भारताच्या गौरवशाली क्रिकेट इतिहासातील एक सोनेरी पान- २००७ टी२० वर्ल्ड कप
१९८३ चा क्रिकेट विश्वचषक जिंकून कपिल देवच्या भारतीय संघाने भारतातील अनेक तरुणांना क्रिकेट खेळण्यासाठी प्रेरणा दिली. नव्वदीच्या दशकाअखेरीस भारतीय क्रिकेटला मॅच फिक्सिंग चे ग्रहण लागले होते. अनेक क्रिकेट चाहत्यांनी क्रिकेट कडे पाठ फिरवली होती. त्याच दरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कर्णधारपदाची भिस्त सौरव गांगुलीच्या खांद्यावर ठेवली. नवीन संघबांधणीसोबतच , भारतीय क्रिकेट फॅन्सला परत क्रिकेट कडे खेचून आणायची मुख्य जबाबदारी दादाकडे होती.
दादाने त्याचे मॅच-विनर खेळाडू आधीच हेरून ठेवले होते ज्यामध्ये द्रविड, लक्ष्मण , सचिन , कुंबळे यांच्याबरोबर हरभजन ,युवराज,सेहवाग ,झहीर खान ,कैफ ,आशिष नेहरा अश्या नवख्या खेळाडूंचा समावेश होता. २००३ एकदिवसीय विश्वचषकात दादाच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघाने चांगला खेळ केला पण अंतिम सामन्यात कांगरूनसमोर त्यांचा निभाव लागला नाही. २००७ मध्ये एकदिवस विश्वचषकात पुन्हा निराशाच भारताच्या पदरी पडली. भारत ग्रुप स्टेज मधूनच स्पर्धेच्या बाहेर गेला. त्याच वर्षी लगेचच सप्टेंबर महिन्यात पहिल्यावहिल्या टी-२० वर्ल्ड कप चे आयोजन साऊथ आफ्रिकेत करण्यात आले होते.
क्रिकेटचा नवीन आणि झटपट प्रकार असल्यामुळे सचिन, गांगुली, द्रविड, लक्ष्मण या सिनिअर खेळाडूंनी टीम मध्ये भाग नाही घ्यायचा ठरवले आणि भारताचा नवखा संघ या विश्वचषकासाठी पाठवण्यात आला. कर्णधारपदाची जबाबदारी महेंद्रसिंह धोनीकडे देण्यात आली होती. एकदिवसीय विश्वचषकात आलेली निराशा झटकून पुन्हा नव्या जोमाने खेळायचे आव्हान भारतीय संघासमोर होते.
भारताने त्या वर्ल्डकप स्पर्धेआधी फक्त एकदा टी-२० चा सामना दक्षिण आफ्रकेविरुद्ध खेळला होता. क्रिकेटचा हा नवीन प्रकार काय रंग दाखवणार याची कुणालाही कल्पना नव्हती. मुळात टी-२० हा प्रकारच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी तयार करण्यात आला. एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट वेळ खाऊ असल्यामुळे, प्रेक्षकांच्या सोयीसाठी टी-२० चा उदय झाला.
भारताचा स्कॉटलंड विरुद्धचा पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. दुसरा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध असल्यामुळे सर्व क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण होते. प्रथम फलंदाजी करताना रॉबिन उथप्पा ने केलेल्या एकमेव अर्धशतकी खेळीमुळे भारताने १४१ अशी सन्मानजनक धावसंख्या उभारली. मिसबाह ने पाकिस्तानकडून खेळताना शेवटपर्यंत एकहाती सुंझ लढवली. सामना शेवटच्या षटकात नाट्यमय वळणावर आला होता.
