या सम हा (दैनिक केसरी, पुणे)
ही गोष्ट आहे १९७६ ची. लंडनमध्ये ओव्हल मैदानावर कसोटी सामना सुरु होता, इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज. वेस्ट इंडिजचा संघ त्या दौऱ्यात प्रचंड फॉर्म मध्ये होता. एक वेगळाच जोश घेऊन ते खेळत होते. अशातच एका तरुण तडफदार खेळाडूने त्या सामन्यात फलंदाजीची धुरा सांभाळली. तसं त्याला वेस्ट इंडिज संघात येऊन २ वर्षे झाली होती. त्याच्या नावावर अनेक उत्तम खेळी होत्या, शतके होती. पण त्या मालिकेत आणि खास करून त्या सामन्यात त्याचा खेळ जास्तच बहारदार होत होता. १ बाद ५ या धावसंख्येवर खेळायला आलेल्या या खेळाडूने त्या दिवशी मैदान गाजवून सोडलं. ३८ चौकारांच्या साहाय्याने त्या सामन्यात त्याने तब्बल २९१ धावा केल्या. टोनी ग्रेगच्या गोलंदाजीवर त्याचा त्रिफळा उडाला नसता तर त्या दिवशी त्याचं त्रिशतक नक्की होतं. त्या नंतरही त्याने अनेक अप्रतीम खेळी केल्या. पण १९७६ ची त्याची ती ओव्हल मैदानावरील खेळी कदाचित त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी आणि परिपूर्ण खेळी म्हणता येईल. त्या फलंदाजाचं नाव होतं ‘सर आयझॅक व्हिव्हियन अलेक्झांडर रिचर्ड्स’ उर्फ व्हिव रिचर्ड्स. ‘किंग’ या टोपण नावाने तो ओळखला जायचा. आणि त्याचं मैदानावर चालणं, धावणं आणि एकूणच वावरणं हे राजा सारखंच असायचं. व्हिव्हियन रिचर्ड्स या माणसाने १९७४-७५ ते १९९२-९३ हा काळ नुसता गाजवला नाही, तर क्रिकेट रसिकांच्या मनावर अधिराज्य केलं. आपण अनेकदा वेस्टइंडीजच्या त्या तुफानी माऱ्याबद्दल बोलतो. आपल्या बोलण्यात कायम होल्डिंग, मार्शल आणि गार्नर असतात. पण १९७५ ते १९९५ या काळात जेंव्हा वेस्टइंडीज क्रिकेटचे सर्वोत्तम प्रदर्शन करत होते, तेंव्हा त्यांची फलंदाजी याच माणसाच्या खांदयावर उभी होती.
रिचर्ड्सचा जन्म अँटिगाचा (७ मार्च १९५२). आधी अँटिगा, मग लिव्हर्ड आयलंड, कंबाइंड आयलंड आणि मग वेस्ट इंडिज असा प्रवास साधारण ४-५ वर्षांचा. १९७४ साली त्याने भारताविरुद्ध कसोटी क्रिकेट मध्ये पदार्पण केलं, आणि दुसऱ्याच कसोटीत – दिल्ली मध्ये त्याने नाबाद १९२ धावांची खेळी केली होती. त्या मालिकेत त्याने ५ कसोटी सामन्यात ३५३ धावा केल्या होत्या. तिथून रिचर्ड्स नावाचं वादळ सुरु झालं ते कधी शमलंच नाही. १२१ कसोटीमध्ये ५० च्या सरासरीने ८५४० धावा, त्यामध्ये २४ शतकं आणि ४५ अर्धशतकं. १८७ एकदिवसीय सामन्यात ४७ च्या सरासरीने ६७०० धावा, त्यामध्ये ११ शतकं आणि ४५ अर्धशतकं ही रिचर्ड्सची क्रिकेट मधली आकडेवारी. आणि हे आकडे अत्यंत खुजे वाटावे असं मैदानावरील व्यक्तिमत्व. तो मैदानात फलंदाजीला यायचा तोच राजाच्या आविर्भावात. छाती बाहेर काडून त्याची ती चाल, शर्टची वरची बटणं सोडलेली, हातात बॅट आणि नजरेत जरब, तोंडात च्युईंग गम… त्याचा मैदानावरील आवेश कायमच राजासारखा असायचा. हा माणूस ३० वर्षे नंतर जन्माला आला असता तर कदाचित टी-२० क्रिकेट त्याने गाजवून सोडलं असतं. त्याची बॅट मैदानावर बरसायला लागली की भल्याभल्यांची भंबेरी उडायची. वेस्ट इंडिज, इंग्लंड, भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड… कोणताही देश, कोणतंही मैदान त्याला व्यर्ज नव्हतं. तो खेळत असताना अनेक उत्तमोत्तम फलंदाज क्रिकेट जगतात होते, पण व्हिव रिचर्ड्स या माणसाची दहशत अजूनही क्रिकेट जगतावर आहे. ‘तो आला, त्याने पाहिलं… त्याने जिंकलं’ ही उक्ती रिचर्ड्सच्या बाबतीत तंतोतंत लागू होते. तो मैदानावर यायचा, गार्ड घ्यायचा. पुढे विकेटवर जाऊन एक दोन वेळा पाहणी करायचा, मैदानाकडे चौफेर पाहायचा आणि मग फलंदाजी सुरु करायचा. कदाचित तो क्षण प्रतिस्पर्धी संघासाठी सगळ्यात महत्वाचा असायचा, कारण त्यांच्यापुढे काय वाढून ठेवलं आहे ते हा ‘किंग’च ठरवायचा. तो लवकर बाद झाला तर ठीक, अन्यथा गोलंदाजी करणाऱ्या संघाचा दिवस संपलेला असायचा. त्याचे फटके, खास करून हूक आणि पूल खास बघण्यासारखे असायचे.
