ball

विकेटमुळे चर्चेत राहिलेली मालिका (दैनिक केसरी)

by

अहमदाबाद कसोटी अनिर्णित राहिली. दोन्ही संघातील खेळाडूंनी फलंदाजीचा सर्व करून घेतला. पहिल्या तीन कसोटींमध्ये त्यांना संधीच मिळाली नव्हती, त्याची परतफेड त्यांनी या कसोटीत केली. पाहुण्यांकडून उस्मान ख्वाजा आणि कॅमरून ग्रीनची शतकं आणि भारतातर्फे शुभमन गील आणि विराट कोहली. त्याच जोडीला  भारताच्या पहिल्या डावात अक्षर पटेलचं आणि ऑस्ट्रेलियासाठी दुसऱ्या डावात ट्रेव्हिस हेड आणि मार्नस लाबूशेनची अर्धशतकं महत्वाची ठरली. ऑस्ट्रेलियाचा हा दौरा सुरु झाल्यापासूनच विकेट्सची एवढी चर्चा सुरु होती की विचारात सोया नाही. पहिल्या तीनही कसोटींमध्ये खेळपट्टी म्हणजे मातीचा आखाडा होता. अगदी पहिल्या दिवसापासून चेंडू वळण्याची पूर्ण सोय केली गेली होती. इंदोरच्या तिसऱ्या कसोटीमध्ये तर खासच. पण तीच खेळपट्टी आपल्यावर उलटली, आणि कांगारूंनी आपल्याच खेळीमध्ये आपल्याला हरवल्यानंतर मात्र शेवटच्या अहमदाबाद कसोटीसाठी वेगळीच खेळपट्टी तयार केली गेली. अर्थात तोपर्यंत आपण ही बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खिशात घातली होती. भरीस भर म्हणून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात जवळजवळ प्रवेश केला होताच. आता एक धक्का, आणि आपण अंतिम फेरीत एवढंच बाकी होतं. त्यामुळे या कसोटीसाठी ‘आखाड्याला’ सूट दिली गेली आणि दोन्ही संघातील फलंदाजांनी धावा केल्या. 


आपला WTC अंतिम फेरीतील प्रवेश न्यूझीलंड-श्रीलंका सामन्यावर अवलंबून होता. श्रीलंकेने न्यूझीलंडला २-० असे हरवले असते तरच आपण अंतिम फेरीत पोहोचू शकलो नसतो. श्रीलंकेने न्यूझीलंडला २-० हरवणे ही गोष्ट काही सोपी नव्हती. अर्थात पहिल्या सामन्यात त्यांनी प्रयत्न नक्की केले, पण किवी संघाने त्यांना दाद दिली नाही. न्यूझीलंडने ख्राईस्टचर्च मध्ये लंकेचा पराभव केला आणि इकडे भारताचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित झाला. आता सलग दुसऱ्यांदा भारतीय संघ WTCच्या अंतिम सामन्यात खेळेल. त्या सामन्याला अजून वेळ आहे, पण आत्ता संपलेल्या या भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचा उहापोह करणे तर आवश्यक आहे ना.    

भारताने गेल्या काही वर्षात ऑस्ट्रेलियन संघावर कसोटी क्रिकेटमध्ये नक्कीच वर्चस्व गाजवलं आहे. पण ज्या पद्धतीने आपण ही मालिका जिंकण्याचा अट्टहास केला तो आवश्यक होता का? नागपूर, दिल्ली आणि इंदोर तिन्ही कसोटी फक्त अडीच-तीन दिवसात संपल्या. मान्य आहे की आपल्याला घरी खेळण्याचा फायदा नक्की मिळाला पाहिजे होता, पण इतकाही नाही की कसोटी सामना चौथ्या दिवसाच्या आधीच संपावा? बरं, हा ऑस्ट्रेलियाचा संघ आजवर भारताच्या दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन संघातील सर्वात कमकुवत संघ होता. तरीदेखील आपल्या क्रिकेट बोर्डाला अशा खेळपट्ट्या बनवायची गरज भासली. या विकेट्सवर अश्विन-जडेजाने कमाल केली. दोघेही ठरवून ऑस्ट्रेलियन फलंदाजांना बाद करत होते. तिकडे ऑस्ट्रेलियाकडे देखील नॅथन लायन सारखा विख्यात गोलंदाज होताच. त्याने देखील या मालिकेवर आपली छाप सोडली. जोडीला नवीन आलेले मर्फी आणि कुहनमन यांनी देखील वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. नाही म्हणायला अधून मधून फलंदाजांनी वेगवान गोलंदाजांना काही विकेट्स दिल्या (त्यांना अगदीच एकटं वाटू नये म्हणून असेल कदाचित.) पहिल्या तीनही कसोटी आणि अहमदाबादची कसोटी यामध्ये जमीन अस्मानाचा फरक होता. इंदोरमध्ये कांगारूंनी वेगवान गोलंदाजाच्या ऐवजी चक्क स्पिनर खेळवला. ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या इतिहासात हे असं कधी झालं नसेल. बराच काळ – शेन वॉर्न खेळत असताना तो स्पिन गोलंदाजीचा तंबू एकहाती लढवत असे. पुढेही कांगारूंनी हीच परंपरा कायम ठेवली होती. इंदोरच्या सामन्यात तर तीन फिरकी गोलंदाज खेळलेच, पण पुढे अहमदाबाद मध्ये देखील त्यांनी तोच कित्ता गिरवला. आता यापुढे परत कधी ऑस्ट्रेलियन संघ तीन फिरकी गोलंदाज खेळावेत का हे बघणे देखील महत्वाचे असेल. 


