ball

माझा सुनीलदादा

by Hemant Kenkare

क्रिकेट ह्या खेळाविषयीचं माझं प्रेम खूप जुनं आहे. ना ते क्रिकेटच्या बदलत्या स्वरूपांशी निगडित आहे (उलट काही अंशी त्याने क्रिकेटचं नुकसानच केलंय असं मला वाटतं), ना ते कोणत्याही खेळाडूसाठी हपापलेल्या मीडियामुळे कमीजास्त होणार आहे. मी लहान असताना ‘इडियट बॉक्स’ नव्हता. आयुष्य त्या वेळी खूप सोपं होतं, खरं होतं आणि माणसंसुद्धा. ह्या इडियट बॉक्समुळे लोकप्रिय झालेल्या वेगवेगळ्या क्रिकेटच्या स्वरूपांना माझा विरोध नक्कीच नाही. पण कोणता खेळाडू सर्वात जास्त ताकदीने किंवा सर्वात लांब चेंडू मारू शकतो ह्याबद्दलच्या गप्पा मला व्यर्थ वाटतात. माझ्यासाठी क्रिकेट ह्या खेळाची सुरुवात तशी खूपच लवकर झाली, कदाचित मी माझ्या आईला ओळखायला लागलो त्याआधीच. ह्याला कारणीभूत आहे ते म्हणजे मी मुंबईत ज्या वातावरणात वाढलो, जिथे मोठा झालो, तिथली माणसं आणि त्यांचं क्रिकेटप्रेम. ह्या सर्वच माणसांचा माझ्या आयुष्यावर एक मोठा प्रभाव आहे. माझं बालपण मुंबईत ताडदेव भागात गेलं. माझ्या अवतीभवतीचा परिसर हा क्रिकेट, सिनेमा, साहित्य, संगीत ह्या सर्वच गोष्टींनी भारावलेला होता. ही साधारण १९६०च्या जवळपासची गोष्ट. त्या वेळी ह्या सर्वच गोष्टी निरर्थक समजल्या जायच्या. पण तरीही त्या परिसरातली माणसं काही वेगळीच होती. माझ्या घराच्या एक-दीड किलोमीटरच्या परिघात राहणाऱ्या लोकांच्या यादीत अनेक मोठे, नावाजलेले खेळाडू, साहित्यिक, शास्त्रीय गायक, कलाकार आणि असेच अनेक दिग्गज होते. ही सगळीच माणसं त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात ‘लीजण्ड’ होती. आमच्या घराच्या समोरच्याच बिल्डिंगमध्ये सुधीर नाईक होता (त्याला त्याचे मित्र जेम्स म्हणत). सुधीर आणि त्याचे मित्र शेजारीच असलेल्या कंपाउंडमध्ये काँक्रीटच्या खेळपट्टीवर टेनिस बॉलने क्रिकेट खेळत. पुढे सुधीर मुंबईसाठी आणि नंतर भारतासाठीदेखील खेळला. आमच्यासाठी ते कंपाउंड लॉर्ड्सपेक्षा कमी नव्हते, आणि सुधीर त्या लॉर्ड्सवरचा जणू राजाच. माझे दुसरे हिरो होते माझे मामा, द्वारकानाथ ‘बबन’ गावसकर. बबनमामा ग्रेट विनू मंकड ह्यांच्यासोबत क्रिकेट खेळले आहेत. रुईया स्पोर्ट्स क्लबमध्ये ते दोघे एकत्र खेळत. आणि माझा तिसरा हिरो होता… मी बोलणारच आहे त्याच्याबद्दल.

