ball

घोळ चौथ्या क्रमांकाचा

by कौस्तुभ चाटे

विश्वचषक स्पर्धेचं वर्ष आहे. आपला संघ जोरदार तयारी करतो आहे. वेगवेगळ्या स्पर्धा, इतर काही देशांशी द्विपक्षीय मालिका सुरु आहेत. कधी भारतात तर कधी परदेशात भारतीय संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करतो आहे. आणि अशातच चौथ्या क्रमांकावर खेळायला आपल्याकडे एकही धड फलंदाज नाही. त्या क्रमांकावर आपण अजूनही अडखळतो आहोत. त्या क्रमांकावर खेळण्यासाठी योग्य खेळाडूचा शोध सुरु आहे. कधी अमक्याला आजमावून बघ, कधी तमक्याकडे ती जबाबदारी दे असा काहीसा प्रयोग सुरु आहे. ही गोष्ट ऐकल्यासारखी वाटते ना? क्रिकेट रसिकांना तर अगदी अनुभवल्यासारखी वाटत असेल. अहो चार वर्षांपूर्वी, २०१९ च्या विश्वचषकाच्या वेळी हेच तर घडत होतं. इंग्लंडमध्ये झालेल्या त्या विश्वचषक स्पर्धेच्या वेळी आपण चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजासाठी झगडत होतो. अंबाती रायुडू, अजिंक्य राहणे सारख्या फलंदाजांचा विचार सोडून देऊन आपण इतर काही खेळाडूंना मारून मुटकून चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवत राहिलो. के एल राहुल, हार्दिक पंड्या, रिषभ पंत…अहो इतकंच काय पण विजय शंकरला देखील आपण त्या क्रमांकावर खेळवत राहिलो. आणि शेवटी त्याचा व्हायचा तो परिणाम झालाच. आपली सलामीची जोडी एखाद्या सामन्यात चमकली नाही आणि मधल्या फळीवर त्याचा भार आला, तो सामना हातातून गेलाच. उपांत्य फेरीत, न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात हेच घडलं आणि आपण विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडलो. हे सगळं परत आठवायचं कारण म्हणजे २०२३ हे देखील विश्वचषकाचं वर्ष आहे. भारतात होणार विश्वचषक आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे, आणि आपण परत एकदा चौथ्या क्रमांकाच्या खेळाडूसाठी झगडतो आहोत. 


क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर खेळायला येणारा खेळाडू म्हणजे खऱ्या अर्थाने संघाचा कणा असतो. टी-२० क्रिकेटचं जाऊ द्या, पण कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याचं महत्व वेगळंच आहे. सलामीची जोडी टिकून उभी आहे आणि जोरदार खेळ करत आहे, संघाला अपेक्षित धावसंख्या समोर दिसते आहे. अशावेळी तो रन रेट वाढवण्याची जबाबदारी या फलंदाजाची असते. समजा सुरुवातीचे खेळाडू लवकर बाद झाले, आणि सामना गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे झुकत चालला असेल तर आपल्या संघाला चांगल्या स्थितीत घेऊन जाण्यासाठी या फलंदाजालाच प्रयत्न करावे लागतात. कोणत्याही संघाची मधली फळी, जी चौथ्या क्रमांकापासून सुरु होते, बरेचदा संघासाठी महत्वाची कामगिरी करत असते. कदाचित त्यामुळेच हा चौथ्या क्रमांकाचा खेळाडू / फलंदाज महत्वाचा ठरतो. आज क्रिकेट इतकं बदलल्या नंतरही बहुतेक संघ या क्रमांकावर खेळणाऱ्या फलंदाजासाठी आग्रही असतात. पण विश्वचषक इतका जवळ येऊन देखील आपल्याला या विश्वचषकात आपला चौथ्या क्रमांकाचा फलंदाज कोण असेल हे सांगता येत नाही. 

