सामनाधिकारी (मॅच रेफरी) म्हणजे काय रे भाऊ?
मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की मी क्रिकेट सारख्या खेळात काही नाव कमावू शकलो. क्रिकेट ह्या खेळाने मला बरंच काही दिलंय. माझ्या वयाची ८-१० वर्षे मी महाराष्ट्रासाठी क्रिकेट खेळलो. पण जेंव्हा मी डोमेस्टिक क्रिकेट खेळताना रणजी ट्रॉफी किंवा इतर काही सामने खेळायचो तेव्हा सामनाधिकारी (मॅच रेफरी ) ह्या माणसाशी फारसा संबंध कधी आला नाही. त्यावेळी हे पद म्हणजे फक्त निरीक्षकाची भूमिका बजावणारी एक व्यक्ती बसवली आहे अशीच ओळख असायची. गेला काही काळ मी बीसीसीआय साठी सामानाधिकारी म्हणून काम करतो आहे. अश्यावेळी खऱ्या अर्थाने मला ह्या पदाची जाणीव होत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
मला वाटतं भारतीय क्रिकेटमध्ये सामनाधिकारी ह्या पदाकडे पाहण्याचा दृष्टिकोन साधारणपणे २०१० साला नंतर बदलला असे म्हणायला हरकत नाही. भारतामधून अनेक पंच आयसीसी (इंटरनॅशनल
क्रिकेट काउंसिल) च्या पॅनल वर पाठवण्यास सुरुवात झालीच होती. आणि त्याच सुमारास सामनाधिकारी म्हणून आयसीसी (इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल) च्या नियमावलीनुसार पार पाडावी लागणारी जबाबदारी आणि त्या नियमावलींशी संलग्नता साधायची प्रक्रिया आपल्या इथेही सुरु झाली. ह्या संपूर्ण प्रक्रियेसाठी सायमन टॉफेल सारख्या नामांकित आंतरराष्ट्रीय पंचाची सल्लागार पदी नेमणूक केली गेली होती. त्याच सुमारास भारतीय क्रिकेटमध्ये तांत्रिकदृष्ट्या अनेक महत्वाचे बदल पाहायला मिळत होते. भारतामधील अंतर्गत सामन्यांमधील पंचांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी सामन्यानंतर व्हिडिओ पाहण्याची सोय उपलब्ध होऊ लागली. तांत्रिकदृष्ट्या इतरही काही बदल घडवण्यामध्ये स्टॅन्ली सलढाना (महाराष्ट्राचे माजी रणजीपटू) ह्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी बनवलेल्या ‘मॅच ऍनालिसिस सॉफ्टवेअर’ चा वापर अंतर्गत क्रिकेट सामन्यांमध्ये सुरु झाला. मैदानावर कॅमेरे लागण्यास सुरुवात झाली. यामुळे पंचांच्या कामगिरीचे मूल्यांकन अधिक चांगल्या पद्धतीने होऊ लागले.
२०१४ पर्यंत आपल्या अंतर्गत सामन्यांमधे ‘स्टेट असोसिएशन; मुख्यतः माजी खेळाडूंची सामनाधिकारी किंवा निरीक्षक म्हणून निवड करीत असत. सायमन टॉफेल ह्यांनी सामनाधिकारी निवड प्रक्रियेमध्ये एक आमूलाग्र बदल घडवून आणला. त्यांनी तत्कालीन सामनाधिकारी आणि नवीन होतकरू सामनाधिकारी यांच्यासाठी एका परीक्षेचे आयोजन केले होते. तब्बल २ तास चालणाऱ्या या परीक्षेची प्रमुख अट म्हणजे ती व्यक्ती माजी रणजी खेळाडू हवी. त्या व्यक्तीने किमान २५ रणजी सामने खेळलेले असायला हवेत आणि निवृत्त होऊन ५ वर्षे झालेली असावीत. या परीक्षेसाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ने माझे नाव सुचवले आणि मी परीक्षा आणि त्यासाठी आयोजित केलेले वर्कशॉप (कार्यशाळा) ह्यामध्ये सहभागी झालो. त्या वातावरणात पाय ठेवल्यापासूनच आम्हा सर्वांचे मूल्यांकन होण्यास सुरुवात झाली. गमतीची गोष्ट म्हणजे हे आम्हाला नंतर समजलं. आमच्या छोट्या छोट्या गोष्टींवर बारीक नजर ठेवली जायची. एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा एखाद्याचा दृष्टीकोण कसा आहे, अवघड परिस्थिती हाताळायची क्षमता कशी आहे. कोण काय पद्धतीने इतरांशी संवाद साधत आहे (सामनाधिकारी म्हणून संवाद कौशल्य हा अतिशय महत्वाचा गुण आहे.) परीक्षार्थीला नियमांची माहिती आहे का. अशा अनेक गोष्टींकडे लक्ष ठेवले जायचे.
खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर ही गोष्ट करावी असा फारसा विचार केला नव्हता कारण त्याकाळी पंचांना जास्त महत्व असे. तुम्हाला जर सर्वोच्च स्तरावर हे पद मिळवायचे असेल तर त्यासाठी तुम्ही आंतरराष्ट्रीय सामने खेळले असणे गरजेचे आहे. त्यामुळे त्या पदावर पोचणे अतिशय जिकिरीचे काम आहे. पण जेव्हा एमसीए ने माझे नाव सुचवले तेव्हा सुनील गुदगे, श्याम ओक, नीलिमा जोगळेकर यांच्यासारख्या अनुभवी लोकांचे लाभलेले मार्गदर्शन माझ्यासाठी नक्कीच फायद्याचे ठरले. ह्यामध्ये माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे म्हणजे ज्या खेळावर आपले प्रेम आहे त्या खेळाशी निगडीत असलेले काम करायला मिळणे आणि दुधात साखर म्हणजे मान असलेले पद मिळणे. आपण ज्या खेळासाठी इतकी मेहनत घेतली आहे त्याचे फळ चाखण्याचा आनंद काही औरच.
जसे प्रत्येक क्षेत्रामध्ये आव्हाने असतात तसेच सामनाधिकारी ही भूमिका देखील कठीणच. इथेही सातत्याने आमचे मूल्यमापन होत असते. सामान्य क्रिकेटप्रेमींच्या नजरेतला सामनाधिकारी म्हणजे मैदानावरच्या घडामोडींवर लक्ष ठेवणारा आणि नाणेफेकी च्या वेळी हजेरी लावणारा माणूस… ! पण प्रत्यक्षात सामानाधिकारी म्हणजे सामना सुरु होण्याआधी आणि सामना संपल्यानंतर मैदानाबाहेर घडणाऱ्या गोष्टींचे व्यवस्थापन करणारी व्यक्ती. उदाहरणच द्यायचे झाले तर, पंचांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे आहे का? सर्व सुविधा बीसीसीआयने नमूद केलेल्या नियमांना धरून आहेत का? स्टेट असोसिएशनने दिलेल्या त्यांच्या संघाच्या खेळाडूंच्या यादीची पडताळणी करणे, स्टेट असोसिएशनने खेळाडूंना पुरवलेल्या सुविधांवर देखरेख ठेऊन त्यावर रिपोर्ट बनवणे. असे प्रत्येक सामन्यागणिक आम्हाला तब्बल आठ-नऊ वेगवेगळे रिपोर्ट्स बनवावे लागतात. त्याचबरोबर खेळपट्टी कशा प्रकारची होती? बाउन्स किती होता? आऊटफिल्डचा दर्जा कसा होता? खेळाडूंना दिले जाणारे जेवण, संघाला दिली जाणारी ट्रान्सपोर्टची सुविधा, महिला खेळाडूंना मिळत असलेल्या सुविधा ह्या सर्व गोष्टी बीसीसीआयच्या मापदंडाला धरून आहेत का? यामध्ये काही कमतरता आढळली तर सामनाधिकारी म्हणून स्टेट असोसिएशनच्या सचिवांबरोबर चर्चा करून प्रश्न सोडवावे लागतात. हल्ली खेळामध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराविरोधी नियम खूप कडक आहेत. ते सर्व नियम पाळले जात आहेत ना याची देखील चाचपणी करण्याची जबाबदारी नेमून दिलेल्या भ्रष्टाचारविरोधी अधिकाऱ्याची असते खरी, पण या सर्व गोष्टींचा अहवाल हा शेवटी सामनाधिकाऱ्याकडेच येत असतो. छडी नसलेला हेडमास्तरच म्हणा हवं तर!!