आमच्या घराच्या जवळच भागीरथीबाई बिल्डींग्स नावाच्या इमारती होत्या.  तिथे माझे दुसरे मामा राहायचे, मनोहर गावसकर. माझ्या आईचे थोरले बंधू. मी लहान असताना माझी आई डॉ. सुंदर केंकरे मला माझ्या मामामामींकडे – मनोहर गावसकर आणि मीनल गावसकर ह्यांच्याकडे सोडून तिच्या कामावर जात असे. मी त्या अर्थाने माझ्या मामामामींकडेच मोठा होत होतो. माझं सगळंच लहानपण चिखलवाडीतल्या त्या भागात माझ्या भावंडांबरोबर गेलं. माझी मोठी मामेबहीण नूतन आणि मामेभाऊ सुनील – ह्या कथेचा नायक. सुनील मनोहर गावसकर. माझे मनोहरमामा राहत ते चिखलवाडीमधलं घर तसं मोठं होतं. एक छानसं ३ बेडरूम्सचं ते घर, आणि त्याला लागूनच असलेला तो वऱ्हांडा अजूनही माझ्या नजरेसमोर आहे. आणि घराच्या मुख्य दरवाजाबाहेरच एक निमुळता पॅसेज होता, जिथे सुनीलदादाने त्याचे क्रिकेटचे पहिले धडे गिरवले, कदाचित तिथेच त्याने त्याचे क्रिकेट टेक्निक्स अधिक परिपक्व केले.

मी मोठा होत असताना दादाबरोबर मीदेखील माझी क्रिकेट प्रॅक्टिस करत असे. त्या छोट्याशा पॅसेजमध्ये दादा बॅटिंग करत असताना, पायऱ्यांवर उभा राहून त्याला सीझन बॉल टाकून प्रॅक्टिस देणं हे त्या वेळेचं माझं मुख्य काम होतं. अशा प्रकारे ‘बॉलिंग’ करत असताना अनेकदा माझा खांदा काळानिळा झाला आहे. पण त्याही परिस्थितीमध्ये मला ती क्रिकेट प्रॅक्टिस आवडत असे. कदाचित तिथेच ‘playing with a straight bat’ म्हणजे काय ते नकळतच माझ्या मनावर कोरलं गेलं. पुढे मनोहरमामा दादर पूर्व भागात राहायला गेले, पण ही straight bat ची जादू त्या घरातसुद्धा कायम होती. त्या घरातसुद्धा माझी क्रिकेट सराव करतानाची भूमिका कायम बॉलरची असे, आणि अर्थातच दादा त्याची बॅटिंग प्रॅक्टिस करून घेत असे. त्याही वेळी त्याचा सराव कायम Straight Drive चा असे. फ्लिक, पूल, कट्स आणि इतर फटक्यांना जणू त्या घरात जागाच नव्हती.  दादा तिथे केवळ स्ट्रेट ड्राइव्ह मारत असे, आणि पुढे तोच फटका त्याचा ट्रेडमार्क शॉट झाला. पुढे जेव्हा अनेक क्रिकेट रसिक आणि क्रिकेट पंडित दादाच्या त्या स्ट्रेट ड्राइव्हची तारीफ करत असत, तेव्हा दादाच्या त्या सरावात माझाही थोडा हातभार आहे ह्या विचारानेच माझ्या अंगावर मूठभर मांस चढत असे. माझ्या मामांच्या घरी अनेक पुस्तकांनी, मासिकांनी भरलेलं एक लाकडी कपाट होतं. ते कपाटदेखील मला अतिशय प्रिय होतं. त्या कपाटात अनेकविध पुस्तकं होती, आणि अर्थातच त्यातली अनेक पुस्तकं क्रिकेटला वाहिलेली होती. ह्याच सगळ्या खजिन्यात मला कधी डॉन ब्रॅडमन भेटले, कधी विजय मर्चंट, कधी रोहन कन्हाय तर कधी ५० आणि ६०च्या दशकातले इतर अनेक दिग्गज. मनोहरमामा आणि त्यांचे बंधू अनेक क्रिकेटपटूंच्या गोष्टी अतिशय रंजकतेने सांगत, आणि ह्याच सगळ्या गोष्टींनी माझ्याभोवती क्रिकेट ह्या खेळाचं जाळं विणलं गेलं, ते अजूनही कायम आहे. माझे दोन्ही मामा – सुनीलचे वडील, मनोहर आणि बबनमामा क्लब आणि ऑफिसमध्ये क्रिकेट खेळत. सुनीलचे मामा, माधव मंत्री तर भारतासाठीदेखील खेळले होते. दोन्ही घरांतून बालपणीच त्याला क्रिकेटचे डोस मिळाले होते. 

