ball

भारत आणि २०२३ चा विश्वचषक

by रवि पत्की.

भारत आणि २०२३ चा विश्वचषक २०२३ चा एक दिवसीय सामन्यांचा वर्ल्ड कप जवळ येतोय. त्याला क्रिकेटमधल्या सर्वात
मोठ्या उत्सवांपैकी एक असं म्हणल्यास वावगं ठरणार नाही. तसं म्हटलं तर वन डेचा वर्ल्ड कप ही ओरिजनल आषाढी एकादशी आहे. बाकी स्पर्धा  ह्या महिन्याला इतर एकादशा येतात तशा. क्रिकेटचा रसिक आषाढीच्या वारीची वाट बघत असतो. २०२३ चा वर्ल्ड कप भारतात आहे. भारत प्रथमच इतर उपखंडातल्या देशांशिवाय एकटा स्वतःच्या जिवावर वर्ल्ड कप घेत आहे. भारतातली खेळाची अमाप लोकप्रियता, प्रायोजकांची मुबलकता, स्टेडियम आणि इतर पायाभूत सुविधांची झालेली प्रगती हे बघता वर्ल्ड कपचे आयोजन यशस्वी होणार ह्यात काही शंका नाही.

खरा महत्त्वाचा प्रश्न आहे तो भारतीय संघाची रचना काय असेल आणि त्याची कामगिरी कशी होईल हा. टेनिसप्रमाणे क्रिकेटसुद्धा युवकांचा खेळ होऊ लागलाय. २७-२८ वर्षांच्या प्लेअरवर ज्येष्ठ खेळाडूचा शिक्का बसतोय. T20 मुळे खेळ अजून तरुण झालाय. अशा परिस्थितीत भारतीय संघाचा न्यूक्लियस ओव्हर थर्टी (ओ.टी.) असण्याची शक्यता आहे. रोहित, कोहली, राहुल, जडेजा, शमी, धवन हे सगळे खेळाडू क्रिकेटच्या सध्याच्या स्टॅंडर्डप्रमाणे तिशी पार केलेले ज्येष्ठ असणार. वय वाढल्यावर गड चढताना दम लागतो पण वर पोहचल्यावर जगाकडे वेगळ्या दृष्टीने बघता येतं, असं म्हणतात. जुनी वाईन जास्त मजा देते, जुने व्हायोलिन छान वाजते तसे. पण क्रिकेटसारख्या व्यावसायिक खेळात सर्व संघातले खेळाडू कौशल्याच्या बाबतीत जवळजवळ समान असतात. अशा वेळेस खेळाडू वेगळा ठरतो तो मनाच्या कणखरतेवर. क्रिकेटमध्ये अती स्पर्धेमूळे मानसिक स्वास्थ्य हरवून बसलेल्यांची यादी मोठी आहे. विराट कोहली, जोनाथन ट्रॉट, मार्कस ट्रेस्कॉथिक, मायकेल यार्डी, ग्लेन मॅक्सवेल, बेन स्टोक्स हे त्यातले काही सर्वांना माहीत असलेले खेळाडू. अनेक खेळाडूंनी त्यांना झालेला त्रास जाहीर केलेला नाही. ह्या स्पर्धेतही भारताला ह्या अति क्रिकेटचा सामना करावा लागू शकतो. ओव्हर थर्टी असलेल्या भारताच्या खेळाडूंना कोणत्या घटकांवर जास्त काम करावे लागणार आहे ते बघू.