सामानाधिकारी म्हणून आमची खरी धावपळ म्हणाल तर ती सुरु होते सामना सुरु होण्याचा दोन दिवस आधी. ह्या वेळी सामन्याचे पंच, सामनाधिकारी, भ्रष्टाचारविरोधी अधिकारी आणि दोन्ही संघाचे कप्तान ह्यांच्यामध्ये एक मिटिंग होते. ह्या मिटिंगचा उद्देश एवढाच की संघ कप्तानांना आणि इतर अधिकाऱ्यांना सामन्यासाठी काय काय सुविधा उपलब्ध आहेत याची माहिती पुरवणे हा असतो . दोन्ही संघानी ‘स्पिरिट ऑफ द गेम’ ह्या संकल्पनेला धरून खेळण्यासाठी प्रेरणा देणे महत्वाचे असते. विशेषतः ही मिटिंग म्हणजे सामानाधिकाऱ्यासाठी दोन्ही संघांच्या कप्तानांशी संवाद साधण्याची आणि चांगले संबंध प्रस्थापित करण्याची नामी संधी असते. आणि इथे आमचे संवादकौशल्य अतिशय महत्वाचे ठरते. इथे एक अभिमानाची गोष्ट सांगायची म्हणजे आपले क्रिकेट बोर्ड हे जगातील एकमेव बोर्ड आहे ज्यांनी अंतर्गत सामन्यांसाठी सुद्धा मैदानावर ६-६ कॅमेरे बसवले आहेत. व्हिडीओ अनॅलिस्टच्या मदतीने सर्व कॅमेरे योग्य त्या जागी आणि योग्य त्या कोनात (अँगल्स) मध्ये बसवले आहेत किंवा नाही ह्याची खात्री करावी लागते. ह्या कॅमेऱ्यांचा उपयोग सामन्याच्या प्रत्येक महत्वाच्या क्षणांचे विश्लेषण करताना होतो. थोडक्यात सांगायचे तर अनेक कलाकार एक सामना पार पाडण्यासाठी अथक श्रम घेत असतात आणि ते कलाकार त्यांची कामे चोख बजावत आहेत ना ह्याची जबाबदारी येते सामानाधिकाऱ्याकडे असते. बरेचदा सामन्याचे ठिकाण, तिथले हवामान इत्यादी गोष्टी विचारात घेऊन सुद्धा काही निर्णय घ्यावे लागतात. उदाहरणार्थ, भारताच्या पूर्व भागात हिवाळ्यात सामना असेल तर तिथे सूर्यास्त लवकर होत असल्याने सामना थोडा लवकर सुरु करावा लागतो. उद्दिष्ठ एकच, “खेळ सुरळीत पार पाडणे, खेळ आणि खेळाडूंना जास्तीत जास्त वेळ मिळून सामन्याचा निकाल लागणे”.
बरं सामनाधिकाऱ्याला एवढ्याच गोष्टींकडे लक्ष्य द्यावे लागते का? तर नाही !! खरी कसरत असते ती म्हणजे सामना ‘कोड ऑफ कंडक्ट’ ला अनुसरून सुरु आहे ना ह्यावर नजर ठेवणे. पण स्पर्धात्मक खेळ म्हणल्यावर खेळाडूंचे गैरवर्तन, वादविवाद अश्या अनेक गोष्टी घडत असतात. ह्याला “आपण हिट ऑफ द मोमेन्ट” म्हणतो. तसेच षटकांची कमी गती, जोरदार अपील करणे (Excessive Appealing), मैदानावरील अतिआक्रमकता अश्या प्रकारच्या अनेक नियमबाह्य कृती घडतात आणि सामनाधिकारी म्हणून नियमानुसार खेळाडू आणि कप्तान ह्यांच्याकडून दंड आकारावे लागतात. असे निर्णय घेताना खेळाडूंबद्दल असलेली माहिती खूप महत्वाची असते. काही खेळाडू जात्याच खट्याळ असतात, त्यांना नीट हाताळावे लागते. अश्यावेळी आपल्या गाठीशी असलेला क्रिकेटचा अनुभव प्रचंड कामी येतो. एखाद्या खेळाडूने काही नियमबाह्य कृती केली असेल तर खेळाडूच्या गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार किती दंड भरावा लागेल ह्याची माहिती खेळाडूला द्यावी लागते. खेळाडूने चूक कबूल केली तर उत्तमच पण बरेचदा खेळाडू आपण केलेली कृती ही चुकीची आहे हे मान्य करत नाहीत. खेळाडू स्वतःची बाजू मांडतो, सामनाधिकारी त्याच्याकडे उपलब्ध असलेले व्हिडिओ पुरावे म्हणून सादर करतो आणि जणू काही कोर्टात खटला भरला आहे असे वातावरण निर्माण होते. म्हणूनच मघाशी म्हणल्याप्रमाणे खेळाडूंशीच जर आपण चांगले संबंध प्रस्थापित केले तर खेळाडू सुद्धा पंचांना आणि अधिकाऱ्यांना मान देतात. अशावेळी मैदानावरील आणि बाहेरील अनेक सहज सुटतात आणि ह्या सगळ्यांचीच मदत सामना सुरळीत पार पडण्यास नक्कीच होते. एक खेळाडू, खेळ प्रेमी आणि सामानाधिकारी म्हणून एकमेकांबद्दल आणि खेळाप्रती आदर निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे.