अहमदाबाद कसोटीत २ ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी केलेली कामगिरी खरोखरच कमाल होती. उस्मान ख्वाजा ज्या सहजतेने खेळत होता, त्याचे फटके, त्याचा पेशन्स सगळंच बघण्यासारखं होतं. कॅमरून ग्रीनचं शतक देखील बघण्यासारखं होतं. क्रिकेटच्या तीनही प्रकारात चमकण्याची कुवत त्याच्याकडे आहे. कांगारूंनी दोन दिवस सहजपणे फलंदाजी केल्यानंतर भारतीय फलंदाज त्या खेळपट्टीवर कोलमडले असते तर नवल होतं. या सामन्यात एक वेगळा विराट दिसला. सामन्याच्या आधी तो सचिनची २००४ ची सिडनीची खेळी बघून आला होता का असा प्रश्न पडावा. अतिशय संयमाने त्याने त्याची खेळी उभारली. कोणताही विचित्र फटका न मारता तो एक एक धाव जोडत गेला. त्याला उत्तम साथ दिली ती शुभमन गीलने. त्याची खेळी देखील निर्दोष होती. विराट-रोहित नंतर भारतीय फलंदाजीची धुरा वाहण्यासाठी गील तयार होत आहे का हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. अक्षर पटेल या मालिकेत गोलंदाज म्हणून न चमकता फलंदाज म्हणून चमकला. महत्वाच्या क्षणी त्याने धावा केल्या. राहुल, सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यरचं अपयश जरा त्रास देऊन गेलंच. ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत के एस भरतने यष्टिरक्षण केलं खरं पण तो भारतातील सध्याचा सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक असेल तर अवघड आहे.   

 
असो, आता २ महिने आयपीएल झाली की WTC चा अंतिम सामना इंग्लंडमध्ये होणार आहे. त्यावेळी आपल्याला सर्वोत्तम खेळ करून दाखवावा लागेल. त्यावेळी परिस्थिती वेगळी असणार आहे. ऑस्ट्रेलियन संघ पूर्ण जोशात असेल, कारण ते त्या परिस्थितीशी जास्त चांगले जुळवून घेतात. आपल्या खेळाडूंना (आणि बोर्डाला) आपला वर्कलोड व्यवस्थित हाताळावा लागेल, नाहीतर जून महिन्याच्या सुरुवातीला इंग्लंडमधील हवामान आणि त्या खेळपट्टीवर आपली खऱ्या अर्थाने कसोटी असेल. दोन्ही संघातील खेळाडूंना इंग्लंड मध्ये खेळण्याचा अनुभव नक्कीच आहे. प्रश्न आहे की त्यावेळेचं प्रेशर कोण जास्त चांगल्या प्रकारे हाताळू शकेल. आपल्या खेळाडूंना मागच्या WTC अंतिम सामन्याचा अनुभव आहे. कुठेही वाहवत न जाता, जर चिकाटीने खेळू शकलो तर आपण या सामन्यात चांगली कामगिरी करू शकू. कसोटी क्रिकेटमध्ये ३-४ संघच उत्तम कामगिरी करताना दिसत आहेत. आपण त्या पायरीवर उभे आहोत, गरज आहे ते आत्ताची कामगिरी परत करण्याची, वेगळ्या खेळपट्टीवर, वेगळ्या हवामानात. 


– कौस्तुभ चाटे   

To know more about Crickatha