दिनेश लाड – मुंबईचे क्रिकेटवेडे गुरु
मुंबई क्रिकेट हे एक वेगळंच रसायन आहे. गेली अनेक वर्षे मुंबईने आपल्याला एकापेक्षा एक उत्तम खेळाडू दिले आहेत. आणि ह्या रत्नांना जोपासणारे, वाढवणारे, त्यांच्यावर मनापासून प्रेम करणारे काही जवाहीर पण मुंबईचेच. आज भारतीय क्रिकेटमध्ये रमाकांत आचरेकर सरांचं नाव मोठा आदराने घेतलं जातं. सरांनी अनेक खेळाडू भारतासाठी दिले आहेत. त्यांचं खेळाडूंवरील प्रेम, त्यांच्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी, कायमच त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची मनोवृत्ती हे सगळंच आश्चर्यचकीत करणारं आहे. आचरेकर सरांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचाच एक शिष्य आज मुंबईसाठी आणि भारतासाठी देखील अनेक गुणवान खेळाडूंना मार्गदर्शन करतो आहे. आज त्यांची २ मुलं भारतीय संघाचा अविभाज्य भाग आहेत. ह्या दोन्ही खेळाडूंनी आपल्या कामगिरीच्या जोरावर भारताला अनेक सामने जिंकून दिले आहेत. ही दोन मुलं म्हणजे रोहित शर्मा आणि शार्दूल ठाकूर, आणि त्यांच्या लहानपणी त्यांना घडवणारे, मोलाचं मार्गदर्शन करणारे त्यांचे गुरु म्हणजे श्री. दिनेश लाड. क्रिककथाच्या निमित्ताने दिनेश लाड सरांशी केलेली ही बातचीत.
प्रश्न: सर, नमस्कार. आपण तुमच्या प्रशिक्षक म्हणून भूमिकेबद्दल बोलणारच आहोत. पण सगळ्यात आधी आम्हाला तुमच्याबद्दल काही जाणून घ्यायचं आहे. तुमचं बालपण, तुमचं खेळाडू म्हणून असलेलं योगदान ह्या बद्दल काही सांगा.
उत्तर: मी मुंबईचा. माहीम मध्ये वाढलो. अगदी सध्या गरीब घरातला मुलगा. क्रिकेट खेळावं अशी परिस्थिती नव्हती, पण क्रिकेटची आवड मात्र खूप होती. साध्या टेनिस बॉल वर क्रिकेट खेळत असे. पण त्यामध्येही चमक होती. मी त्यावेळी मामा कडे राहत असे, मामाकडे लहानाचा मोठा झालो. माझ्या आईचा देखील माझ्या क्रिकेट खेळण्याला खूप पाठिंबा होता .. आज मी जे काय आहे ते केवळ आईमुळे त्याच सुमारास माझी भेट आचरेकर सरांशी झाली. ही गोष्ट आहे १९७७ च्या आसपासची. माझ्याच एका निकटवर्तीयाने मला सरांकडे नेलं होतं. सरांनी माझा खेळ पाहिला आणि दुसऱ्याच दिवशीपासून नेट्सला यायला सांगितलं. आता इथे खरी मजा होती. माझ्याकडे क्रिकेट खेळण्यासाठी योग्य असे कपडे पण नव्हते. आणि ह्याचं उत्तर पण सरांनीच दिलं. त्यांचे क्रिकेटचे कपडे मला दिले, ते अल्टर करून घ्यायला सांगितले. आणि असा माझा सरांकडे अभ्यास सुरु झाला. पुढे जवळ जवळ ४-५ वर्षे मी सरांकडे क्रिकेटचे धडे गिरवत होतो. क्लब लेव्हलच्या अनेक मॅचेस त्यावेळी गाजवल्या. पुढे १९८१-८२ च्या सुमारास भारतीय रेल्वेमध्ये नोकरीला लागलो. पण क्लब लेव्हलच्या पलिकडे खेळाडू म्हणून नाही जाऊ शकलो. एवढं टॅलेंट नक्की होतं की मुंबई रणजी टीम साठी नक्की खेळू शकलो असतो, पण परिस्थिती नव्हती. घरासाठी नौकरी करणं आवश्यक होतं. त्या थोड्या काळात पण आचरेकर सरांचे खूप संस्कार माझ्यावर आहेत. सरांचं इतकं प्रेम होतं, ते मला स्कूटरवर घ्यायला यायचे. मुंबईमध्ये अनेक ग्राऊंड्सवर घेऊन जायचे. खेळण्यासाठी कायम प्रोत्साहन द्यायचे. आज मी खेळाडू म्हणून नाही पण क्रिकेट कोच म्हणून ओळखला जातो आहे त्यामध्ये पण आचरेकर सरांचे संस्कार, त्यांचा मोठा हातभार आहे हे नक्की.