सामना संपला म्हणजे जबाबदारी संपली असे होते का? तर नाही. बरेचदा खुपश्या गोष्टी मैदानावर न ताणता मिटवल्या जातात आणि त्यात पंचांचाही सिंहाचा वाटा असतो. पण कधी कधी एखादा खेळाडू मैदानाबाहेर (ऑफ द फिल्ड) काही वादग्रस्त वक्तव्य करतो तेव्हा सुद्धा आम्हाला त्या खेळाडूवर नियमानुसार कारवाई करावी लागते. आजकाल सोशल मीडिया वर अनेक गोष्टी सांगितल्या जातात आणि त्यात जर एखाद्या खेळाडूने वादास तोंड फुटेल असे काही वक्तव्य केले असेल तर तिथे सुद्धा आम्हाला मध्यस्थी करावी लागते. खूप छोटे छोटे नियम असतात आणि मैदानावर किंवा मैदानाबाहेर होणाऱ्या प्रत्येक घटनेवर आम्हाला करडी नजर ठेवावी लागते. खूप छोट्या गोष्टींकडे बारकाईने पाहावे लागते. कधी एखाद्या सामन्याच्या वेळी तिसरा अंपायर नसेल तर तो रोल सुद्धा आम्हालाच पार पाडावा लागतो.
आता तुम्ही विचाराल की ह्या सगळ्या गोंधळात पंचांचे मूल्यमापन कसे होते? ह्यामध्येही प्रचंड स्पर्धा आहे.आम्हाला पंचांबद्दल सुद्धा एक रिपोर्ट बनवावा लागतो. त्यात बारीक सारीक तपशील लिहावे लागतात कोणत्या क्षणी पंचाने कोणता निर्णय घेतला? तो निर्णय कसा घेतला? त्या क्षणाचे व्हिडीओ जोडावे लागतात. विद्यार्थ्यांना शाळेत जसे परीक्षेत गुण दिले जातात त्याप्रमाणे वेगवेगळ्या मापदंडानुसार पंचांना सुद्धा ग्रेड्स दिल्या जातात. त्यानुसार कोणत्या पंचाला बढती द्यायची हे प्रत्येक सिझनच्या शेवटी ठरवले जाते. एवढेच नाही तर सामानाधिकाऱ्याच्या कामाचे देखील मूल्यांकन केले जाते. आमच्याबद्दलचे रिपोर्ट्स आणि इतर अधिकाऱ्यांनी (पंच, अनॅलिस्ट इत्यादी) दिलेला फीडबॅक आमचे गुण ठरवतो. सामनाधिकारी म्हणून सॉफ्ट स्किल्स आणि आचरणाला अनन्यसाधारण महत्व आहे. त्याच धर्तीवर बरेचदा स्टेट असोसिएशनचे सदस्य आमचा परफॉर्मन्स रिपोर्ट बीसीसीआयकडे पाठवतात. दर वर्षी आमच्यासाठी एक कार्यशाळा (वर्कशॉप) आयोजित केले जाते. इथे आम्हाला नियमांमधले बदल सांगितले जातात. वेगवेगळ्या गोष्टी, त्या त्या वेळेची परिस्थिती कश्या प्रकारे हाताळावी ह्याबद्दल प्रशिक्षण दिले जाते. आपल्या देशात आत्ताच्या घडीला साधारणपणे ७०-७२ सामनाधिकारी कार्यरत असतील. प्रत्येकाला वेगवेगळ्या स्तरावरील क्रिकेट सामन्यात भूमिका पार पाडावी लागते. अगदी १६ वर्षांखालील क्रिकेट सामन्यांपासून ते देशातील सर्वोच्च, म्हणजेच रणजी ट्रॉफी सामान्यांपर्यंत वेगवेगळ्या स्तरांवर सामानाधिकारी म्हणून काम करावे लागते. बीसीसीआय मार्फत पार पाडली जाणारी ही प्रोसेस अतिशय प्रोफेशनल आहे.