  1. आत्मविश्वास : आत्मविश्वास जास्त असणारे खेळाडू अधिक कष्ट करतात, लवकर उद्विग्न
    होत नाहीत, लवकर हार मानत नाहीत. सकारात्मक स्वसंवाद आत्मविश्वास वाढवतो.
    आत्मविश्वास वाढवण्याकरता स्वतःच्या सर्वोत्तम इनिंग्स, स्पेल आठवणं, आनंदाचे क्षण
    आठवणं उपयुक्त ठरेल. आपण संघात महत्त्वाचे घटक आहोत हे स्वतःला बजावलं तर
    आत्मविश्वास वाढून वयाचा विसर पडेल.
  1. एकाग्रता : क्रिकेटमध्ये एकाग्रता टिकवून ठेवणं वयोमानानुसार अवघड जातं. कारण
    क्रिकेट हा स्टॉप-स्टार्ट खेळ आहे. दोन ओव्हर्समध्ये वेळ जातो, ड्रिंक्स ब्रेक, इनिंग्स ब्रेक
    ह्या सगळ्याशी जुळवून घेणं हळूहळू अवघड होतं. स्लेजिंगला सामोरं जाताना
    वयानुसार उद्विग्न होण्याची शक्यता अधिक असते.
  2. भावनेवर नियंत्रण : स्थितप्रज्ञता आणणं महत्त्वाचं असतं. चेंडू खेळायचा हुकल्यावर तो
    विसरून नवीन चेंडूवर चित्त एकाग्र करावं लागतं. संघाबरोबर मनोचिकित्सक असेल तर
    अल्बर्ट एलिसच्या विवेकनिष्ठ वागणुकीच्या थिअरीचा सराव खेळाडूंकडून करून घेता
    येईल. संघाचा मूड आणि खेळाडूंचा स्वतःचा मूड ह्यात नातं असतं. त्यामुळे ज्येष्ठ
    खेळाडूंनी संघ मिटिंगमध्ये जास्त बोलणं, स्वतःच्या सक्सेस स्टोरीज सांगणं, खेळकर
    प्रसंग शेअर करणं महत्त्वाचं.
  3. कोहलीची जबाबदारी : कोहली २०२३ मध्ये कर्णधार म्हणून असेल तर विरुद्ध संघ त्याला टार्गेट करणार. कोहलीने स्वतःच्या कामगिरीबरोबर संघ भावना वाढवण्यास प्रयत्न करावा.
  4. मनावर ताण येणाऱ्या गोष्टीत करिअर आणि कुटुंब यांचं योग्य संतुलन ठेवता न येणं, मीडिया आणि प्रायोजकांच्या मागण्या पूर्ण करणं, हे करताना कामगिरीत सातत्य टिकवणं, हवामान, खेळपट्ट्या, पंचांचे निर्णय ह्या सर्व गोष्टींचा वयोमानाप्रमाणे जास्त ताण सहन करावा लागतो. ह्यावर मात करण्याकरता मनाचा कणखरपणा लागतो. अशा परिस्थितीत भारताच्या संघात ज्येष्ठ आणि तरुण खेळाडूंचं योग्य मिश्रण असेल असं वाटतं. सलामीला के. एल. राहुल निश्चित वाटतो. त्याच्या जोडीला रोहित शर्मा असेल. शिखर धवन, पृथ्वी शॉ, देवदत्त पाडीकल हेदेखील चांगले  पर्याय असतीलच. तीन नंबर पोजिशनला सूर्यकुमार यादव येईल असं वाटतं. चार नंबरला  कोहली, पाचला श्रेयस अय्यर आणि सहाला हार्दिक पंड्या फिक्स वाटतात. हार्दिकच्या तंदुरुस्तीचा प्रश्न तोपर्यंत सुटलेला असेल असं मानायला हरकत नाही. सात नंबरला रिषभ पंत जागा टिकवेल असं वाटतं. चार बोलर्स घेताना पुन्हा जडेजा आणि कृणाल पंड्या यांच्यात स्पर्धा असेल. दीपक चहार आणि शार्दूल ठाकूर तोपर्यंत फॉर्म चांगला ठेवतील असं वाटतं. बुमराह तर ध्रुवताऱ्यासारखा अढळ झाला आहे, त्याला तोड नाही. उमेश, सिराज, शमी यांच्यापैकी कुणाला संधी मिळते तसेच रहस्यमय स्पिनर वरुण चक्रवर्ती बारात स्थान मिळवतो का, हे पाहावे लागेल. IPL मधील विविध खेळाडूंची कामगिरी लक्षात घेतली जाईल तसेच तोपर्यंत होणाऱ्या एक दिवसीय सामन्यांमधली कामगिरीदेखील पाहिली जाईल. तोपर्यंत अचानक कुणी चमकून गेला तर एखाददुसरा नवीन चेहरासुद्धा समोर येईल. बॅटिंगपेक्षा बोलिंगमध्ये काही नवीन नावं पुढे येण्याची शक्यता वाटते. बॅटिंगमध्ये पुढील वर्ष दीड वर्षात मोठे बदल संभवत नाहीत असं वाटतं. संघ निश्चित संतुलित असेल हे सांगायला नकोच. सर्व ज्येष्ठ खेळाडूंना वर्ल्ड कप जिंकायचाच असेल. सर्व ज्येष्ठ खेळाडू तेजस्वी प्रतिभेचे धनी आहेत. आरती प्रभू म्हणतात त्याप्रमाणे प्रतिभेच्या कळ्या हातात असतात. त्याला मनाच्या कणखरतेने फुलांमध्ये रूपांतरित करावं लागतं. वय झालं असलं तरी भारतीय खेळाडू वयात आल्यासारखे खेळतील ही अपेक्षा करू या.

To know more about Crickatha