खेळणार आशिया कप, लक्ष विश्वचषकाकडे
बहुचर्चित आशिया कप क्रिकेट स्पर्धा आता केवळ २ दिवसांवर आली आहे. खरे तर आशिया मधील ही मोठी स्पर्धा म्हटली गेली पाहिजे. आज भारतीय उपखंडातील बहुतेक सर्वच देश आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतात. या वर्षीच्या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ हे संघ सहभागी होणार आहेत, म्हणजे ही खरी तरी भारतीय उपखंडाचीच स्पर्धा आहे. स्पर्धा कधी खेळवायची, कुठे खेळवायची असे सगळे महत्वाचे मुद्दे आणि त्यामुळे होणाऱ्या खंडीभर चर्चा पार पडल्यानंतर पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन देशात हे सामने आयोजित होत आहेत. ३० ऑगस्ट पासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेचे काही सामने पाकिस्तानात तर बहुतेक सर्व महत्वाचे सामने (भारताचे सर्वच) श्रीलंकेत पार पडतील. या स्पर्धंनंतर ३-४ आठवड्यातच विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होईल, त्याची पूर्वतयारी म्हणून या स्पर्धेकडे बघितले जात आहे, आणि त्यामुळे देखील ही स्पर्धा महत्वाची ठरते. नेपाळ वगळता इतर सर्वच संघ विश्वचषकात सहभागी होत असल्याने प्रत्येक संघाला आपली बलस्थाने या स्पर्धेद्वारे तपासून घेता येणार आहेत.
भारतापुरता विचार करायचा झाल्यास, आपल्या गटात पाकिस्तान आणि नेपाळ या दोन संघांचा समावेश आहे. अर्थातच भारत विरुद्ध पाकिस्तान ही लढत किमान २ वेळा होईल याची संयोजकांनी खबरदारी घेतली आहे. अंतिम सामन्यात पुन्हा एकदा हे संघ समोरासमोर आले तर ती तिसरी लढत असेल. काही दिवसांपूर्वीच आपला भारतीय संघ जाहीर झाला, आणि आशिया कप स्पर्धेवर नजर ठेवत आपण आता बऱ्यापैकी विश्वचषकाचा संघ देखील काय असेल याचा अंदाज बंधू शकतो. रोहितच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आता या दोन्ही स्पर्धांसाठी तयार आहे का हा खरा कळीचा प्रश्न आहे. आशिया कप स्पर्धेसाठी झालेल्या संघ निवडीमुळे काही प्रश्न निर्माण झाले आहेत हे नक्की. सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे खेळाडूंच्या तंदुरुस्तीचा. मागच्याच आठवड्यात आपला मॅच फिटनेस दाखवणारे जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा सारखे खेळाडू या संघात आहेत, तर अजूनही आपल्या फिटनेसशी झगडणारे के एल राहूल आणि श्रेयस अय्यर देखील आशिया कप संघाचा भाग आहेत. त्यात काही रिपोर्ट्स प्रमाणे राहूल अजूनही फिट असल्याचे दिसत नाही, त्यामुळे तो एखाद दोन सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. त्यात आपण राहूल कडे यष्टिरक्षकाची जबाबदारी देखील देऊ पाहत आहोत. या दोन्ही खेळाडूंची यो-यो टेस्ट देखील झाली नाहीये असेही सांगितले जात आहे. गेले अनेक महिने ते क्रिकेटपासून दूर आहेत अशावेळी विश्वचषक स्पर्धेवर नजर ठेवून त्यांना या स्पर्धेद्वारे आजमावण्याचे प्रयत्न होत आहेत. एखाद्या खेळाडूला मुख्य प्रवाहात इतक्या लवकर आणण्यामागे बीसीसीआयची काय भूमिका असावी? खेळाडूला दुखापत होणे अपरिहार्य आहे, पण त्या दुखापतीमधून त्याला पूर्ण बरे होऊ देणे, त्याचे नीट पुनर्वसन (Rehabilitation) होणे आवश्यक आहे असे कोणाला नाही का वाटत?
