ball

वेदनेचा उत्सव झाला..!!

by व्यंकटेश घुगरे

भरत कुमारचं नाव ऐकलंय? गिरीश शर्मा? सुधा चंद्रन बद्दल नक्की माहिती असेल!! स्टीफन हॉकिंग्ज आता दुनिया सोडून गेलाय. एक नाव आणखी आहे. हसरे दुःख म्हणजे काय त्याचं मूर्तिमंत उदाहरण. जन्मतः उजवा हात नसलेला भरत जलतरणपटू झाला…गिरीश शर्मा एका पायावर उभा राहात बॅडमिंटन खेळायचा..लाकडाच्या पायाचा ठेका धरत सुधानं नृत्यकलेचा ध्यास घेतला!! स्टीफन..पाहताक्षणी कोणालाही दया नव्हे, कीव येईल असा व्हीलचेअरवर आयुष्य घालवलेला विख्यात शास्त्रज्ञ!!    शेवटचा हा…इतरांच्या तुलनेत तो तसा बरा होता. २ हात..२ पाय..पंचेंद्रियं..शाबूत मेंदू..सगळं ठीक असताना त्याला Rheumatoid Arthritisनं घेरायला सुरुवात केली. वय वर्ष २० फक्त, उमेदीचा काळ खाऊन टाकायला या रोगानं त्याची निवड केली, की या रोगाचं स्वतःचं अस्तित्व दुनियेच्या पटलावर ठळक व्हावं यासाठी, ते आज कळणं कठीण आहे; पण या Rheumatoid Arthritisला काखोटीला मारून ब्रेंट फ्रेझर उर्फ बिली बाऊडेननं क्रिकेटजगत शब्दशः आपल्या इशाऱ्यावर बरीच वर्षं नाचवलं; अगदी चार्ली चॅप्लिनच्या पावलावर पाऊल ठेवत!! मैदानावरचे विनोदी हावभाव किंवा हातवारे ही फक्त खेळाडूंची मक्तेदारी नव्हे, हे त्यानंच पहिल्याप्रथम जगापुढे अधोरेखित केलं असावं. न्यूझीलंडचा माजी दिवंगत कर्णधार मार्टिन क्रो त्याला क्रिकेटच्या मैदानावरचा BOZO THE CLOWN या नावानं संबोधायचा. या Bozo चा इतिहास पाहिला, तर कळतं, लहान मुलांच्या मनोरंजनविश्वात त्याचं योगदान किती मोठं होतं, ते!!    Rheumatoid Arthritis… साध्या भाषेत बोलायचं, तर संधिवाताचाच एक प्रकार…सांधे आखडतात, हात पाय सरळ लांब होत नाहीत, बोटं बधीर होतात, नाना गोष्टी. थंडीचे दिवस म्हणजे अशा रुग्णांसाठी कसोटीचा काळ. बिलीची जन्मभूमी असलेल्या न्यूझीलंडमध्ये सततच्या थंड वातावरणामुळं जवळजवळ सव्वापाच लाख लोक या रोगाचे शिकार आहेत. प्रत्येकाच्या शरीरातलं त्याचं प्रमाण कमी अधिक, एवढंच. वेचून वेचून खाणीतून पैलू पाडण्यासाठी हिरे निवडावेत, तशी नियतीनं बिलीचीही निवड ‘शिकार’ म्हणून केली असावी, आणि सांगितलं असावं, “अडथळा संधी म्हणून कसा पाहावा, हे लोकांनी तुझ्याकडून शिकलं पाहिजे!!”    पैजेचा हा विडा आत्मविश्वासानं उचलून खेळण्याचे मार्ग संधिवातानं बंद केल्यानं मैदानात परतण्यासाठी त्यानं अम्पायरिंगच्या रस्त्याची निवड केली.

