदाचित चेंडू जमिनीलगत मारण्याचे जास्त प्रयत्न होताना दिसत.
सर डॉन ब्रॅडमन क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम फलंदाज समजले गेले. कसोटी क्रिकेट मधील त्यांची सरासरी कदाचित कोणीही फलंदाज ओलांडू शकणार नाही. आपल्या तंत्रशुद्ध पण तरीही आक्रमक फलंदाजीच्या जोरावर त्यांनी क्रिकेट गाजवले. १९२७-२८ ते १९४७-४८ अशी जवळजवळ २०-२१ वर्षे त्यांनी क्रिकेट गाजवले. (यातच युद्धामुळे त्यांची साधारण ७-८ वर्षे वाया गेली हे देखील लक्षात घेतले पाहिजे.) त्यांची फलंदाजी म्हणजे जमिनीलगत फटक्यांची मेजवानी असे. पण या संपूर्ण कालावधीत त्यांनी कसोटी क्रिकेट मध्ये ६०० पेक्षा जास्त चौकार मारले असले तरी, फक्त ६ षटकार लगावले. संपूर्ण २० वर्षांच्या कारकिर्दीत, साधारण १०० च्या सरासरीने सुमारे ७००० कसोटी धावा करताना त्यांनी फक्त ६ षटकार मारले असतील हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. अजून एक गमतीची गोष्ट म्हणजे हे सर्व षटकार त्यांनी डावखुऱ्या गोलंदाजांना मारले आहेत. यापैकी पहिला षटकार त्यांनी इंग्लंडचा गोलंदाज हेडली वेरिटीला लगावला. १९३२ साली ऍडलेड मैदानावर त्यांनी पहिला षटकार मारला. त्यानंतर १९३४ सालच्या इंग्लंड मालिकेत त्यांनी अजून ४ षटकार लगावले. पैकी दोन षटकार हेडींग्ले मैदानावर (गोलंदाज: हेडली वेरिटी आणि लेन हॉपवूड) आणि दोन ओव्हल मैदानावर (गोलंदाज: हेडली वेरिटी आणि नोबी क्लार्क) होते. ब्रॅडमन यांनी शेवटचा षटकार १९४८ साली भारताच्या विनू मंकड यांच्या गोलंदाजीवर मारला. खरोखर इतक्या मोठ्या फलंदाजाने त्याच्या
कारकिर्दीत फक्त ६ षटकार मारणे हे आजच्या क्रिकेटकडे पाहता आश्चर्यकारकच म्हटले गेले पाहिजे.
एका षटकात सहा षटकार मारण्याचा पहिला मान जातो सर गॅरी सोबर्स यांच्याकडे. ३१ ऑगस्ट १९६८ रोजी इंग्लिश काउंटी क्रिकेटमध्ये नॉटिंगहॅमशायर कडून खेळताना त्यांनी ग्लॅमॉर्गनचा गोलंदाज माल्कम नॅश याच्या गोलंदाजीवर हा विक्रम केला. लागोपाठ ५ षटकार मारल्यानंतर सोबर्स यांनी जेंव्हा सहावा चेंडू सीमारेषेपलीकडे मारायचा प्रयत्न केला, तेंव्हा सीमारेषेजवळ असलेला क्षेत्ररक्षक – रॉजर डेव्हिस याने तो झेल घेतला खरा, पण झेल घेण्याच्या नादात तो सीमारेषेपलीकडे गेला आणि अशा पद्धतीने सोबर्स हे एका षटकात सहा षटकार मारणारे पहिले फलंदाज ठरले. यापुढची कहाणी देखील मनोरंजक आहे. त्याकाळी क्रिकेटपटूंना क्रिकेटमधून फारसे पैसे मिळत नसत. ऑगस्ट १९६८ नंतर माल्कम नॅश, ज्यांच्या गोलंदाजीवर सहा षटकार मारले गेले होते, त्यांनी इंग्लंडमधील पब्स मध्ये त्या षटकारांची कहाणी रंगवून सांगण्यास सुरुवात केली. आणि त्यामधून त्यांनी बरेच पैसे कमावले. अजून एक गमतीची गोष्ट म्हणजे कधीकधी खुद्द सर गॅरी सोबर्स त्यांच्याबरोबर हा कार्यक्रम करत असत. अशा पद्धतीने सोबर्स आणि नॅश यांनी पुढे अनेक वर्षे ती सहा षटकारांची गोष्ट जिवंत ठेवली.