सुनीलदादाचं मी डोळे झाकून अनुसरण करत असे. तो माझा खऱ्या अर्थाने क्रिकेट हिरो होता. ‘विलक्षण’ ह्या एकाच शब्दात दादाचं वर्णन करता येईल. अनेकदा मी त्याला त्या वऱ्हांड्यामध्ये उभं राहून मॅचसाठी जाताना बघितलं आहे. त्याच्या पांढऱ्या शुभ्र कपड्यात, ती छोटी किटबॅग घेऊन, एक बॅट हातात घेऊन बुटांवरची धूळ झटकत तो जायचा तेव्हाची भावना व्यक्त करणं केवळ अशक्य आहे. मला त्या काळी अगदी दादासारखंच बनायचं होतं. त्या काळी त्याने मुंबईचं शालेय आणि नंतर विद्यापीठ क्रिकेट गाजवून सोडलं होतं. त्या वेळी अनेकदा त्याचा फोटो पेपरमध्ये येत असे. माझे वडील तो फोटो दाखवत, तेव्हा अभिमानानं ऊर भरून येई. 

१९७१ साली दादाची निवड भारतीय संघात झाली, आणि २१-२२ वर्षांचा सुनील गावसकर वेस्ट इंडीज दौऱ्यावर गेलादेखील. पुढे जे घडलं ते अविस्मरणीय आहे. ५० वर्षांपूर्वीच्या त्या दौऱ्यात आपण वेस्ट इंडीजला पहिल्यांदाच हरवलं आणि एक इतिहास रचला. त्या दौऱ्याची सुरुवात करताना दादा एक तरुण खेळाडू म्हणून गेला होता, पण परत आला तेव्हा तो लीजण्ड बनला होता. वेस्ट इंडीजचा संघ मालिका हरला होता, तरीदेखील अगदी त्रिनिदादपासून, जमैका आणि बार्बाडोसपर्यंत सगळ्याच प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतलं होतं. त्याच्यावर कहाण्या रचल्या जात होत्या, कॅलिप्सो गायल्या जात होत्या. दादाला त्या घरातल्या वऱ्हांड्यापासून सुरुवात करताना बघणारा मी एक होतो, आणि आता तोच दादा भारतीय रसिकांच्या गळ्यातला ताईत बनला होता. दादाचे अनेक जवळचे मित्र, मिलिंद रेगे, एकनाथ सोलकर किंवा अशोक मंकड आणि इतरही अनेक दिग्गज खेळाडू दादाच्या ह्या प्रवासाचे साथीदार आहेत. मिलिंद रेगे दादाबद्दल खूप छान सांगतो. तो म्हणतो की सुनील त्याच्या इतर साथीदारांपेक्षा वेगळाच होता. कदाचित इतर काही खेळाडूंमध्ये दादापेक्षा जास्त चांगली गुणवत्ता असेल, पण दादाकडे एक गोष्ट होती, जी त्याला ह्या सर्वांपेक्षा वेगळं ठरवायची, आणि ते म्हणजे दादाकडे असलेली तीव्र महत्त्वाकांक्षा. दादा त्याच्या बॅटिंगकडे वेगळ्याच दृष्टिकोनातून बघत असे. त्याची विकेट घेणं हे एव्हरेस्ट जिंकण्यापेक्षा कमी नव्हतं. त्याला बाद करण्यासाठी गोलंदाजाला भारी किंमत द्यावी लागत असे. कायमच. मीदेखील मुंबईमध्ये थोडंफार क्रिकेट खेळलो आहे. पुढे माझ्या कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकऱ्यांमुळे मी अनेक दिग्गज लोकांना भेटलो. त्यामध्ये सुनीलदादाचे मित्र होते, त्याचे पाठीराखे होते, सिनियर होतेच, आणि त्याचे काही हिरोदेखील होते. सुनीलचा असाच एक हिरो म्हणजे हैद्राबादचा स्टायलिश फलंदाज एम. एल. जयसिंहा. मी त्यांना जयकाका म्हणतो. जयकाकांकडून मला सुनीलदादाच्या अनेक गोष्टी समजल्या. १९७१च्या त्या दौऱ्यात जयसिंहा आणि दादा एकत्र होते. त्याच दौऱ्यात जयसिंहांनी सुनीलला मोठं होताना बघितलं. “त्याची क्रिकेटविषयी निष्ठा आणि प्रेम जगापलीकडे होतं,” जयकाका सांगत. “त्याच दौऱ्यात एका सामन्याआधी सुनीलचा दात दुखावला गेला होता. पण तरीदेखील त्या परिस्थितीतसुद्धा तो खेळला, संघासाठी उभा राहिला. हे सगळं केवळ अवर्णनीय आहे,” दादाचे हिरो सांगत होते. ५० वर्षांपूर्वीच्या त्या दौऱ्याच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. त्या रात्री जेव्हा अजित वाडेकरचा विजयी भारतीय संघ मुंबईत सांताक्रूझ विमानतळावर उतरला त्यानंतरच्या त्या आठवणी शब्दात सांगणं अवघड आहे. तिथे जमलेल्या गर्दीच्या आवाजात जणू त्या विमानांचे आवाज कमी पडत होते. शेवटी वेस्ट इंडीजला हरवून आपण भारतात परतलो होतो. विमानाच्या दरवाजात ती ट्रॉफी घेऊन उभा असलेला सुनील मनोहर गावसकर, अजूनही माझ्या डोळ्यांसमोर तसाच उभा आहे. 