शेवटच्या षटकात १२ धावांची आवश्यकता असताना मिसबाह ने श्रीसंत ला दुसऱ्या आणि चौथ्या बॉलवर चौकार मारून सामन्याचे पारडे पाकिस्तानच्या बाजूने झुकवले. २ बॉल मध्ये १ धाव गरजेची असताना श्रीसंत ने पुनरागमन करत तो चेंडू डॉट घालवला. शेवटच्या चेंडूत १ धाव गरजेची असताना मिसबाह ने कव्हर च्या दिशेने मारलेला चेंडू युवराजने अडवून त्याला रन- आऊट केले. सामना टाय झाला. पण सामन्याच्या विजेता ठरवण्यासाठी बोल- आऊट ठेवण्यात आले होते. भारताकडून सेहवाग, हरभजन, रॉबिन उथप्पा यांनी अचूक स्टम्पला हिट केल्यामुळे भारताने तो सामना जिंकला त्याउलट पाकिस्तानकडून एकही गोलंदाजाला स्टम्पला हिट करता आले नाही.
पुढच्या सामन्यात भारताला कीवी संघाकडून धोबीपछाड मिळाला. किवी संघाने दिलेले १९१ धावांचे आव्हान पार करण्यात भारतीय संघाला अपयश आले. इंग्लंडविरुद्धच्या सामना खऱ्या अर्थाने लक्षात राहिला तो फक्त युवराज साठी. अँड्र्यू फ्लिन्टॉफ ने युवराजला डिवचून त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक केली.
नंतर युवराज आणि फ्लिन्टॉफ मध्ये बाचाबाची झाली आणि युवीने या सगळ्या गोष्टीचा राग नवख्या स्टुअर्ट ब्रॉड वर काढलं. ब्रॉड ला ६ बॉल मध्ये ६ षटकार ठोकून एक नवा विक्रम युवीने बनवला. तसेच, १२ बॉल मध्ये ५० धावा करून टी-२० मध्ये सगळ्यात वेगवान अर्धशतक करून क्रिकेट जगतात एकच हाहाकार माजवला. नंतरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला मात देत भारत उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला.
कांगरून विरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्याचा हीरो पुन्हा एकदा युवराज सिंग ठरला. त्याने ३० बॉल्स मध्ये केलेल्या ७० धावांच्या खेळीमुळे आणि नंतर इरफान, हरभजन, श्रीसंत , जोगिंदर शर्मा यांनी टिच्चून केलेल्या गोलंदाजीच्या जोरावर भारतीय टीम ने दिमाखात फायनल ला प्रवेश केला. फायनल ला पुन्हा पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने होते.
सेहवागला दुखापत झाल्यामुळे युसुफ पठाण च्या कारकिर्दीची सुरुवात या सामन्यातून झाली. प्रथम फलंदाजी करताना भारताकडून गौतम गभीरसोबत युसुफ सलामीला आला. गौतमने ५४ बॉल्स मध्ये अफलातून ७५ धावा करत भारतीय संघाला १५७ च्या धावफलक उभा करून दिला. फायनल सामन्यातील दबावाचा विचार करता ही धावसंख्या नक्कीच आव्हानात्मक होती. पुन्हा एकदा पाकिस्तान संघाची भिस्त मिसबाह च्या खांद्यावर होती. शेवटच्या षटकात ६ बॉल्स मध्ये १२ धावांची गरज असताना धोनीने चेंडू जोगिंदर शर्माच्या हाती सोपवला.
विशेष म्हणजे हरभजन सिंगची त्यावेळी एक ओव्हर शिल्लक होती त्यामुळे धोनीचा हा निर्णय सर्वांना आश्चर्य जनक वाटला. जोगिंदर शर्माच्या दुसऱ्याच चेंडूवर मिसबाहने षटकार खेचला आणि समीकरण ४ बॉल मध्ये ६ धावा असे केले. सामना भारताच्या हातातून गेला असे वाटत होते. पण, पुढचा चेंडू स्कूप करण्याच्या प्रयत्नात मिसबाहने मिस टाईम केलेला शॉट फाइन लेग ला उभ्या असलेल्या श्रीसंत ने पकडला आणि भारत पहिल्यांदा टी-२० विश्वचषक विजेता झाला.
धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा सुवर्णकाळ चालू झाला आणि पुढे जाऊन भारताने २०११ चा एकदिवसीय विश्वचषक तसेच २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी वर आपले नाव कोरले.