ball

कसोटी पाहणारी एकदिवसीय मालिका (दैनिक ऐक्य)

by कौस्तुभ चाटे

एकदिवसीय मालिका संपली. तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने आपल्याला २-१ अशा फरकाने हरवलं. मालिका हरल्याचं वाईट नाही वाटत पण ज्या पद्धतीने आपण शेवटचे दोन्ही सामने हरलो त्याचं नक्कीच वाईट वाटतंय. एकदिवसीय विश्वचषक काही महिन्यांवर आला आहे. अशावेळी आपल्याला जे काही सामने खेळायला मिळणार आहेत, त्यातील प्रत्येक सामना महत्वाचा आहे. आपण कितीही म्हणत असलो तरीदेखील आपली या विश्वचषकासाठी तयारी झालेली दिसत नाही. येणार विश्वचषक आपल्याच देशात खेळवला जाणार आहे, अशावेळी चांगली कामगिरी होणे अपरिहार्य आहे. भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेत, घरच्या मैदानावर कशी कामगिरी करतो याकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष असेल. ही झालेली मालिका बघता भारतीय संघाला अजून मोठा टप्पा गाठायचा आहे असेच म्हणावे लागेल. 

दुसऱ्या सामन्यात तर आपल्या संघाची अवस्था अधिकच वाईट होती. मिशेल स्टार्कच्या गोलंदाजीपुढे आपल्या फलंदाजांनी अक्षरशः लोटांगण घातलं. स्टार्कच्या पहिल्या षटकापासून आपली जी पडझड सुरु झाली त्यामधून आपला संघ सावरलाच नाही. खरं तर या संघात रोहित शर्माचं पुनरागमन झालं होतं, पण तो देखील अपयशी ठरला. एक विराटने ३१ धावा आणि अक्षर पटेलच्या २९ धावा सोडल्या तर बाकी फलंदाजांनी केवळ आपली हजेरी लावली. या सामन्यात आपण केवळ २६ षटके फलंदाजी केली. खरं म्हणजे हा आपल्या संघाने केलेला मोठा गुन्हा म्हटलं पाहिजे. आपण जर एकदिवसीय सामन्यात ५० षटके फलंदाजी करू शकणार नसलो तर आजच्या जमान्यात हा गुन्हाच आहे. बरं विशाखापट्टणमचं हे मैदान तसं फलंदाजीला अनुकूल आहे. या मैदानावर अनेकदा भारतीय फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली आहे. पण मिशेल स्टार्कच्या माऱ्यासमोर आपण तलवार म्यान केली. खेळपट्टीवर एकही फलंदाज तग धरून उभा राहिला नाही. या खेळपट्टीवर धावा होत्या हे ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी सिद्ध केलं. ११८ धावांचं लक्ष्य काही मोठं नव्हतं, पण ट्रॅव्हिस हेड आणि मिशेल मार्श या सलामीच्या फलंदाजांनी केवळ ११ षटकात ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. दोघांनीही कडक फलंदाजी केली आणि आपली आपली अर्धशतके झळकावली. एकही भारतीय गोलंदाजाला आपला प्रभाव टाकता आला नाही. ज्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज (स्टार्क, अबॉट आणि एलिस) १० बळी घेतात, स्टार्क अप्रतिम गोलंदाजीने ५ भारतीय फलंदाजांना बाद करतो, तिथे भारतीय गोलंदाज विकेट घेण्यासाठी झगडत होते. ऑस्ट्रेलियाच्या या विजयाचे शिल्पकार ठरले स्टार्क, हेड आणि मार्श. 

