केन ‘सुपर कूल’ विलियम्सन (दैनिक ऐक्य)
गोष्ट आहे २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकाची. अंतिम सामन्यात त्याचा संघ खेळत होता. तो संघाचा कर्णधार होता. त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. सामन्याच्या शेवटी त्यांची आणि इंग्लिश संघाची धावसंख्या समान झाली होती. मग सुपर ओव्हर खेळवली गेली. तिथे देखील दोन्ही संघ समसमान होते. शेवटी ज्या संघाने जास्त चौकार मारले त्या संघाला विजेते म्हणून घोषित केलं गेलं. सगळं क्रिकेट जग हळहळलं. पण तो शांत होता. पुढे दोन वर्षांनी त्याच्याच नेतृत्वाखाली त्याचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळत होता. त्या सामन्यात त्यांनी भारतीय संघावर सहज विजय मिळवला. गेल्या जवळजवळ २५-२७ वर्षांमध्ये त्याच्या संघाने पहिल्यांदाच आयसीसीची स्पर्धा जिंकली होती. पण तरीही तो शांत होता. दोन्ही प्रसंगात संपूर्ण क्रिकेट जगताने त्याचा संयम बघितला, तो होता न्यूझीलंडचा कप्तान केन विलियम्सन. खऱ्या अर्थाने सध्याच्या क्रिकेट मधला ‘ सुपर कूल’ केन विलियम्सन.
न्यूझीलंड क्रिकेटला तसं पाहता ग्लॅमर नाही. पण हा किवी संघ वेळोवेळी (खास करून आयसीसी स्पर्धांमध्ये) उत्तम कामगिरी करून क्रिकेट जगतावर आपली छाप सोडत असतो. या संघाने नेहेमीच काही खास स्टार्स दिले आहेत. आणि याच स्टार्स मधलं एक महत्वाचं नाव म्हणजे केन विलियम्सन. केन विलियम्सन म्हणजे खऱ्या अर्थाने क्रिकेटचा कर्मयोगी म्हटला पाहिजे. मैदानावर अतिशय शांत असलेला हा केन, हातात बॅट आली की पूर्णपणे बदलतो. संघासाठी खेळणं, आपलं योग्य प्रकारे योगदान देणं एवढंच माहित असलेला केन संघासाठी सर्वस्व देत असतो. संघाची परिस्थिती गंभीर असो किंवा विजय अगदी समोर दृष्टीपथात असो, केन इथे देखील कर्मयोग्याच्या अविर्भावात आपली जबाबदारी पार पाडतो. वयाच्या १६-१७ व्या वर्षीपासून त्याने चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळायला सुरुवात केली. न्यूझीलंडच्या डोमेस्टिक क्रिकेटमध्ये ‘नॉर्थन डिस्ट्रिक्टस’ संघाकडून पदार्पण केलेल्या केन विलियम्सनने १७ व्या वर्षीच न्यूझीलंडच्या १९ वर्षाखालील संघाचं कर्णधारपद भूषवलं होतं. त्या वयात देखील त्याचे नेतृत्वगुण दिसू लागले होते. उत्तम फलंदाज बनण्याच्या शाळेत तर त्याने आधीच नाव नोंदणी केली होती, पण किवी संघाचं कर्णधारपद देखील त्याला खुणावत होतं. २०१० साली भारताविरुद्ध अहमदाबादला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करतानाच त्याने शतक झळकावलं होतं. बहुतेक संघांविरुद्ध तो अप्रतिमच खेळला आहे, पण खास करून ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि भारताविरुद्ध त्याचा खेळ जास्त खुलत गेला. एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेट मध्ये देखील त्याने वेळोवेळी त्याची चुणूक दाखवली. अगदी आयपीएल मध्ये सनरायझर्स हैदराबाद साठी खेळताना सुद्धा तो त्वेषाने खेळला. कधी सलामीच्या फलंदाजांना साथीला घेऊन तर कधी तळाच्या फलंदाजांबरोबर खेळत तो कायमच संघाला पुढे नेत गेला. मैदानाबाहेर अगदी मित्रासारखा वागणारा केन, मैदानावर मात्र एकदम ‘प्रोफेशनल’ असतो. स्वतःच्या फलंदाजीवर फोकस व्हावा म्हणून कर्णधारपद सोडणारा केन निराळाच.