आता थोडेसे वेगळ्या विषयावर बोलायचे झाले तर सामनाधिकारी म्हणून सात वर्षाच्या माझ्या कारकिर्दीमध्ये वेगवेगळे अनुभव आले. तसे पाहायला गेलो तर वाईट अनुभव नाहीच असे म्हणलं तरी वावगं ठरणार
नाही. ह्याचे प्रमुख कारण म्हणजे उत्तम व्यवस्थापन. पण काही आव्हाने नक्कीच उभी राहतात. विशेषतः जर एखादा सामना जर छोट्या जिल्ह्यात किंवा शहरात आयोजित केला असेल तर ती आव्हाने अधिक जाणवतात. कारण तिथल्या व्यवस्थापनाला नियम, मापदंड याची फारशी माहिती नसते पण त्यांची खेळाप्रती असलेली भावना आणि आवड नक्कीच वाखाणण्याजोगी असते. त्यांच्या छोट्या गावात सामना आयोजित झाला आहे हीच त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची बाब असते. प्रेक्षकांची संख्याही तुफान असते. त्यामुळे सर्व लोक जीव ओतून परिश्रम करत असतात.
असाच एक गमतीशीर आणि कायम लक्षात राहणारा किस्सा मला आठवतोय. ओडिसा मध्ये बोलांगिर नावाचा एक छोटा जिल्हा आहे. तिथे एकदा एक सामना आयोजित करण्यात आला होता. आपल्याकडे देशांतर्गत क्रिकेटमध्ये अशी पद्धत आहे की खेळाडूंना मॅच फी म्हणून रोख रक्कम दिली जाते जेणेकरून त्यांना ते पैसे लगेच वापरता यावेत. पण सामन्याचा दिवस अगदी तोंडावर आला असताना आपल्या देशात नोटबंदी (डिमॉनिटायझेशन) घोषित झाली. आता झाली का पंचाईत !! खेळाडूंना रोख रक्कम कशी द्यायची हा यक्षप्रश्न उभा राहिला. पण तिथल्या असोसिएशनचे प्रमुख हे अतिशय उत्साही आणि जिद्दी व्यक्तिमत्व. त्यांनी धडपड करून कलेक्टरला भेटून नवीन चलनी नोटा मिळवल्या आणि सामना सुरळीत पार पाडला.
असेच एकदा गुवाहाटीला एक सामना होता आणि नेमके त्याचवेळी तिथे दंगली उसळल्या. अशा प्रसंगी सामना सुरळीत पार पडणे हे मोठे आव्हान असते. त्यासाठी बरीच धावपळ करावी लागली. खेळाडूंची सुरक्षितता लक्षात घेऊन स्टेट असोशिअन, बीसीसीआय, स्थानिक पोलीस यांच्यामध्ये सातत्याने समन्वय साधून सामना निर्विघ्नपणे आणि कोणत्याही प्रकारची सनसनाटी बातमी होऊ न देता पार पाडला गेला.