प्रश्न: पण मग ह्या सगळ्यामध्ये क्रिकेट प्रशिक्षणाकडे कसे वळलात?
उत्तर: निव्वळ अपघाताने. माझी रेल्वेमधली नौकरी सुरूच होती. एका बाजूला जमेल तसं क्रिकेट पण सुरु होतं. एकदा मला एका मित्राने – – नितीन परुळेकरने उन्हाळ्याच्या सुट्टीमधल्या क्रिकेट प्रशिक्षण वर्गासाठी विचारलं. गोरेगावच्या एका क्लबला उन्हाळी वर्गासाठी दीड महिना क्रिकेट प्रशिक्षक हवा होता. मी सुरुवातीला नाहीच म्हणालो होतो, पण नंतर वाटलं की करून बघू, एक-दीड महिन्याचा तर प्रश्न आहे. १९९२ ची गोष्ट आहे ही. त्या उन्हाळी सुट्टीमध्ये क्रिकेट प्रशिक्षण सुरु झालं, नंतर त्याच क्लबने प्रशिक्षणासाठी विचारलं, आणि क्रिकेट कोच म्हणून सुरुवात झाली. पुढे मला त्यात मजा पण येत होती आणि आनंद तर नक्कीच होता. सगळ्यात मुख्य म्हणजे माझी क्रिकेटची नाळ अजून घट्ट होत होती. नंतर ३-४ वर्षांनी बोरिवलीच्या स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल कडून विचारणा झाली. आणि तेंव्हापासून शाळेबरोबर क्रिकेट कोचिंग सुरूच आहे. शाळेसाठी प्रशिक्षण करणं हा पण चांगला अनुभव आहे. ह्या मुलांना घडवणं ह्यात मला जास्त आनंद मिळतो. शाळेचे मुख्य श्री. योगेश पटेल ह्यांनी पण खूप सहकार्य केलं. व्यक्तिशः माझ्यावर आचरेकर सर आणि मनोहर सुर्वे सरांचा खूप मोठा पगडा आहे. मी दोघांकडेही शिकलो आहे. आणि त्यांनी शिकवलेल्या अनेक गोष्टी मी माझ्या प्रशिक्षणात उतरवण्याचा प्रयत्न करतो. मुंबईचं स्कूल क्रिकेट वेगळ्याच दर्जाचं आहे. आणि त्यात मुंबई उपनगरातून एक शाळा इतकी पुढे घेऊन जाणं…मला वाटतं ह्यात खूप काही आलं.
प्रश्न: माझा प्रश्न तोच होता…. हे स्कूल क्रिकेट किती महत्वाचं आहे?
उत्तर: स्कूल क्रिकेट नक्कीच महत्वाचं आहे. शालेय वयात होणारे संस्कार खूप महत्वाचे असतात, फक्त क्रिकेटच नाही, पण कोणत्याही क्षेत्रात. मी कायमच मुलांना क्रिकेटसाठी प्रोत्साहीत केलं. माझं क्रिकेटवेड होतं कदाचित, पण मी कायम अश्या गुणवान मुलांच्या शोधात असायचो. ह्या मुलांनी आपल्या शाळेसाठी खेळावं ह्या साठी मी कायम प्रयत्नशील असायचो. मला शाळेची एक खडूस टीम बनवायची होती. मुंबई क्रिकेटमध्ये खडूस शब्दाला खूप महत्व आहे. तेच मला शाळेसाठी करायचं होतं. आधी तर आमच्या शाळेत ग्राउंड पण नव्हतं. आम्ही तसाच सर्व करायचो. जमेल तशी बॅटिंग आणि बॉलिंग ची प्रॅक्टिस चालायची. मग हळू हळू एक सिमेंट विकेट आम्हाला मिळाली. छोटं का होईना पण ग्राउंड मिळालं आणि शालेय क्रिकेटचा प्रवास सुरु झाला. हो पण एक आहे, क्रिकेट खेळत असले तरी सगळ्या मुलांनी नीट अभ्यास केलाच पाहिजे ह्याकडे देखील माझं लक्ष असायचं. क्रिकेटमुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ नये हे पण महत्वाचं आहे.