२००३च्या विश्वचषकाच्या सुरुवातीला प्रचलित नसलेलं ‘बिली बाउडेन’ हे नाव त्याच स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ‘Fourth Umpire’ च्या यादीत समाविष्ट झालं. जवळजवळ १६ वर्षांच्या एकूण कारकीर्दीत ८४ कसोटी, २०० एकदिवसीय आणि २४ टी-२० सामन्यांत तो अंपायर म्हणून उभा होता. ICCच्या खास अंपायर्सच्या यादीत तो सलग १० वर्षं राहिला. Everyone has certain bad days at office असं म्हणतात, तसे त्याचेही सगळेच दिवस काही यशस्वी नव्हतेच. २००७च्या अंतिम विश्वचषक सामन्यात अपुऱ्या प्रकाशामुळं गुंडाळाव्या लागलेल्या श्रीलंकेच्या डावामुळं त्याच्यावर प्रचंड टीका झाली. ‘Bad Performance’ या गोंडस नावाखाली २०१३मध्ये त्याचं नाव ICC च्या खास यादीतून वगळलंही गेलं. पुढं २०१५ च्या विश्वचषकातही त्याला संधी मिळाली. असले चढ उतार प्रत्येक क्षेत्रातल्या प्रत्येक माणसावर येतात, त्यात नवीन काय, असे प्रश्न आपल्याला पडू शकतातच. पण समुद्राची खाडी पोहत ओलांडून जाणं; आणि शार्क, देवमासे आणि असंख्य ज्ञात-अज्ञात भयंकर जलचरांचा नेहमीचा वावर असलेल्या खाडीतून पोहून जाणं, यात फरक आहे. बिलीच्या बाबतीत या जलचरांची भूमिका त्याच्या संधिवातानं निभावली. स्वतःच्या या रोगाबद्दल आज बिली ऋणीही आहे आणि त्याला खंतही आहे. तो सांगतो, “संधिवातानं माझी कसोटी पाहिली. तो माझ्यासाठी जन्मभराची वेदना घेऊन आला. माझ्यापुढं दोनच पर्याय होते. काहीही न करता बसून राहणं आणि नशिबाला आलंय ते स्वीकारून पुढचा मार्ग शोधणं. मी दुसरा पर्याय निवडला. पण संधिवात होता, म्हणून तर इतकी वर्षं खेळासाठी मी जगभर जाऊ शकलो. त्यानं मला माझ्या आवडत्या गोष्टी करण्यापासून कधीही थांबवलं नाही. अगदी पूर्णपणे नसेल कदाचित, पण तुम्ही ती गोष्ट करू शकता हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे.काहीही करण्यासाठी मनाची तयारी असली की पुरे!!”    असे वेडे जन्म घेतात, म्हणून इतिहासाच्या कोऱ्या पानांना संजीवनी मिळते.

