ball

तीन दिवसात खुर्दा (दैनिक केसरी, पुणे)

by

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, खरं तर क्रिकेटमधील दोन महत्वाच्या देशांमधील कायम चुरशीने लढली जाणारी मालिका. टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटच्या जमान्यात देखील या दोन संघांमधील कसोटी मालिका कायमच चर्चेत असते. १९९६ साली बॉर्डर-गावसकर ट्रॉफीची सुरुवात झाली तेंव्हापासून या दोन्ही संघातील मालिका क्रिकेट रसिकांसाठी पर्वणीच असते. १९९९ मध्ये ऑस्ट्रेलियाने मिळवलेला विजय, २००१ मध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाची थांबवलेली घोडदौड, त्यानंतर २००३-०४ ची ती ऐतिहासिक मालिका, पुढच्या मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय भूमीवर साजरा केलेला मालिका विजय, २००७-०८ ची ती वादग्रस्त मालिका, पुढे २ वेळा भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियात झालेला पराभव, आणि त्यानंतर गेल्या दोन वेळी आपण ऑस्ट्रेलियात मिळवलेले शानदार विजय…. गेल्या २०-२२ वर्षात या दोन्ही संघांनी क्रिकेटचा दर्जा वेगळ्याच उंचीवर नेला आहे. मैदानावर खेळताना दोन्ही संघ आपल्या जीवाची बाजी लावून खेळताना दिसतात. दोन्ही देशांमध्ये मालिका सुरु होण्याच्या आधी एक वाद कायमच दिसून येतो, तो म्हणजे खेळपट्ट्यांचा. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या कायमच वेगवान असतात, तर भारतीय खेळपट्ट्या या नेहेमीच मंदगती गोलंदाजीला साथ देणाऱ्या. अर्थातच कोणताही संघ या ‘होम कंडिशन’चा फायदा घेतोच. पण प्रत्येक वेळी कांगारू इथे येताना खेळपट्ट्यांच्या नावाने बोंबाबोंब करताना दिसतात. (अर्थात ही बोंबाबोंब इंग्लिश संघ देखील करतोच.) याही वेळी तेच झालंय आणि पहिल्या कसोटी सामन्यात, नागपूरला ऑस्ट्रेलियन संघाला अवघ्या तीन दिवसात गुढगे टेकावे लागले आहेत. 


खरं सांगायचं तर आता प्रत्येक आंतरराष्ट्रीय संघ जवळजवळ संपूर्ण वर्षभर क्रिकेट खेळत असतो. आंतरराष्ट्रीय मालिका आहेत, आयसीसीच्या स्पर्धा आहेतच, आणि परत वेगवेगळ्या देशांमध्ये खेळल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या लीग्स पण आहेत. बहुतेक सर्वच खेळाडूंना, प्रशिक्षकांना आणि सपोर्ट स्टाफला प्रतिस्पर्धी खेळाडूंची बलस्थाने आणि कच्चे दुवे पूर्णपणे ठाऊक असतात. माहित नसतात त्या गोष्टी म्हणजे हवामान आणि खेळपट्ट्या. आणि अशावेळी सगळा राग निघतो खेळपट्ट्यांवर. या खेळपट्ट्या खेळण्यासाठी किती वाईट आहेत हे ठसवण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो. ऑस्ट्रेलियन संघाची ही खोड जुनीच आहे. खरंतर आपला संघ जेंव्हा ऑस्ट्रेलियाला जातो तेंव्हा कायमच होम टीमला योग्य आणि खेळता येणाऱ्या खेळपट्ट्या निवडल्या जातात, आणि कधीही भारतीय संघाने त्या खेळपट्ट्यांविषयी तक्रार केल्याचं ऐकिवात आलं नाहीये. पण ऑस्ट्रेलियन संघ कायमच आपल्या खेळपट्ट्यांना नावे ठेवत आला आहे. या दौऱ्याची सुरुवात देखील अशीच झाली. ऑस्ट्रेलीयान मीडियाने खेळपट्ट्यांचा मुद्दा नेहेमीप्रमाणेच वर उचलला. त्यानंतर अगदी इयान चॅपल, शेन वॉटसन आणि बॉर्डर पासून सगळ्यांनी खेळपट्ट्यांना नावे ठेवायला सुरुवात केली. खरंतर कांगारूंनी या दौऱ्यासाठी विशेष तयारी केली होती.  सिडनीमध्ये भारतासारखी खेळपट्टी करून त्यांनी सराव देखील केला. पण नेट मध्ये सराव करणे आणि प्रत्यक्ष सामन्यात उतरणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे हे पहिल्याच सामन्यात त्यांच्या लक्षात आले असेल. 


