आयपीएलचा ‘इम्पॅक्ट’
इंडियन प्रीमियर लीग….. आयपीएल आता सोळा वर्षांची झाली आहे. आयपीएल हा आता एक मोठा ब्रँड झाला आहे. आयपीएल नंतर जगभर अनेक लीग्स सुरु झाल्या, आणि क्रिकेटचा एकूणच चेहरा मोहरा बदलून गेला हे नाकारून चालणार नाही. खेळाच्या या सर्वात नवीन फॉरमॅट – टी-२० मुळे क्रिकेट बऱ्यापैकी बदललं आहे. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे बरेचदा कसोटी क्रिकेट ‘बोरिंग’ होत होतं, निकाल लागत नव्हते, सामने अनिर्णित राहत असत हे सगळं बदललं. अजूनही आयसीसी स्पर्धांमधले तसेच दोन देशांमधील खेळाचे नियम तसेच ठेवण्यात आयसीसी यशस्वी ठरली आहे. पण या वेगवेगळ्या लीग्समध्ये खेळाचे मूलभूत नियम सारखे असले तरीदेखील, इतर अनेक नियम बदलले जातात. ते नियम त्या त्या लीगपुरते मर्यादित असले तरीदेखील आयपीएल सारख्या मोठ्या स्पर्धांचे नियम हेच प्रमाण मानणे सहज शक्य आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर ‘स्ट्रॅटेजिक टाइम आऊट’ चे देता येईल. हा स्ट्रॅटेजिक टाइम आऊट काही वर्षांपूर्वी आयपीएल मध्ये पहिल्यांदा सुरु केला गेला, आणि आता तो या स्पर्धेचा महत्वाचा भाग झाला आहे. या टाइम आऊटचा प्रत्यक्ष संघाना किती फायदा होतो माहित नाही पण खेळाशी निगडित इतर अनेक जाहिरातदारांना याचा नक्कीच फायदा होतो. असा हा टाइम आऊट आयसीसी विश्वचषकात नसतो, त्यामुळे त्याच्या उपयुक्ततेवर नक्कीच प्रश्नचिन्ह निर्माण होते. असो, मुळात एखाद्या स्पर्धेसाठी काही नियम बदलले जातात आणि त्याचा मोठा ‘इम्पॅक्ट’ या स्पर्धेवर होतो.
या ‘इम्पॅक्ट’ नेच या वर्षीची आयपीएल व्यापून टाकली आहे. ‘इम्पॅक्ट प्लेअर’ हा नियम या वर्षी आयपीएल मध्ये सुरु करण्यात आला आहे. साधारणतः क्रिकेटच्या संघात ११ खेळाडू असतात. या वर्षीपासून सामन्यासाठी संघ निवडताना कप्तानाला ११ ऐवजी १५ खेळाडूंची यादी द्यायची आहे. मैदानावर असलेल्या ११ व्यतिरिक्त इतर खेळाडूंमध्येच हा ‘इम्पॅक्ट प्लेअर’ असेल. सामन्यातील कोणत्याही प्रसंगी संघ मैदानावर असलेल्या ११ मधील एका खेळाडूला बसवून या इम्पॅक्ट प्लेअरला खेळण्याची संधी देऊ शकते. हा इम्पॅक्ट प्लेअर राखीव खेळाडू नसेल, तर संघातील इतर खेळाडूंप्रमाणेच तो बॅटिंग अथवा बॉलिंग देखील करू शकेल. एखाद्या खेळाडूचे स्पेशल स्किल्स (फलंदाजी अथवा गोलंदाजी मधील) वापरण्याची संधी या निमित्ताने संघाला आणि कर्णधाराला मिळेल. उदाहरणार्थ स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने पहिल्यांदा फलंदाजी करत असताना अंबाती रायुडूला संघात स्थान दिले, पण गोलंदाजी करण्याची वेळ आल्यानंतर त्याला बाहेर बसवून वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेला संधी दिली. म्हणजेच चेन्नईच्या संघात गोलंदाजीच्या वेळी एक गोलंदाज वाढला ज्याचा त्या संघाला उपयोग होऊ शकतो. अर्थात कोणत्याही प्रसंगी मैदानावर केवळ ११ खेळाडू असतील हे नक्की आहे.