केन विलियम्सनचा सर्वात मोठा गुण म्हणजे त्याचा शांतपणा. हा मनुष्य मैदानावर कमालीचा शांत असतो. २०१९ च्या विश्वचषकात अंतिम फेरीत त्याच्या संघाबरोबर जे घडलं ते खरं तर कोणत्याही कर्णधाराला वेदना देणारं होतं. पण त्या परिस्थितीत तो शांत होता. त्या पराभवाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर उचलून तो पुढे खेळत राहीला. पुन्हा नव्याने शून्यातून प्रवास सुरु करणारे खूप कमी असतात. या ‘कमी’ लोकांमधलाच तो आहे. पराभव असो अथवा विजय, तो कायमच एक मस्त स्माईलने त्या गोष्टीचा आनंद घेतो. म्हणूनच तो २०१९ विश्वचषकातील पराभवाने खचला नाही, आणि पहिलीच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप जिंकल्यानंतर हुरळून गेला नाही. त्याच्या नेतृत्वाखाली किवी संघाने अनेक विजय बघितले. त्याच्या फलंदाजीचा आनंद घेत अनेक क्रिकेट रसिक सुखावत गेले, पण बर्फासारखा हा ‘कॅप्टन कूल’ कायम तसाच होता. इंग्लिश काउंटी क्रिकेट असेल किंवा आयपीएल, तिथेही तो कायमच १००% योगदान देताना दिसतो. २०१५ च्या विश्वचषकात तो ‘प्लेयर ऑफ द सिरीज’ होता. त्या विश्वचषक स्पर्धेत, शेवटच्या सामन्यातला पराभव सोडला तर किवी संघाने कमाल केली होती, आणि त्यात प्रमुख वाटा होता विलियम्सनच्या १० सामन्यात केलेल्या ५७८ धावांचा.
क्रिकेट जगतात अजातशत्रू असलेले खूप कमी खेळाडू असतील. केन विलियम्सन हे त्यातील एक प्रमुख नाव. केनचे चाहते जगभर पसरले आहेत, आणि खास करून भारतात. त्याचा संयत चेहरा, शांत डोळे, चेहऱ्यावर कायमच असलेलं ते स्माईल आणि सतत विचार करत असणारा तो मेंदू… क्रिकेट रसिकांसाठी केन विलियम्सन म्हणजे एक आदर्श खेळाडू आहे नक्की. हाच केन वेळोवेळी त्याच्यामधल्या माणुसकीचं देखील दर्शन घडवतो. ख्राईस्टचर्च मध्ये झालेला गोळीबार असो, किंवा पेशावर मधील शाळेत लहान मुलांवर झालेला गोळीबार, तो कायमच त्या पीडित व्यक्तींसाठी पुढे आला आहे. पेशावर मधल्या त्या पीडितांसाठी तर त्याने पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेची संपूर्ण मॅच फी दान केली होती.
न्यूझीलंडला क्रिकेटचा मोठा इतिहास आहे. त्यांचे अनेक खेळाडू आता खऱ्या अर्थाने ‘प्रोफेशनल’ आहेत असे म्हणता येईल. अगदी आत्ता आत्ता पर्यंत असंख्य किवी खेळाडू क्रिकेट सोडून इतर वेळात नौकरी करताना दिसत होतेच. कदाचित आता पुढे ते चित्र बदललं असेल. त्या अर्थाने हे खेळाडू ‘प्रोफेशनल क्रिकेटर्स’ असू शकतील. पण किवी क्रिकेटच्या इतिहासात ज्या काही प्रमुख खेळाडूंचं नाव सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाईल त्यात एक प्रमुख नाव असेल ते विलियम्सनचं. न्यूझीलंडचा संघ कायम एक सज्जन संघ म्हणून ओळखला गेला आहे. आणि तीच ओळख पुढे नेणारा केन विलियम्सन क्रिकेट इतिहासात नेहेमीच लक्षात राहील तो सुपर कूल विलियम्सन म्हणूनच. शांत आणि सज्जन खेळाडू म्हणून केन विलियम्सन हे क्रिकेटमधील मूर्तिमंत उदाहरण आहे, आणि ते कायम राहील यात काही शंका नाही.
– कौस्तुभ चाटे