त्यानंतर १९८५ मध्ये वानखेडे स्टेडियमवर रणजी ट्रॉफी सामन्यात रवी शास्त्रीने या विक्रमाची बरोबरी केली. त्यावेळी त्याने बडोद्याकडून खेळणाऱ्या तिलक राज याच्या गोलंदाजीवर सहा षटकार मारले होते. २००७ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या हर्स्चेल गिब्स याने नेदर्लंड्सच्या डॅन वान बुंगा याच्या गोलंदाजीवर षटकारांची आतषबाजी केली. तर त्यानंतर काहीच महिन्यात दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत युवराज सिंगने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडला षटकार मारून त्याची पुनरावृत्ती केली. हे षटकार कदाचित आपल्या जास्त जवळचे आहेत. २००७ चा तो विश्वचषक म्हटलं की युवराजला चिथावणारा अँड्र्यू फ्लिंटॉफ आणि त्यानंतर त्याने मारलेले ते सहा षटकार नक्की लक्षात राहतात. २००७-०८ नंतर झालेल्या टी-२० क्रिकेटच्या उदयानंतर फलंदाजीचे तंत्रज्ञान एकदमच बदललं. आता कोणताही फलंदाज मिळालेल्या संधीचा फायदा करून घेत, गोलंदाजांवर वर्चस्व गाजवू लागला. त्याच नादात गेल्या काही वर्षात एका षटकात ६ षटकार मारण्याचे प्रमाण देखील वाढले. २०१७ मध्ये वार्विकशायर कडून खेळणारा रॉस व्हिटली, तसेच २०१८ अफगाणिस्तान प्रीमियर लीग मध्ये हझरतुल्ला झझाई यांनी हा पराक्रम केला. पाठोपाठ २०२० मध्ये न्यूझीलंडच्या टी-२० स्पर्धेत केंटरबरी संघाकडून खेळताना लिओ कार्टर याने त्यांचा कित्ता गिरवला.
२०२१ मध्ये ही कामगिरी तीन वेळा घडली. श्रीलंकेच्या टी-२० स्पर्धेत थिसारा परेरा याने ‘श्रीलंका आर्मी’ संघाकडून खेळताना कोलंबो येथे एका सामन्यात सहा षटकारांचा विक्रम केला. त्याने त्या सामन्यात केवळ १३ चेंडूत ५२ धावांची खेळी केली. पण ही खेळी वाया गेली असेच म्हणावे लागेल, कारण पुढे पावसामुळे तो सामना पूर्ण होऊ शकला नाही आणि शेवटी तो रद्द करावा लागला. २०२१ याच वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ही घटना २ वेळा घडली. ४ मार्च २०२१ रोजी अँटिगा येथे टी-२० सामना खेळत असताना वेस्ट इंडिजच्या कायरॉन पोलार्ड याने श्रीलंकेच्या अकिला धनंजयाच्या गोलंदाजीवर हल्ला चढवत ६ षटकारांची आतषबाजी केली. आधीच्याच षटकात धनंजयाने त्याच्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर हॅट्ट्रिक घेतली होती. त्या षटकात त्याने तीन बळी तर घेतलेच पण केवळ २ धावा दिल्या होत्या. पण पुढच्या षटकात मात्र पोलार्डच्या फटक्यांपुढे त्याची गोलंदाजी निष्प्रभ वाटू लागली. याच वर्षी ९ सप्टेंबर रोजी भारतात जन्मलेल्या पण अमेरिकेकडून खेळणाऱ्या जसकरण मल्होत्रा याने ओमान येथील मैदानावर पापुआ न्यू गिनी या देशाकडून खेळणाऱ्या गौदी टोका याच्या षटकात ६ षटकार मारले. आता अमेरिका आणि पापुआ न्यू गिनी हे दोन्ही संघ क्रिकेट जगतात अगदी बच्चे असले तरी मल्होत्राची ही कामगिरी क्रिकेट विश्वात नक्कीच महत्वाची ठरते.
या यादीतील शेवटचे नाव आहे ते म्हणजे महाराष्ट्राचा खेळाडू ऋतुराज गायकवाड याचे. ऋतुराजने मागच्या वर्षी (२०२२ मध्ये) एकदिवसीय क्रिकेटमध्ये उत्तरप्रदेशविरुद्ध खेळताना अहमदाबाद येथे एक भन्नाट विक्रम आपल्या नावावर नोंदवला. शिवा सिंग या फिरकी गोलंदाजाच्या गोलंदाजीवर त्याने एकाच षटकात ७ षटकार मारले. शिवा सिंगने त्या षटकात एक अवैध चेंडू (नो बॉल) देखील टाकला, आणि ऋतुराजने त्या चेंडूवर देखील षटकाराची नोंद केली. अशापद्धतीने एकाच षटकात ४३ धावा करण्याचा (७ षटकार आणि १ नो बॉल) विक्रम ऋतुराजच्या नावावर आहे.
आजच्या वेगवान आणि फटकेबाजीला प्रोत्साहन देणाऱ्या क्रिकेटमध्ये षटकार मारणे हे फारसे अवघड वाटत नाही. पण तरीही एका षटकात सहा षटकार मारणे नक्कीच सोपे नाही. सोबर्स पासून सुरु झालेला हा प्रवास आत्ताच्या घडीला ऋतुराजपाशी येऊन थांबला आहे. अर्थातच क्रिकेटमध्ये हा विक्रम परत परत घडणार यात काही शंका नाही.
– कौस्तुभ चाटे