रिचर्ड्स जगभर खेळला. कौंटी क्रिकेट मध्ये तो सॉमरसेट कडून जवळजवळ १२-१३ वर्षे खेळला. पुढे २-३ वर्षे ग्लॅमॉर्गन कडून देखील तो खेळत असे. तो ऑस्ट्रेलियन क्रिकेट मध्ये क्वीन्सलँड कडून खेळला. वेस्ट इंडिज साठी तर जगभर खेळत होताच. १९८३-८४ मध्ये तो कारकिर्दीच्या शिखरावर असताना त्याला दक्षिण आफ्रिकेत खेळण्याची ऑफर मिळाली होती. त्या काळात वर्णद्वेषी धोरणांमुळे सर्वच देशांनी आफ्रिकेवर बहिष्कार टाकला होता. जगभरातील क्रिकेट संघ (आणि इतरही खेळ, खेळाडू) आफ्रिकेत जात नसत. अशावेळी अनेक देशातील क्रिकेटपटूंना मोठमोठे पैसे देऊन आफ्रिकेत खेळण्यासाठी बोलावत असत. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्टइंडीज संघातील अनेक खेळाडू पैशांच्या मोबदल्यात आफ्रिकेत खेळायला जात असत. या मालिकांना ‘रेबेल टूर्स’ अर्थात ‘बंडखोर मालिका’ म्हणत असत. या अशा पैसेवाल्यांची नजर रिचर्डसकडे गेली नसती तरच नवल. ८० च्या दशकाच्या सुरुवातीला जेव्हा वेस्ट इंडिजचा संघ २ वेळा आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला, त्यावेळी रिचर्ड्सच्या समोर कोरा चेक ठेवण्यात आला होता. रिचर्ड्सने फक्त रक्कम सांगायची होती. पण हा किंग रिचर्ड्स बधला नाही. दक्षिण आफ्रिकेच्या वर्णद्वेषी धोरणांच्या विरोधात त्याने एक प्रकारे केलेलं बंडच होतं. ज्या समाजाने काळ्या लोकांना, खेळाडूंना मान्यता दिली नाही, त्या समाजात सर व्हिव रिचर्ड्सने पाऊल ठेवलं नाही. आफ्रिकेने ती धोरणे झुगारायला, आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पुनरागमन करायला १९९१ साल उजाडलं. पण तरीही पुढे अनेक वर्षे तो दक्षिण आफ्रिकेत गेला नाही. फक्त पैशांचा विचार न करता आपल्या तत्त्वांशीही प्रामाणिक असलेला तो क्रिकेटपटू होता.
रिचर्ड्स बद्दल लिहावं तितकं थोडं आहे. वेस्टइंडीजच्या गोलंदाजांसारखंच त्यानेही कधी स्लेजिंग नाही केलं. त्याची बॅट, त्याचे हावभाव आणि मुख्य म्हणजे त्याचे डोळेच प्रतिस्पर्धी संघाला नामोहरम करण्यासाठी पुरेसे असायचे. प्रतिस्पर्धी संघांनीही त्याला फारसं डिवचल्याचं लक्षात नाही. एकच किस्सा सांगतो. कौंटी क्रिकेटमध्ये टॉन्टन मैदानावर एक सामना सुरु होता. त्या सामन्यात रिचर्ड्स फलंदाजी करत होता. खरं तर त्यावेळी तो अजिबात फॉर्म मध्ये नव्हता. गोलंदाजांची आणि त्याची झटपट सुरु होती. कसाबसा तो आपली विकेट वाचवण्याचे प्रयत्न करत होता. अशावेळी गोलंदाजाने टाकलेला एक बाउन्सर त्याला चकवून विकेटकीपर कडे गेला. गोलंदाजाला वाटलं आता आपण रिचर्ड्सला डिवचलं की मिळालीच विकेट. तो रिचर्ड्सला म्हणाला. “तो चेंडू ना लाल रंगाचा आहे, गोल आहे, लेदरचा आहे आणि आता तुला त्याचा वास पण आला असेल ना.” रिचर्ड्सने ते ऐकलं फक्त. गोलंदाज पुढचा चेंडू टाकायला आला, आणि त्याने टाकलेला तो चेंडू परत एकदा बाउन्सर होता. तो रिचर्ड्सच्या डोळ्यासमोर आला, तेंव्हा रिचर्ड्सने बॅट फिरवली, हूक केला, आणि चेंडू मैदानाबाहेर असलेल्या नदीत पडला. आता ‘किंग’ गोलंदाजाकडे येऊन म्हणाला “तो चेंडू कसा दिसतो हे तू मगाशीच सांगितलंस. जा, बाहेर गेलेला तो चेंडू घेऊन ये.” तो राजा होता.
आज विव्ह रिचर्ड्सने वयाची ७१ वर्षे पार केली आहेत. त्याने क्रिकेट खेळणे बंद करून देखील ३० वर्षे झाली आहेत. पण तो अजूनही क्रिकेट रसिकांच्या मनात कायम आहे. या ‘किंग व्हिव’ कडे बघून एकंच गोष्ट मनात येते. झाले बहू, होतीलही बहू… परी या सम हा !!
– कौस्तुभ चाटे