प्रश्न: आणि मग अशी शाळेसाठी मुलं शोधतानाच रोहित शर्मा भेटला का?
उत्तर: हो. आम्ही बोरिवली मध्ये एक मॅच खेळत होतो आणि समोरच्या टीम मध्ये एक ऑफस्पिन टाकणारा लहान मुलगा दिसला. मला तो आवडला. त्याच्यामध्ये एक वेगळाच स्पार्क वाटला. त्याचे काका त्याच्याबरोबर होते. मी त्यांना विनंती केली की ह्याला आमच्या शाळेत घेऊन या. तिथे त्याची ऍडमिशन करू, तो शाळेसाठी क्रिकेट सुद्धा खेळेल. ते आले पण शाळेत. पण हे कुटुंब अगदीच गरीब होतं. शाळेची फी भरण्यासाठीचे पण पैसे नव्हते. मग मी पटेल सरांशी बोलून त्याची फी माफ करून घेतली. रोहित शाळेकडून खेळत होता. चांगला ऑफस्पिन टाकायचा. सुरुवातीला अनेक दिवस मी त्याला बॅटिंग करू दिली नाही, पण एकदा नेट्समध्ये त्याला बॅटिंग करताना पाहिलं. तो चांगले कनेक्ट करत होता. मग पुढे त्याच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित केलं. मला वाटतं ही १९९९ ची गोष्ट असेल. पुढे रोहित स्कूल क्रिकेटमध्ये बॅटिंग करत होता. ती २-३ वर्षे त्याने चांगली गाजवली. त्याच काळात आम्ही हॅरिस शिल्ड मध्ये शारदाश्रमला हरवलं. त्यांना हरवणारा आमचा उपनगरातला पहिला संघ होता. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे त्या मॅचच्या वेळी आचरेकर सर माझ्या शेजारी होते, ते शारदाश्रमचे प्रशिक्षक होते. त्यांचा संघ तो सामना हरला खरा, पण सरांनी मला कौतुकाची थाप दिली. माझ्यासाठी ती खूपच महत्वाची गोष्ट होती.
प्रश्न: शार्दुलचं काय? तो कुठे गवसला?
उत्तर: तोही असाच एका स्पर्धेत. आमच्या विरुद्ध संघातून खेळत होता. आणि त्याने जबरदस्त कामगिरी केली होती. तेंव्हाच त्याला विचारलं की आमच्या शाळेत येशील का. त्याच्या आई वडिलांचा विरोध होता, आणि ते साहजिकच आहे. शार्दूल पालघरचा. आमची शाळा बोरिवलीत. जवळजवळ ८० किलोमीटर अंतर होतं. रोजचे ५-६ तास फक्त रेल्वेच्या प्रवासात जाणार. शक्यच नव्हतं. पण मला हा मुलगा खूपच आवडला होता. त्याची इथे मुंबईमध्ये पण काही सोय होत नव्हती. शेवटी एकदा माझ्या पत्नीशी बोललो, आणि मग शार्दुलला आमच्याच घरी ठेवूया असा निर्णय घेतला. त्याच्या पालकांना थोडं समजवावं लागलं, पण तेही तयार झाले. पुढे शार्दूल आमच्या घरी राहिला. खूप लोकांनी विरोध केला ह्या गोष्टीला. माझा मुलगा-मुलगी दोघेही आता मोठे होते, शार्दुलच्याच वयाचे. पण मी ठाम होतो. शार्दूल जवळ जवळ एक दीड वर्ष आमच्या घरी होता. अगदी घरातल्या सारखं वावरला. सिद्धेश आणि त्याची चांगली दोस्ती झाली.
प्रश्न: आणि रोहित? तो पण तुमच्या घरी राहायचा ना?
