या सम हा !
दिवस होता ६ जून १९९४. इंग्लिश काउंटी क्रिकेट मध्ये एजबॅस्टन मैदानावर खेळताना वॉर्विकशायरचा एक फलंदाज चांगलाच फॉर्मात होता. आज त्या पट्ठ्याच्या मनात काही वेगळंच होतं. डरहम विरुद्धच्या या सामन्यात आज त्याची बॅट बोलत होती. बघता बघता या फलंदाजाने ५०० धावांचा टप्पा गाठला होता. अशी खेळी करणारा जागतिक क्रिकेटमधील हा पहिलाच फलंदाज होता. वेस्टइंडिज कडून खेळणारा हा खेळाडू काही वेगळाच होता. दीड महिन्यापूर्वीच (१८ एप्रिल १९९४) याच फलंदाजाने कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंड विरुद्ध ३७५ धावांची खेळी केली होती. अर्थातच त्या खेळाडूचं नाव म्हणजे ब्रायन चार्ल्स लारा. फर्स्ट क्लास क्रिकेट मधला त्याचा ५०१ धावांचा विक्रम अबाधित आहे. ३७५ धावांचा विक्रम मोडला गेला खरा, पण पुढे काही महिन्यातच लाराने परत एकदा त्याच इंग्लंड विरुद्ध, त्याच अँटिगा रिक्रिएअशन ग्राउंड वर ४०० धावा करून तो विक्रम स्वतःच्या नावावर केला. फर्स्ट क्लास क्रिकेटमधील ५०१ आणि कसोटी क्रिकेटमधील ४०० धावा या आजमितीला फलंदाजाने केलेल्या सर्वोच्च धावा आहेत. हा विक्रम कोणी मोडेल अशी शक्यता देखील नाही. वेस्ट इंडिज क्रिकेट म्हटलं की आपल्याला १९७०-८० चा सुवर्णकाळ आठवतो, ते महान गोलंदाज आठवतात, क्लाइव्ह लॉइडचा तो संघ आठवतो, अष्टपैलू गॅरी सोबर्स आठवतो, किंग रिचर्ड्स आठवतो… त्याच जोडीला ब्रायन लारा या माणसाने वेस्टइंडीजच्या सरत्या काळात केलेली फलंदाजी, वेळोवेळी संघासाठी केलेली खेळी आणि क्रिकेट मधलं त्याचं योगदान देखील आठवतं. वेस्टइंडीज, आणि क्रिकेटच्या इतिहासात ब्रायन लाराचं स्थान ध्रूवताऱ्या सारखं आहे. क्रिकेट प्रेमींना निखळ आनंद देण्याचं काम ब्रायन लाराने केलं.
लाराचा जन्म सांताक्रूझ, त्रिनिदादचा, २ मे १९६९. वयाच्या सहाव्या वर्षी लहानग्या ब्रायनचे वडील त्याला हाताला धरून क्रिकेट शिकायला घेऊन गेले. तिथून हा प्रवास सुरु झाला. वयाच्या चौदाव्या वर्षी त्याने फातिमा कॉलेज मध्ये प्रवेश घेतला आणि इथे खऱ्या अर्थाने त्याच्या क्रिकेटला गती मिळाली. बघता बघता त्याने त्रिनिदादचं शालेय क्रिकेट गाजवायला सुरुवात केली. त्याच वर्षी त्याची त्रिनिदाद युवा संघासाठी निवड झाली आणि पुढच्या वर्षी (वयाच्या १५ व्या वर्षी) तो वेस्टइंडीजच्या १९ वर्षांखालील संघाचा भाग होता. पुढे त्रिनिदाद कडून फर्स्ट क्लास क्रिकेट मधलं पदार्पण देखील गाजलं. आपल्या दुसऱ्याच सामन्यात त्याने बार्बाडोसच्या गोलंदाजांची धुलाई केली होती. बार्बाडोसच्या त्या संघात जोएल गार्नर आणि माल्कम मार्शल होते, ते देखील पूर्ण भरात असलेले. इथेच वेस्टइंडिज क्रिकेटमध्ये लाराचा उदय झाला होता. हा खेळाडू काही विलक्षण आहे याची जाणीव झाली होती. २ वर्षानंतर, म्हणजे १९९० साली त्याने पाकिस्तान विरुद्ध एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुरुवातीला थोडा जम बसल्यानंतर त्याने आपले दाखवायला सुरुवात केली. आपल्या पाचव्याच कसोटीत, १९९३ मध्ये, बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध त्याने सिडनीला २७७ धावांची रास रचली. हे त्याचं कसोटी क्रिकेटमधील पहिलं शतक. कदाचित त्याच्या अगदी जवळचं (म्हणूनच त्याने मुलीचं नाव देखील सिडनी ठेवलं.) तो खेळत गेला, धावा करत गेला. डावखुऱ्या फलंदाजांकडे नैसर्गिकच एक नजाकत असते. लाराकडे ती ठासून भरलेली होती. मैदानाच्या चारी दिशांना अप्रतिम फटके मारण्याची त्याची कला फार कमी फलंदाजांना जमली. बटरच्या लादीतून अलगदपणे सूरी फिरवावी इतक्या नजाकतीने तो त्याची बॅट फिरवत असे. अर्थात, त्याच्या बॅटने केलेले घणाघाती घाव देखील गोलंदाजांना कायम लक्षात राहावेत असे असत.