आज भारतीय संघाला दुखापतींचं ग्रहण लागलं आहे. खेळाडू आणि दुखापती हे अगदी जवळचं नातं आहे. आपल्या बाबतीत देखील तेच होतंय. मागच्या वर्षी आपला प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त होऊन नॅशनल क्रिकेट अकॅडमी (NCA) मध्ये दाखल झाला. त्याची दुखापत बरेच दिवस चालली. त्यात आपण त्याला खेळवण्याची घाई केली, आणि नको तेच घडलं. त्याला परत एकदा NCA चा रास्ता पकडावा लागला. त्यानंतर रिषभ पंतचा तो दुर्दैवी अपघात झाला. दुर्दैवाने तो अजूनही स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर आहे. जीवघेण्या अपघातातून तो बाहेर आला हाच मोठा चमत्कार असताना, तो परत स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये कधी येईल हे सांगता येणे अवघड आहे. आपल्या क्रिकेटचा आणि अधिकाधिक सामने खेळण्याचा अट्टहास आपल्या खेळाडूंच्या जीवाशी येतो याचा विचार कोणीच करत नाही. कोलूला जुंपलेल्या बैलासारखे हे खेळाडू वर्षातले बारा महिने खेळत असतात. कधी आंतरराष्ट्रीय मालिका, तर वर्षातले २ महिने न थकता आयपीएल यामुळे खेळाडू शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या देखील कमजोर होतात. गेल्या काही महिन्यात के एल राहुल, श्रेयस अय्यर सारखे खेळाडू NCA च्या वाऱ्या करत आहेतच. आपले तीन प्रमुख फलंदाज (पंत, राहुल आणि अय्यर) जायबंदी झाल्याने आपला चौथ्या क्रमांकाच्या खेळाडूचा प्रश्न सुटला तर नाहीच, पण तो अधिक गहन झाला आहे. रिषभ पंत इतक्या लवकर मैदानावर दिसणार नाहीच, त्यामुळे राहुल आणि अय्यर या दोघांमध्ये चौथ्या क्रमांकासाठी चुरस असेल. 

आपल्या आजच्या विश्वचषक संघाचा विचार करता रोहित, विराट, गील, ईशान किशन सारख्या फलंदाजांचं स्थान पक्कं आहे. हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा किंवा काही प्रमाणात अक्षर पटेल सारखे अष्टपैलू खेळाडू आपली खालची फळी सांभाळतील. एकदिवसीय क्रिकेटमध्ये अजूनही न स्थिरावलेला सूर्यकुमार यादव आणि या फॉरमॅट मध्ये अजिबात न आजमावलेला तिलक वर्मा हे देखील महत्वाचे फलंदाज आहेत, पण आत्ता ऐन मोक्याच्या क्षणी त्यांच्यावर जबाबदारी देता येईल का अशी शंका आहे. अशावेळी आपण फिरून फिरून परत एकदा राहुल आणि श्रेयस अय्यरकडेच येतो आहोत.

विश्वचषकाच्या आधी आपण आशिया कप खेळतो आहोत आणि नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धची एक छोटी मालिका होईल. या एकूण ८-९ सामन्यांमध्येच आपल्याला हा हुकमी एक्का शोधणं आणि तपासणं आवश्यक आहे. राहुल आणि अय्यर अनेक महिन्यांनंतर संघात परत येतील, त्यांचा फॉर्म कसा असेल, त्यांची दुखापत परत डोकं वर काढेल का हे प्रश्न असतीलच. की आपण रोहित-गील कडे सलामीची जबाबदारी देऊन ईशान किशनला चौथ्या क्रमांकावर खेळायला पाठवू? काही दिवसांपूर्वी रवी शास्त्रीने चौथ्या क्रमांकासाठी विराट कोहलीचे नाव सुचवले, तर आपण तसा काही प्रयोग करून बघू असे अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे आहेत. 

आपल्या एकदिवसीय संघाच्या सेटअप मधून आपण काही वर्षांपूर्वी अजिंक्य राहणे सारख्या फलंदाजाला बाहेर फेकलं. वास्तविक तो संघातील सर्वोत्तम फलंदाज होता, अजूनही आहे. चौथ्या क्रमांकावर असलेल्या फलंदाजाची आक्रमकता आणि फलंदाजीचे योग्य तंत्र या दोहोंची सांगड त्याच्याकडे आहे. फॉर्म नाही या कारणास्तव तो एकदिवसीय संघातून बाहेर पडला आणि आपल्याला चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजांचा प्रश्न सतावू लागला. आज तो संघात असता तर हा प्रश्न कदाचित निर्माण झालाच नसता. पण मोकळ्या मानाने त्याला परत संघात सामील करून घेण्याइतका मोठेपणा आपल्याकडे नाही. आणि आता उपलब्ध असलेल्या फलंदाजांमधून योग्य फलंदाज शोधणे हे नक्कीच जिकिरीचे काम आहे. दुर्दैवाने सध्याच्या घडीला आपण अजूनही के एल राहुल आणि श्रेयस अय्यर या दोन फलंदाजांपलीकडे बघू शकत नाहीये. या दोघांनीही तंदुरुस्त होऊन चांगला खेळ करावा आणि भारतीय संघाला विश्वचषक स्पर्धेत चांगले यश मिळवून द्यावे हीच आशा असेल. सध्यातरी त्यांच्याच खांद्यावर चौथ्या क्रमांकाच्या खेळाडूची महत्वाची जबाबदारी आहे. 

To know more about Crickatha