उत्तर: नाही तो घरी नाही राहायचा पण जवळंच होता. त्याचे आई वडील डोंबिवली मध्ये होते. तो आमच्याकडेच असायचा, हक्काने जेवायला घरी असायचा. तो पण कुटुंबाचा एक भाग झाला होता. अजूनही आम्ही भेटलो की त्या दिवसांची आठवण काढतो. खूप छान दिवस होते. पुढे त्याचं कुटुंब आमच्याच शेजारीच राहायला आले. त्याच्या घरी नॉन व्हेज काही चालत नसे, पण मग माझी पत्नी त्याच्यासाठी करून ठेवायची, आणि तो पण अगदी आवडीने खायचा. शार्दूल असतानाच अजून एक मुलगा – आतिफ अत्तरवाला, तो पण आमच्या घरी राहायला होता. तो आता मुंबई रणजी संघात आहे. माझी दोन मुलं, शार्दूल आणि आतिफ … अगदी भावंडांसारखी राहिली. धमाल, मजा मस्ती, क्रिकेट प्रशिक्षण आणि तेवढाच शाळेचा अभ्यास सुद्धा. त्यांचे लाड पण केले, आणि शिस्तसुद्धा होतीच.
प्रश्न: सर, हे भन्नाट आहे. क्रिकेटसाठी इतकं? तुमच्या घरच्यांना, खास करून पत्नीला ह्या सगळ्याचं क्रेडिट दिलं पाहिजे.
उत्तर: प्रश्नच नाही. ती होती म्हणून हे सगळं झालं. तिने कधीही तक्रार केली नाही. मुलांनी देखील नाही. ह्या सगळ्याच मुलांमध्ये एक स्पार्क होता, आणि त्यांचे प्रॉब्लेम्स पण मला कळत होते. आणि क्रिकेट हे माझ्यासाठी पॅशन आहे. मी कधीही त्याच्याकडे व्यवसाय म्हणून बघितलं नाही. ही मुलं माझ्याकडे राहिली, मी त्यांच्याकडून, त्यांच्या आई वडिलांकडून कधीही पैसे घेतले नाहीत. ना कधी शाळेकडून प्रशिक्षणाचे घेतले. आत्त्ता पण नाही घेत. देवकृपेने माझी नौकरी नीट सुरु होती, घर व्यवस्थीत होतं. कधीही ह्या गोष्टींकडे पैसे कमावण्याचं साधन म्हणून विचार पण केला नाही. आजही मुलं येतात, ती गरीब आहे की अब्जावधी वडिलांचं पोर आहे, ह्याचा कधीच विचार करत नाही. मुलात काही चांगले गुण असतील तर ते जोपासण्याचा, त्याचं कौशल्य सुधारण्याचा प्रयत्न करतो. कदाचित माझ्या गुरूंकडून मी हेच शिकलोय.
प्रश्न: सर आज मुलांच्या आई वडिलांच्या पण अपेक्षा खूप वाढल्या आहेत. त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता?
उत्तर: खरंय. आता क्रिकेट हा व्यावसायिक खेळ झाला आहे. खेळात पैसे आले आहेत. एका अर्थाने चांगलं आहे हे, पण पालकांच्या अपेक्षा पण अवाजवी असतात. आपल्या मुलाने IPL खेळावा हीच अपेक्षा असते. त्यात चूक काही नाही, पण मुलाची तेवढी कुवत आहे का ते सुद्धा बघितलं पाहिजे. माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक पालकाला मी हेच सांगतो, मग तो गर्भश्रीमंत असेल किंवा अगदी साध्या घरातला असेल. मी त्या मुलांच्या आर्थिक स्थितीकडे पाहत नाही. मला जर त्या मुळात गुणवत्ता दिसली तर मी त्याच्यासाठी काहीही करायला तयार आहे. पण अनेकदा पालक विनंती करतात, कि तुम्ही त्याला कोचिंग करा म्हणजे त्याचं क्रिकेट सुधारेल. मी अनेक मुलांना कोचिंग करायचं नाकारलं आहे, कारण मला त्या मुलांमध्ये तो स्पार्क दिसला नाही. कित्येक पालक मुलांसाठी प्रायव्हेट कोचिंग लावतात. मला ते पण नाही पटत. मुळात जर