ब्रायन लारा चांगली १६-१७ वर्षे अप्रतिम क्रिकेट खेळला. वेस्टइंडीज क्रिकेटला वरदान आहे ते गुणवत्तेचं. या बेटांवरून आलेल्या खेळाडूंनी क्रिकेटला भरभरून दिलं आहे. पण त्याचबरोबर इतर काही खेळांच्या प्रभावामुळे हे क्रिकेट हळूहळू संपत चाललं आहे. आता तर टी-२० च्या जमान्यात वेस्टइंडीजचा संघ कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट जणू विसरलाच आहे. त्याच बरोबर वेस्ट इंडिज क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या देशांमधील आपापसातले वाद, त्यात होणारं राजकारण हा देखील एक एक महत्वाचा भाग. त्यातच कमी मिळणाऱ्या पैशांमुळे खेळाडू इंग्लिश काउंटीला (आणि आता फ्रँचाइज क्रिकेटला) प्राधान्य देत असत. हे पैशांचे निखारे कायमच पेटते असतात, पण या अशा निखाऱ्यातूनच लारासारखे क्रिकेटपटू वर येतात. लारा भरात असताना जागतिक क्रिकेटमध्ये काही महान गोलंदाज होते. अक्रम, वकार, मॅकग्रा, वॉर्न, कुंबळे, डोनाल्ड, पोलॉक, मुरली ही त्यातली काही प्रमुख नावं. लाराने या प्रत्येका विरुद्ध धावा केल्या. १९९९ मध्ये त्याने बार्बाडोसला ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद १५३ धावा करताना आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. आजही ती खेळी महान खेळींपैकी एक म्हणून गणली जाते. लाराने कसोटी क्रिकेटमध्ये एकूण ३४ शतकं केली आहेत, पैकी १९ वेळा त्याने १५० धावांचा टप्पा ओलांडला आहे. हे आकडेच त्याचा फलंदाज म्हणून कसा आणि किती प्रभाव होता हे सांगायला पुरेसे आहेत. १२ एप्रिल २००४ हा दिवस लारासाठी आणि क्रिकेटसाठी देखील खास. याच दिवशी लाराने कसोटी क्रिकेटमध्ये ४०० धावांची खेळी केली होती. जवळपास १३ तास तो मैदानावर उभा होता. सुरुवातीला इंग्लिश गोलंदाजांचे घाव झेलत त्याने आपल्या संघाला एक चांगली धावसंख्या उभारायला मदत केली. ४३ चौकार आणि ४ षटकारांनी नटलेली ती खेळी क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी म्हटली पाहिजे.
ब्रायन लाराचं कौतुक हे मैदानावरील आकड्यांनी नाही होणार. त्याने क्रिकेट रसिकांना दिलेला आनंद असा आकड्यात नाही मोजता येणार. त्याने क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक संघाविरुद्ध धावा केल्या, प्रत्येक देशात केल्या. तो मैदानावर आहे इथेच क्रिकेट रसिक सुखावत असे. वेस्टइंडीज बेटांवर क्रिकेटच्या मोसमात मैदानावरचा जल्लोष बघण्यासारखा असे. अशावेळी मद्याच्या आणि संगीताच्या तालावर नाचणाऱ्या त्या कॅरेबियन प्रेक्षकांना खरी झिंग चढत असे ती लाराच्या फलंदाजीची. त्याच्या बॅटचा संवाद सुरु झाला की हा प्रेक्षक बेभान होऊन नाचत असे. सोबर्स, लॉइड आणि रिचर्ड्सच्या जमान्यातलं क्रिकेट १९९० च्या दशकात कुठेतरी हरवत चाललं होतं. त्या हरवलेल्या क्रिकेटला परत एकदा मैदानाकडे आणण्याचं काम लाराने केलं. एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटला योग्य तो आदर देत ब्रायन लारा मैदानावर त्याची कामगिरी करत गेला. खंत एकच, त्याच्या समकालीन महान खेळाडूंप्रमाणे (अक्रम, मुरली, सचिन, पॉन्टिंग इ.) विश्वचषकाचा टिळा त्याच्या भाळी नाही लागला. पण प्रेक्षकांनी आणि क्रिकेट रसिकांनी दिलेलं प्रेम त्याच्यासाठी कदाचित जास्तच मोठं असेल.
ब्रायन चार्ल्स लारा – त्याने वयाची ५४ वर्षे नुकतीच पूर्ण केली आहेत. क्रिकेटच्या या महान फलंदाजाने रसिकांना भरभरून दिलं आहे. लाराची ही कारकीर्द बघताना एवढंच म्हणावसं वाटतं … ‘झाले बहू, होतीलही बहू, परी या सम हा’.
– कौस्तुभ चाटे