१९७१पासून आजपर्यंत मी दादाच्या अनेक मित्रांना, सहकाऱ्यांना, सिनियर्सना भेटलो आहे. प्रत्येक माणसाने मला दादाचे नवनवीन पैलू उलगून दाखवले. १९८२ साली, मी क्रिकेट क्लब ऑफ इंडियातर्फे ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होतो. आणि मेलबर्नहून अॅडलेडला जाताना, चेक-इन करताना किरण आशर या मुंबईच्या जुन्या खेळाडूने एका खेळाडूशी माझी ओळख करून दिली. त्याच फ्लाईटमध्ये आमच्या बरोबर होते वेस्ट इंडीजचे दिग्गज खेळाडू – सर गारफील्ड सोबर्स. त्या प्रवासात सोबर्स ह्यांनी मला त्यांच्या शेजारी बसण्यास सांगितलं, आणि पुढे साधारण दीड तास ते माझ्याशी दादाविषयी बोलत होते.  त्यांनी १९७१च्या त्या दौऱ्याच्या अनेक आठवणी जागवल्या. सुनील आणि वेस्ट इंडीज प्रेक्षकांचं एक वेगळं नातं उलगडून दाखवलं. त्या वेळी सुनील चांगल्या फॉर्ममध्ये नव्हता. त्याच्या धावा होत नव्हत्या. “काळजी नसावी. सुनीलचं तंत्र अचूक आहे. लवकरच तो फॉर्ममध्ये येईल, आणि खोऱ्याने धावा करेल,” सोबर्स सांगत होते. आणि पुढच्या दौऱ्यात तेच झालं. सोबर्स ह्यांची भविष्यवाणी खोटी ठरली नाही. अॅडलेडच्या विमानतळावर उतरल्यानंतर सोबर्स सरांनी विचारलं, “सुनील आर्मगार्ड का वापरतो आहे? त्याला सांग की तो खरं म्हणजे जास्त चांगला फलंदाज आहे, त्याला आर्मगार्डची गरजदेखील नाहीये.” मी काय बोलणार होतो, साहजिकच माझ्याकडे काहीच उत्तर नव्हतं. मुंबईला परत आल्यावर मी सोबर्स सरांचा निरोप दादाला सांगितला. दादा नुसतंच हसला. “गॅरी असं म्हणाला! त्याच्यासाठी ठीक आहे रे. तो त्याची संपूर्ण करिअर थायपॅड (मांडीला लावण्यासाठी असलेलं पॅड) न लावता खेळला आहे, आणि तेसुद्धा जगातल्या सर्वोत्तम गोलंदाजांसमोर.” दादाच्या  त्या मिश्किल चेहऱ्यावर अजूनच खोडकर भाव होते.  