नागपूरचा सामना सुरु होण्याच्या आधीच त्यांचे तीन महत्वाचे मोहरे गारद झाले होते. स्टार्क, हेझलवूड आणि कॅमरून ग्रीन या सामन्यात खेळणार नाही हे स्पष्ट झाले होते. पण तरीही संघनिवड करताना कांगारूंनी चूक केलीच. त्यांचा प्रमुख फलंदाज ट्रॅव्हिस हेड चांगल्या फॉर्मात होता. पण त्याला या सामन्यातून वगळण्यात आले. बाकी जे खेळाडू हा सामना खेळले, पैकी स्टिव्ह स्मिथ, मार्नस लाबूशेन आणि अॅलेक्स कॅरी यांनी फलंदाजीत बरी कामगिरी केली. बरी म्हणजे ते इतर फलंदाजांपेक्षा थोडा जास्त वेळ खेळपट्टीवर होते. बाकी सर्वच फलंदाजांनी पॅव्हेलियन ते खेळपट्टी अशा धावा काढल्या. डेव्हिड वॉर्नर सारखा फलंदाज दोन्ही डावात चुकला. उस्मान ख्वाजाने भारतात येत आहे याची इतकी जाहिरात केली, की त्यानंतर खेळपट्टीवर उभं राहून धावा करायच्या असतात ते देखील त्याला सुचलं नाही. एकही ऑस्ट्रेलियन फलंदाजाला अर्धशतक देखील करता येऊ नये? हा ऑस्ट्रेलियाचा संघ आहे का झिम्बाब्वेचा अशी शंका यावी अशा पद्धतीने कांगारू क्रिकेट खेळत होते. गोलंदाजी मध्ये पहिलाच सामना खेळणाऱ्या टॉड मर्फीने मात्र कमाल केली. खेळपट्टीचा अंदाज यायला त्याला थोडा वेळ गेला खरा, पण नंतर मात्र त्याने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत बळी मिळवले. पहिल्याच डावात ७ बळी मिळवून त्याने प्रभावी कामगिरी केली. 


ज्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियन फलंदाज बिचकत खेळत होते, तिथेच आपल्या फलंदाजांनी मात्र टिच्चून खेळ केला. रोहित शर्माने एक चांगलं शतक झळकावलं. त्याची ही खेळी त्याच्या टॉप ५ मध्ये यावी इतकी सुरेख होती. के एल राहुल विषयी काहीही न बोललेलेच उत्तम. तो संघात का आहे याचं उत्तर देणाऱ्याला तो विक्रम राजा कदाचित अर्ध राज्य बक्षीस देईल. त्याच्या जागी फॉर्म मध्ये असलेला शुभमन गील येईल का, हा दुसरा सवाल. पुजारा, कोहली, सूर्याने निराशा केली. पण नाईट वॉचमन आलेला अश्विन, आणि आपले अष्टपैलू जडेजा आणि अक्षर यांनी मात्र कमाल केली. विशेषतः जडेजाने ५ महिन्यानंतर पुनरागमन करताना बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही क्षेत्रात ठसा उमटवला. भारताने पहिल्या डावात घेतलेली २३३ धावांची आघाडी पाहुण्यांना झेपलीच नाही. ही आघाडी आपल्याला सामना जिंकण्यासाठी पुरेशी आहे याची कल्पना  होतीच,पण ऑस्ट्रेलियन संघ फक्त ९१ धावांमध्ये गारद होईल अशी अपेक्षा कोणीही केली नसती. दोन्ही डावात अश्विन आणि जडेजाच्या फिरकीने पाहुण्यांचीच फिरकी घेतली. आपले गोलंदाज कसे चेंडू वळवत होते ते एकाही फलंदाजाला समजत नव्हतं. वॉर्नर, ख्वाजा, हॅंड्सकोम्ब, रेनशॉ आणि काही प्रमाणात स्मिथ आणि लाबूशेन सुद्धा या खेळपट्टीवर भांगडा करतानाच दिसत होते. 


अखेरीस केवळ तीन दिवसात ऑस्ट्रेलियन संघाने नांगी टाकली. आपण मॅच जिंकणार हे ठाऊक होतंच, पण ऑस्ट्रेलिया इतक्या सहजपणे पराभव पत्करेल याची खरोखर अपेक्षा नव्हती. अर्थात या पराभवानंतर ऑस्ट्रेलियन संघ कमबॅक करेल अशी आशा आहे. क्रिकेट रसिकांना या दोन संघांमधील लढत बघायला आवडेल. इतका हतबल झालेला ऑस्ट्रेलियन संघ आम्ही कधीच बघितला नाहीये. आणि त्यामुळेच त्या संघाने मालिकेत यापुढे चांगली कामगिरी करावी अशी आशा आहे. या मालिकेच्या निकालावर २०२३ टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात कोण खेळेल याचं चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होणार आहे. ऑस्ट्रेलियाला हरवून भारताने दिमाखात या अंतिम सामन्यात प्रवेश करावा हीच आपली इच्छा असेल, पण अशा हतबल संघाला हरवण्यात देखील मजा नाही. चांगली लढत होऊन आपला विजय झाला तर अजूनच धमाल. ऑस्ट्रेलियन फलंदाज भारतीय फिरकी गोलंदाजांचा सामना कसा करतात यावरच या मालिकेचे भवितव्य अवलंबून आहे.   

– कौस्तुभ चाटे 

To know more about Crickatha