हल्ली अंतर्गत स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये बरेचदा आयपीएल खेळलेले आणि स्वतःचे स्थान निर्माण केलेले खेळाडू भेटतात. त्यांची देहबोली,वागणे-बोलणे, त्यांचा दर्जा, त्यांचे वेगळेपण, त्यांची आक्रमकता पाहताना अनेक गोष्टी शिकायला मिळतात. तरुण खेळाडूंमध्ये आणि पर्यायाने क्रिकेटमध्ये सुद्धा होत असलेले बदल जवळून अनुभवता येतात. सामानाधिकार्यासाठी अजून एक गोष्ट खूप महत्वाची असते मैदानावर असलेल्या खेळाडूंमधील प्रतिभा ओळखणे, आणि बीसीसीआयकडे त्याचा योग्य रिपोर्ट देणे. मला देखील अश्याच काही गुणी खेळाडूंबद्दल रिपोर्ट देण्याची संधी मिळाली, पुढे असे खेळाडू मोठ्या स्तरांवर चमकतात तेंव्हा मनाला नक्कीच समाधान वाटते. अश्यावेळी स्वतः क्रिकेट खेळण्याचा अनुभव अत्यंत उपयोगी पडतो.
अजून मनाला समाधान देणारी गोष्ट म्हणजे महिला क्रिकेटला आता दिला जाणारा मान आणि प्राधान्य. आज जगभर महिला क्रिकेट ज्या पद्धतीने खेळले जाते, त्यामध्ये सर्वच क्रिकेट असोसिएशनचा महत्वाचा वाटा आहे. नुकत्याच झालेल्या कॉमनवेल्थ खेळांमध्ये क्रिकेट सामन्यात सामनाधिकारी म्हणून महिलांनीच महत्वाची भूमिका पार पाडली. महिला क्रिकेटच्या दृष्टीने ही अत्यंत महत्वाची आणि अभिनमानाची गोष्ट आहे.
कधी कधी मला माझे क्रिकेट खेळायचे दिवस आठवतात. मी १९९६ साली महाराष्ट्रासाठी खेळायला सुरु केले. तेव्हाचे क्रिकेट आणि आत्ताचे क्रिकेट ह्यात जमीन आस्मानाचा फरक आहे. तेव्हा माझा क्रिकेटकडे बघण्याचा दृष्टीकोण फक्त खेळाडू म्हणून होता. जसे खेळाचे अनेक भाग आहेत तसेच पंच आणि सामनाधिकारी सुद्धा एक भागच आहेत एवढाच माझा विचार असायचा. बरेचदा आपण आपल्या धुंदीत जमिनीवर चालत असतो आणि आपल्याला सभोवतालच्या गोष्टी नीट दिसत नाही किंवा आपण त्याकडे नकळत दुर्लक्ष करतो. पण आकाशात गवसणी घालणारा गरुड जमिनीवरची छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा आपल्या डोळ्याने अचूक टिपतो. अगदी साध्या शब्दात सांगायचे तर सामानाधिकारी ह्या पदाने मला क्रिकेटकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोण दिला, अगदी Birds eye view. मी जेंव्हा खेळाडू म्हणून मैदानावर असे तेंव्हा खेळताना काही सुविधा उपलब्ध नसतील तर अगदी सहजतेने त्या गोष्टीची तक्रार करीत असे, पण त्या सुविधा उपलब्ध करून देण्यामागे किती बारीक गोष्टींचा विचार आणि परिश्रम आहेत याची जाणीव ह्या पदामुळे झाली. एका सामन्यामागे किती वेगवेगळ्या व्यक्ती झटत असतात तेही लक्षात आले. कदाचित त्यामुळेच सामन्यासाठी आलेल्या सर्वच घटकांना सर्व सुविधा मिळाव्यात ह्यासाठी मी दक्ष राहून दुप्पट प्रयत्न करतो. आधी खेळाडू म्हणून पंचांबद्दल आदर तर होताच पण सामनाधिकारी या पदावरून त्यांचे काम आणि मेहनत पाहून त्यांच्याविषयीचा आदर द्विगुणित झाला आहे. पंच, व्हिडीओ ऍनालिस्ट, बीसीसीआयचे सिनियर आणि ज्युनियर ऍनालिस्ट आणि पडद्यामागचे इतर अनेक कलाकार यांचे योगदान किती अमूल्य आहे हे प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय कळत नाही. त्यामुळे ह्या सर्वांबरोबर काम करताना माझा मनात नेहमी संघभावना असते.
आमचे एक ज्येष्ठ सामनाधिकारी नेहमी सांगतात – If you are not noticed by people and nobody is talking about you, then, as a match referee you are doing a fantastic job!!
मला वाटतं सामनाधिकारी म्हणजे काय आहे हे सांगण्यासाठी एवढी एकाच ओळ पुरेशी आहे.