दादा त्याच्या आवडत्या गोष्टींप्रती, त्याच्या प्रोफेशनप्रती कायमच एकनिष्ठ आहे. तो त्याचं खासगी आणि व्यावसायिक आयुष्य अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळतो. काही वर्षांपूर्वी दादा एका कपड्यांच्या ब्रँडचा Ambassador होता. तो करार संपूनसुद्धा अनेक वर्षे लोटली होती. आत्ता काही दिवसांपूर्वी रोहन त्याला काही कपडे विकत घेण्यासाठी दुसऱ्या एका ब्रॅण्डच्या दुकानात घेऊन गेला. पण सुनीलने त्या ब्रँडचे कपडे विकत घेण्यास नकार दिला. एखाद्या ब्रॅण्डसाठी करार केल्यानंतर त्यांच्याच प्रतिस्पर्ध्यांचे कपडे वापरणे त्याच्या स्वभावात बसत नव्हते. त्याची त्या ब्रॅण्डशी असलेली निष्ठा तो करार संपल्यानंतरसुद्धा कायम होती. 

सुनीलदादाच्या सगळ्याच गोष्टी काही ना काही शिकवून जातात. तो कायमच दादर युनियनसाठी खेळत राहिला. कसोटी क्रिकेट खेळत असताना, आणि देशातला सर्वोत्तम खेळाडू असताना, तसेच निवृत्तीनंतरसुद्धा तो त्याच्या क्लबसाठी कायम तयार असे. त्याने क्लबच्या मॅनेजमेंटला सांगून ठेवले होते, की कधीही गरज असेल तेव्हा मी क्लबसाठी खेळायला येईन. आणि तो आलादेखील. 

१९८५ साली मी एका म्युझिकल कॉन्सर्टच्या निमित्ताने वेस्ट इंडीज बेटांवर होतो. त्या वेळी त्रिनिदादमध्ये असताना एका पार्टीत वेस्ट इंडीजचा सर्वोच्च फलंदाज कोण अशी एक चर्चा रंगात आली होती. सर व्हिव रिचर्ड्स आणि रोहन कन्हाय, दोघांचेही समर्थक तावातावाने वाद घालत होते. अशा वेळी, त्या पार्टीच्या आयोजकाने माझी ओळख करून दिली. मी मुंबईचा आहे, आणि सुनील गावसकर माझा भाऊ आहे हे कळल्यानंतर त्या पार्टीचा रंगच पालटला. रिचर्ड्स आणि कन्हाय समर्थकांचा तो वाद तिथेच मिटला. माझ्या त्या सर्व पार्टी मित्रांनी आपले मद्याचे प्याले उचलले, आणि एकसुरात त्या दिग्गजाला मानवंदना दिली. “Cheers to the Maastah!” ती मानवंदना होती सुनील मनोहर गावसकर ह्या माणसाला. सुमारे १३-१४ वर्षांपूर्वी त्याच वेस्ट इंडीजमध्ये मैदानं गाजवलेल्या त्या लीजण्डला. आणि अभिमानाने, डोळ्यात पाणी आणून ती मानवंदना स्वीकारणारा होता त्याचा आत्येभाऊ, मी. सुनील मनोहर गावसकर, माझा क्रिकेटमधला खरा हिरो!

To know more about Crickatha