जी गत राहुल आणि अय्यरची तीच काही प्रमाणात बुमराह आणि प्रसिद्धची आहे. अर्थात त्या दोघांनी निदान २ टी-२० सामने खेळून स्वतःला सिद्ध तरी केले आहे. पण तरीही काही प्रमाणात ही एक रिस्क आहेच ना. टी-२० सामन्यात ३-४ षटके गोलंदाजी करणे आणि आशिया कप किंवा विश्वचषकासाठी पूर्णपणे फिट असणे यामध्ये मोठा फरक आहे. एकीकडे या चार खेळाडूंच्या फिटनेसचा प्रश्न उभा आहे, तर दुसरीकडे काही खेळाडूंची निवड का झाली आहे असा प्रश्न पडतो. यात प्रामुख्याने एक नाव समोर आले ते म्हणजे तिलक वर्मा याचे. या गुणी तरुण खेळाडूला संधी मिळावी असे नक्की वाटते, तशी ती त्याला मिळते देखील आहे. पण या एकदिवसीय स्पर्धेसाठी त्याची निवड त्याचे टी-२० क्रिकेटमधले योगदान बघून मिळते आहे. आयपीएलमधील चांगल्या कामगिरीमुळे त्याला भारताच्या टी-२० संघात स्थान मिळाले, आणि तिथे जरा बरी कामगिरी झाल्यानंतर तो जर एकदिवसीय आशिया कप साठी संघात येत असेल तर काही चुकते आहे का? तीच अवस्था सूर्यकुमार यादवची. तो टी-२० क्रिकेटमध्ये भन्नाट खेळतो, पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये मात्र सातत्याने फ्लॉप होतो आहे. अशावेळी इतर काही खेळाडूंना साधी द्यायला हवी होती का? संघातील इतर फलंदाजांची निवड होणार होतीच. किंबहुना त्याच फलंदाजांवर आपल्या संघाची भिस्त असेल. पण विश्वचषक स्पर्धा आणि चौथ्या क्रमांकावर खेळणारा खेळाडू हा आपला प्रश्न कायम असेल. अशावेळी संघाच्या चौकटीत अजिंक्य राहणे सारखा खेळाडू बसू नये याचे नवल वाटते.
वेगवान गोलंदाजांचा विचार करता फारसे काही प्रश्न उद्भवत नाहीत, पण फिरकी गोलंदाजांचे काय. जगातील सर्वोत्तम ऑफ स्पिन बॉलर तुमच्या संघात नसतो? आज बहुतेक सर्वच संघात ३-४ डावखुरे फलंदाज असताना तुम्ही अश्विन सारख्या गोलंदाजाला बाहेर ठेवता? आजच्या संघात रवींद्र जडेजा सारख्या गोलंदाजांची निवड अपरिहार्य आहे, पण त्याच शैलीतल्या अक्षर पटेलला स्थान मिळते? जडेजा आणि अक्षर दोघेही एकाच प्रकारचे फलंदाज आणि गोलंदाज देखील आहेत, मग दोघेही कशाला? चहलला संघात न निवडल्यामुळे देखील प्रश्न उभे राहिले आहेत. पण कदाचित कुलदीप यादवची निवड जास्त अचूक असू शकेल. अर्थात या विभागाकडे बघता रवी अश्विन संघात नाही याचे वाईट वाटते आणि या सांघिक योजनांवर प्रश्न देखील निर्माण होतात.
या स्पर्धेला इतके महत्व येण्याचे कारण म्हणजे आता विश्वचषक स्पर्धा केवळ काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे या आशिया कप संघात खेळणारे खेळाडूच कमी जास्त प्रमाणात विश्वचषक संघात असतील हे निश्चित आहे. सर्वच खेळाडूंना आपली बलस्थाने आजमावण्याची संधी या स्पर्धंद्वारे मिळत आहे. कदाचित म्हणूनच या स्पर्धेसाठी झालेली संघनिवड महत्वाची ठरते. विश्वचषकाची पूर्वतयारी म्हणून बघत असताना हे खेळाडू कशी कामगिरी करतात याकडे लक्ष असेल. खेळाडू चांगले खेळले, दुखापतींपासून लांब राहिले तर ठीकच. पण दुर्दैवाने काही गोष्टी चुकीच्या घडल्या तर विश्वचषकासाठी त्या बदलण्याचा वेळ देखील आपल्याकडे नाही. या निवडलेल्या संघातील १५ खेळाडूच विश्वचषक संघाचा भाग असणार आहेत, त्यामुळे या खेळाडूंवर लक्ष असणे अपरिहार्य आहे.