बिलीबद्दल बोललं गेलं, त्यात अतिशयोक्तीच जास्त होती. फलंदाजाला बाद देताना वर गेलेलं त्याचं वाकडं बोट, षटकाराचा इशारा करताना क्रमाक्रमानं तीन टप्प्यांत वर जाणारे त्याचे हात, चौकार देताना ३६० अंशातलं पूर्ण वर्तुळ फिरून हात हलवतानाच एखाद्या बॅले कलाकारासारखी होणारी त्याच्या पायांची हालचाल, आणि लेगबायसाठी एक पाय उचलून मांडीवर हलकेच थोपटून नंतर पाय हलवणं आणि थर्ड अम्पायरकडं मदत मागताना एखाद्या सुंदर युवतीच्या कमनीय बांध्यासारखा इशारा करणं, हे सगळं क्रिकेटच्या पुस्तकाबाहेरचं असलं, तरी प्रेक्षकांना, आणि खेळाडूंना भावलं. दुसरीकडं “Problem with the umpire Billy Bowden is that he thinks he is part of an entertainment” या आणि अशा अनेक समांतर आशयाच्या शब्दांत टीकाकारांनी त्याच्यावर तोंडसुखही घेतलं. लेकिन बिलीने किसी की एक नहीं सुनी!! त्या टीकेमुळं त्याला जास्तच प्रसिद्धी मिळाली; नरेंद्र मोदींना ‘चायवाला’ या विशेषणामुळं मिळाली तशीच!! बिलीच्या प्रत्येक हालचालीवर सगळ्याच क्रिकेटरसिकांची नजर गेली. त्याच्यावर लिहिलं, बोललं जाऊ लागलं.  कोणी त्याला Trapez Artist म्हटलं, त्याच्या चौकाराच्या इशाऱ्याला ‘fit for a walk on top at the opera house’ असं नावाजलं गेलं.एकदा नॅटवेस्ट मालिकेत त्यानं आपल्याच शैलीतला लेगबायचा इशारा केला, तेव्हा कोणीतरी बोलून गेलं, “He taps his leg and shakes it. If it was butter it would be milk by now!!” मैदानातला त्याचा उत्साही, हसरा वावर ‘like a butterfly with bounce’ असा संबोधला गेला. हा झाला त्याचा मुखवट्याचा चेहरा!!     त्यानं वेदना ‘लपवल्या’, त्याला त्या झाल्याच नाहीत असं नव्हे. आखडलेली बोटं सैल करण्यासाठी त्याला सामन्याआधी ती गरम पाण्यात बुडवून ठेवायला लागायची. त्याचे चित्रविचित्र इशारे हे वरवर मनोरंजक आणि विदूषकी वाटले, तरी तो त्याच्या उपचारांचा एक भाग होता. स्नायूनस्नायू बधीर होऊ नये, आणि शरीर लवचिक राहावं, यासाठी सततच्या, प्रसंगी टोकाच्या वाटाव्यात, अशा हालचाली करणं त्याला भाग पडलं. जीवनरक्षक म्हणून त्याला त्याचा उपयोगही झाला.

एकदा स्क्वेअर लेगवर उभा असताना गॅरेंट जोन्सनं उसळत्या चेंडूवर मारलेला एक वेगवान फटका निमिषार्धात चुकवत बिली खाली वाकला नसता, तर त्याचं डोकं फुटलं असतं. एवढं असूनही स्वतःच्या या रोगाचा बाऊ त्यानं केलाच नाही, उलट ती संधी मानून आपल्या अंपायरिंगला त्यानं विनोदाची चटपटीत फोडणी दिली. गंमत म्हणून का होईना, पण क्रिकेटमध्ये ‘रेड कार्ड’ आणणारा बिली पहिलाच. एका चेंडूत ४५ धावा असं अशक्यप्राय आव्हान असताना ग्लेन मॅकग्रा शेवटचा चेंडू सरपटी टाकण्यासाठी म्हणून विकेटजवळ आला, तेव्हा कुठूनतरी पैदा केलेलं रेड कार्ड खिशातून काढून आधी ग्लेनला दाखवत बिलीनं नंतर ते मैदानातल्या सगळ्या प्रेक्षकांना दिसेल असं बोटांत पकडून नाचवलं!! देशोदेशी आपला चाहतावर्ग निर्माण करत तो आपलं काम इमानेइतबारे करत राहिला. कधी त्यानं चुका केल्या, कधी अचूक निर्णय दिले!!     १६ वर्षांचा काळ थोडाथोडका नाही, विशेषतः भागीदारीत Rheumatoid Arthritis असताना!! कसोटी क्रिकेटमध्ये अकराव्या खेळाडूबरोबर खेळताना एक एक चेंडू खेळून काढावा, तशी या संधिवाताबरोबर त्यानं छोटी छोटी ध्येयं ठेवली असावीत!! काही चेंडू तो ‘बीट’ झाला असेल, काहीवेळा धावबाद होता होता वाचला असेल, पण धडधाकट माणसांच्या गर्दीत अगदी अपंग नव्हे, पण थोडंसं व्यंग असलेला हा माणूस वेदनेचा उत्सव करत कायमच उठून दिसला, एवढं खरं!!

To know more about Crickatha