गुणवत्ता असेल ना तर तो नक्की चमकेल. ह्या प्रायव्हेट कोचिंग मध्ये कधी कधी पालक स्वतःचंच नुकसान करून घेतात. अजून एक गोष्ट म्हणजे मी पालकांना सांगेन की मुलाच्या प्रशिक्षणामध्ये फार ढवळाढवळ करू नका. प्रत्येक मूल हे नदीचं पाणी आहे, योग्य ठिकाणी ते वाहत जाणार. त्याचे प्रशिक्षक त्याला नक्की घडवतील, आणि समजा मुलगा क्रिकेट मध्ये नाही प्रवीण झाला तरी तो दुसरीकडे कुठेतरी प्राविण्य मिळवेलच ना. कदाचित दुसऱ्या काही क्षेत्रात त्याचं यश असेल. आणि तुम्हाला मुलाला क्रिकेटपटूच बनवायचं असेल तर थोडा संयम असू द्या, मुलाला त्याचं त्याचं घडण्यासाठी वेळ द्या. त्याच्यासाठी हा एक मोठा अभ्यास आहे, त्या अभ्यासात व्यत्यय आणू नका. एखादा वयाच्या १७ व्या वर्षी चमकतो, एखादा २०व्या. त्यांना त्यांच्या गुणवत्तेवर काम करू द्या. मुलगा १४-१६ च्या वयोगटात पुढे नाही जाऊ शकला, किंवा चमकला नाही तर निराश होऊ नका. त्याच्या प्रशिक्षकाचा जर मुलावर विश्वास असेल, दोघांचीही मेहनत घ्यायची तयारी असेल तर तो मुलगा पुढे नक्की चमकेल. हे वय त्याच्या प्रशिक्षणाचं आहे, त्यावर भर द्या. आणि एक लक्षात घ्या, सचिन तेंडुलकर १०० वर्षात एकदाच होतो. तुमच्या मुलाची तुलना कोणाही बरोबर करू नका.
प्रश्न: सर, पुढे काय? रोहित, शार्दूल आणि बाकी तुमच्या विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या?
उत्तर: अपेक्षा काही नाही. त्यांनी खेळत राहावं, खेळाचा आनंद घेत राहावा. मी सिद्धेशला पण हेच सांगतो. आज तो रणजी खेळतोय, IPL खेळला आहे. सतत स्वतःमध्ये सुधारणा करत राहणं महत्वाचं आहे. रोहित आणि शार्दुलची प्रतिभा जगणे बघितली आहे. आज ह्या सगळ्यांनीच खूप भरभरून आनंद दिला आहे. आणि मी पण मला जमेल तितका काळ क्रिकेट प्रशिक्षण करतंच राहीन. ह्या साध्या चेंडूफळीच्या खेळणे खूप काही दिलंय. मी त्याच्यासाठी इतकं तर नक्कीच करू शकतो. माझी अपेक्षा काय असेल तर ती सरकारकडून. मी आत्ता ज्या मैदानावर प्रशिक्षण घेतो ते मैदान खूप छोटं आहे. एक मोठं मैदान मिळावं ह्या साठी मी सरकार दरबारी दार ठोठावतो आहे. ह्या मोठ्या मैदानामुळे आमच्या मुलांचा खेळाचा, सामन्यांचा एक मोठा प्रश्न सुटणार आहे हे नक्की. आजवर माझी जवळजवळ ८० मुलं मुंबईसाठी वेगवेगळ्या वयोगटात खेळली आहेत. आणि मला खात्री आहे की मोठ्या मैदानामुळे ही संख्या अजूनच वाढेल. त्यामुळे मी सरकारला नम्र आवाहन करू इच्छितो की एक चांगले मोठे मैदान मला उपलब्ध करून द्यावे. आणि माझ्या हातून अशी क्रिकेट सेवा घडत राहावी.
सर, तुमचं कौतुक करावं तितकं कमी आहे. तुमची सगळीच मुलं क्रिकेटमध्ये चमको आणि तुमचं नाव अजून आदराने घेतलं जावो एवढीच अपेक्षा करतो. आणि अर्थातच तुमची मोठ्या मैदानाची इच्छा देखील लवकर पूर्ण होऊ दे. धन्यवाद सर.
दिनेश लाड … मुंबई क्रिकेट मध्ये आणि आता भारतीय क्रिकेट मध्ये आदराने घेतलं जाणारं नाव. मोठी माणसं साधी असतात, ऐकून होतो, आज अनुभव पण घेतला.