तिसरा आणि शेवटचा सामना चेन्नई मध्ये खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम फलंदाजी करताना चांगल्या २६९ धावा केल्या. कप्तान स्टीव्ह स्मिथ सोडल्यास सगळ्याच खेळाडूंनी या धावसंख्येत आपला खारीचा वाटा उचलला. एकही फलंदाज अर्धशतक गाठू शकला नाही तरी स्मिथ वगळता इतर दहाही फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. भारताकडून सिराज आणि अक्षरने प्रत्येकी दोन तर हार्दिक आणि कुलदीपने तीन बळी घेतले. खास करून कुलदीप यादवने चांगली गोलंदाजी केली. तसे पाहता आज २७० धावांचा पाठलाग करणे फारसे अवघड नाही, पण भारतीय फलंदाजी गरज असताना  ढेपाळली. रोहित आणि गीलने सुरुवात चांगली केली होती, पाठोपाठ आलेला विराट देखील मैदानावर उभा होता, पण तिघांपैकी एकाने शेवटपर्यंत उभे राहणे आवश्यक होते. या सामन्यात तेच घडले नाही. हे तिघे आणि राहुल, हार्दिकच्या बॅटमधून धावा तर निघाल्या पण पेशन्स ठेवून, खेळपट्टीवर उभे राहत संघाला विजयी मार्गावर नेने आवश्यक होते, ती जबाबदारी कोणी घेतली नाही. अखेरीस २१ धावांनी ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आणि मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. 

ऑस्ट्रेलियाचा विचार करता त्यांचा कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या बॅटमधून धावा निघाल्या नसल्या तरी खास करून या मालिकेत त्याच्या नेतृत्वाखाली संघाने चांगली कामगिरी केली. स्टार्क, मार्श आणि इतर खेळाडू देखील या मालिकेत चमकले. स्टार्कने विशाखापट्टणमला गेलेली गोलंदाजी भेदक होती. डावखुरे गोलंदाज आपल्यासाठी कायमच डोकेदुखी ठरले आहेत, स्टार्कने देखील निराश केले नाही. ऑस्ट्रेलियाने या मालिकेत एक कणखर निर्णय घेतला. डेव्हिड वॉर्नरला पहिल्या दोन सामन्यात वगळले होते, आणि तिसऱ्या सामन्यात त्याला सलामीला न पाठवता मधल्या फळीत फलंदाजीला पाठवले. हे असे निर्णय घेणे अवघड असते, पण हा वेगळा विचार होणेदेखील आवश्यक असते. भारतीय संघात हा विचार झालाच नाही. ईशान किशन सारखा तडाखेबंद यष्टीरक्षक-फलंदाज संघात असताना, आपण के एल राहुलकडेच ही दुहेरी जबाबदारी सोपवतो आहोत. राहुलच्या फलंदाजीबद्दल निश्चितच शंका नाहीये, पण त्याचा फॉर्म अजूनही त्याला साथ देत नाहीये. वास्तविक ईशान-शुभमन हे दोघेही सलामीची जोडी म्हणून जास्त चांगली कामगिरी करू शकतील, पण संघ व्यवस्थापनाने त्यांच्यावर जबाबदारी टाकणे, विश्वास ठेवणे आवश्यक आहे. रोहित आणि विराटचे वय आता जाणवू लागले आहे, खास करून रोहितचे. कदाचित २०२३ हे वर्ष दोघांच्या करियरसाठी सगळ्यात जास्त महत्वाचे असेल. अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सूर्यकुमार यादवने या मालिकेतील अपयश. तो तीनही सामन्यात पहिल्या चेंडूवर बाद झाला. प्रश्न अपयशाचा नाहीये, हे अपयश अनेकांनी अनुभवले आहे. या अपयशातून तो स्वतः आणि भारतीय संघ किती लवकर शहाणे होतात हे पाहणे महत्वाचे आहे. सूर्याच्या फलंदाजी क्षमतेबद्दल शंका नक्कीच नाही, पण या घडलेल्या ‘अपघाताचा’ विचार त्यानेच करणे आवश्यक आहे. या अनुभवातून तो योग्य गोष्टी लवकर शिकेल अशी आशा करूया. 

एकूणच ही मालिका आपलीच कसोटी पाहणारी ठरली. आता पुढे ३-४ महिने आपण एकदिवसीय सामने खेळणार नाही आहोत. आता सगळं फोकस आयपीएल आणि नंतर सुरु होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपवर असेल. विश्वचषक स्पर्धा जिंकायची असेल तर वेगळा विचार करणे आवश्यक आहे. घोडामैदान दूर नाहीये, गरज आहे ते योग्य पावले उचलण्याची. 

– कौस्तुभ चाटे            

To know more about Crickatha