हा नियम काही अंशी बिग बॅश लीग मध्ये देखील वापरला गेला. आधी म्हटल्याप्रमाणे, जरी हा नियम त्या त्या स्पर्धेपुरता असला तरीदेखील अशा मोठ्या स्पर्धांमुळे असा नियम क्रिकेटचा भाग बनून जातो. अर्थात हा नियम आयसीसीला तसा नवीन नाही. काही वर्षांपूर्वी (२००५-०६ च्या सुमारास) आयसीसीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ‘सुपर सब’ हा नियम आणला होता. तो काही अंशी असाच होता. पण हा नियम फारसा चालला नाही, आणि पुढे एक दोन वर्षातच आयसीसीला तो मागे घ्यावा लागला. आता हा नियम कोणाच्या लक्षात असेल का याबद्दलही शंका आहे. एका अर्थाने या ‘इम्पॅक्ट प्लेअर’ मुळे क्रिकेट देखील बऱ्यापैकी बदलणार आहे. आता कर्णधारांना ११ ऐवजी १५-१६ खेळाडूंसाठी स्ट्रॅटेजी बनवावी लागेल. प्रतिस्पर्धी संघातील कोणता खेळाडू ‘इम्पॅक्ट प्लेअर’ होऊ शकतो याचा विचार करून संघ उभारणी करावी लागेल. क्रिकेट हा आता बऱ्यापैकी मैदानाबाहेर खेळला जातो. प्रत्येक संघात असलेले विविध प्रकारचे कोच, सल्लागार, मेंटॉर या सर्वांमुळे क्रिकेट बऱ्यापैकी बदलत गेलं आहे. हा नियम कितपत योग्य आहे हे येणारा काळच सांगेल.
या वर्षांपासून सुरु झालेला असाच आणखी एक नियम म्हणजे संघांची घोषणा. पूर्वी टॉसच्या आधी दोन्ही कप्तान आपल्या संघाची घोषणा करीत असत. या वर्षीपासून हा नियम देखील बदलण्यात आला आहे. आता संघाची घोषणा टॉस नंतर केली जाते. याचाच अर्थ टॉसच्या वेळी कप्तान दोन वेगवेगळ्या संघांचे कागद (टीम शीट्स) घेऊन टॉसला जातो. प्रथम फलंदाजी आल्यास एक संघ आणि प्रथम गोलंदाजी आल्यास दुसरा संघ अशी संघनिवड केली जाते. अर्थात दोन्ही संघात एखादाच खेळाडू बदललेला असतो, पण कप्तानाला टॉसच्या वेळी या सगळ्याचा विचार करावा लागतो हे नक्की आहे. इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमाप्रमाणेच हा नियम देखील कितपत बरोबर आहे हे येणारा काळच ठरवेल.
टी-२० हा हाणामारीचा फॉरमॅट आहे. या क्रिकेटमध्ये क्रिकेट स्किल्स पेक्षा इतर गोष्टी जास्त महत्वाच्या ठरतात. हे क्रिकेट आणि त्याचे नियम एकप्रकारे गोलंदाजांच्या मुळावर घात घालणारे आहे. याचे फायदे किती, तोटे किती हा वेगळा विषय, पण एकूणच फलंदाजांना धार्जिणे असलेल्या या फॉरमॅट मध्ये खेळलं जाणारं क्रिकेट अनेक रसिकांना न आवडणारं आहे. अर्थात हा फॉरमॅट क्रिकेटचं भविष्य आहे हे देखील नाकारून चालणार नाही. आयपीएल सारख्या स्पर्धेत खेळाचा वेगळा विचार करायला लावणारे हे दोन्ही नियम महत्वाचे ठरतात.
आयपीएलच्या निमित्ताने अजून एका गोष्टीबद्दल बोलावसं वाटतं. आयपीएलमध्ये जाहिरातदार येणार, पैसे लावणार आणि त्याचा खेळाला उपयोग होणार हे निश्चित आहे. हे असे पैसे मिळवूनच लीग मोठी होणार आहे या बद्दलही दुमत नाही. पण खास करून या वर्षी टीव्हीवर दिसणाऱ्या जाहिरातींविषयी बोलावसं वाटलं. आयपीएल सामन्यांच्या वेळी दाखवल्या जाणाऱ्या बहुसंख्य जाहिराती या ऑनलाईन खेळांच्या तरी आहेत अथवा पण मसाल्यांच्या तरी. आयपीएल हा ‘फॅमिली फॉरमॅट’ असेल तर या अशा जाहिरातींचा विचार व्हायला हवा का? घरातील लहान थोरांपासून सगळेच हा सामना टीव्हीवर बघणार असतील – त्यांनी बघावे असे वाटत असेल तर त्या जाहिरातींचा घरातील प्रत्येकावर काय परिणाम होतो आहे हे कोण तपासायचे? की प्रत्येकाने आपल्यापुरते योग्य काय, आणि आपली सीमारेषा कोणती आहे ते ठरवून मगच क्रिकेटचा आनंद घ्यावा? पैशांपुढे, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, पण चुकीच्या गोष्टींचे कुटुंबावर, आणि पर्यायाने समाजावर परिणाम होणार आहेत हे देखील नक्की.
एकूणच २०२३ च्या आयपीएलचा मोठा ‘इम्पॅक्ट’ दिसणार आहे यात काही नवल नाही.
– कौस्तुभ चाटे