क्रिकेटस्मृतीची चाळता पाने…
परवा एका चॅनेलवर क्रिकेट मॅच दुसऱ्या वाहिनीवर फुटबॉलचा सामना आणि तिसऱ्यावर वाहिनीवर टेनिसचा सामना प्रसारित होत होता. तिन्ही खेळात रस असल्यामुळे मधल्या ब्रेक मध्ये इकडून तिकडे रिमोटचा प्रवास चालू होता. मध्येच सहज चित्रपट वहिनींकडे लक्ष गेले तर एका वाहिनीवर ‘राजा हिंदुस्थानी’, दुसरीकडे ‘अग्नीसाक्षी’ तर तिसऱ्या वाहिनीवर ‘दिलजले’ हे चित्रपट चालू होते. खरंतर हे चित्रपट सारखेच चालू असतात पण त्या दिवशी सहज तोंडातून निघालं
“आज काय १९९६ वर्षातील चित्रपट दाखवणे चालू आहे की काय ?”
पुन्हा क्रिकेटच्या वाहिनीवर आलो तर तिथे ब्रेक मध्ये भारताच्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेसोबत होणाऱ्या पुढील सामन्यांची जाहिरात चालू होती.
चित्रपटाचा विषय मनात होताच आणि मन १९९६ ह्या वर्षात गेले आणि आठवला तो टायटन कप.
भारत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका अश्या तिरंगी लढती ह्या टायटन कप मध्ये रंगल्या होत्या. ६ नोव्हेंबर ला मुंबई इथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवून हा कप जिंकला होता. भारताच्या अश्या कितीतरी लढती आणि विजय आहेत. पण मला हा टायटन कप लक्षात आहे तो आणखी एका वेगळ्या कारणासाठी.
ते वेगळे कारण म्हणजे एक खेळाडू. रॉबिन सिंग. रॉबिन सिंग एक अष्टपैलू खेळाडू, संघाला आवश्यक तेव्हा धावा करणे आणि बळी मिळवून देणे हे काम तो चोख करत असे. इतकंच नाही तर एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्याचे नाव घेतले जाते. १९८९ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले पण त्यानंतर तब्बल ७ वर्षे कुठलाही आंतरराष्ट्रीय सामना तो खेळला नाही. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या संघासोबत सामना खेळतांना भारतीय संघाला देखील तोडीचा संघ बनवणे आवश्यक होते. ह्या दोन्ही संघाच्या फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्ही बाजू मजबूत होत्या. भारताला सगळ्या बाजूने भरभक्कम संघ हवा होता. तेव्हा निवड समिती आणि कप्तान सचिन तेंडुलकर यांच्यात झालेल्या चर्चेनंतर रॉबिन सिंगला बोलावणे आले. निवड समिती आणि सचिन तेंडुलकर ह्यांनी केलेली आपली निवड किती सार्थ होती हे रॉबिन सिंग ने दाखवून दिले. क्षेत्ररक्षणात तर रॉबिन सिंग एक नंबरचे नाव होते.
रॉबिन सिंग आज सुद्धा लोकांना माहिती आहे, लक्षात आहे. आजही तो क्रिकेटच्या क्षेत्रात वेगवेगळ्या भूमिकेत काम करत आहे.
हे झाले रॉबिन सिंग बद्दल. पण ह्या सोबतीनेच मला एक फार मोठी खेळाडूंची यादी डोळ्यासमोर आली. आम्ही मित्र जेव्हा कधी किमयाला, गिरीजा किंवा वैशालीला भेटतो तेव्हा आवर्जून ह्या सगळ्यांचा विषय निघतो. दरवेळेला कुणीतरी नवीन खेळाडू आठवून जातो.
हृषीकेश कानिटकरने पाकिस्तानच्या विरुद्ध ढाका येते १८ जानेवारी १९९८ साली सिल्व्हर ज्युबिली स्वतंत्रता कप च्या अंतिम सामन्यात मारलेला चौकार अजूनही कोणीही विसरला नाही.
असेच एक नाव म्हणजे अतुल बेदाडे. जो त्याच्या षटकारांसाठी प्रसिद्ध होता आणि जेव्हा त्याला शारजाह मध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने काहीवेळा आपली षटकारांची ताकद दाखवली सुद्धा पण फार काळ काही त्याची कारकीर्द चालली नाही. सुनील गावस्कर तेव्हा सामन्याचे समालोचन करत होते आणि त्यांनी अतुल बेदाडेचे आडनावं ‘बदडे’ किंवा ‘बदडवे’ हवे असे म्हंटले होते.
अश्या बऱ्याच खेळाडूंच्या कथा आहेत.
तेव्हा क्रिकेटला आतासारख्या आयपीएल सारखी आकर्षकता नव्हती तरीही सलील अंकोला आणि इतर काही खेळाडू त्यांच्या देखणेपणा मुळे चर्चेत राहायचे.
कालौघात अशी बरीच नावे आहेत जी मुख्य करून ९० च्या दशकातील आणि २०००च्या शतकातील पहिल्या दशकातील आहे की जे काही प्रमाणात लोकांना आठवतात. यातील काहीजण आयपीएल च्या माध्यमातून अजूनही काही जवाबदाऱ्या पार पाडत आहेत.
पंकज धर्मानी, सुजित सोमसुंदर, हेमांग बदानी, विजय यादव, नोएल डेव्हिड, डेव्हिड जॉन्सन, प्रवीण कुमार, देवाशिष मोहंती, एबी कुरुविला, निखिल चोप्रा, आकाश चोप्रा, आशिष कपूर, जतीन परांजपे, सदागोपन रमेश, डोडा गणेश, राहुल संघवी, अमेय खुरासिया, दीप दासगुप्ता, गगन खोडा अशी कितीतरी नावे आहेत जी अजूनही क्रिकेटप्रेमींच्या लक्षात आहेत.
हे आठवता आठवता आणखीन एक आठवलं, एकदा कुठल्याशा घोडेस्वारी स्पर्धेत भारताने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता आणि त्याच दिवशी भारत आणि झिम्बाब्वे ह्यांच्यात एकदिवसीय सामना चालू होता. दोन्ही खेळात रंगत आली होती. खेळाचे प्रक्षेपण होत असे. दूरदर्शनवर दोन्ही खेळांचे आलटून पालटून प्रक्षेपण चालू होते. क्रिकेट रंगात आले आणि इतक्यात दूरदर्शनवर घोडेस्वारीचा सामना दाखवणे सुरु केले. सगळ्यांची बरीच चिडचिड झाली होती पण क्रिकेटच्या सामना अखेरच्या षटकात आला आहे हे पाहून दूरदर्शनवर सामन्याचे प्रक्षेपण पुन्हा सुरु झाले. घोडेस्वारी सुद्धा तितकाच रंगतदार खेळ पण तो आपल्याकडे तितका रुजला नाही ह्याउलट क्रिकेट म्हणजे सगळ्याचा जीव.
असो आता काळ बदलला आणि तंत्रही बदलले.
१९९६ चे चित्रपट आणि क्रिकेट सगळं डोळ्यासमोर येऊन गेलं. चालू असलेला सामना भारताने जिंकला. टीव्ही बंद करून पाय मोकळे करायला बाहेर पडलो. आजूबाजूला फार मोठ्या प्रमाणात इमारतींची पुनर्निर्मिती चालू आहे. अश्याच एका इमारतीच्या बाहेर एक वॉचमन मोबाईलवर गाणी ऐकत होता. गाण्याचे बोल होते “पुछो ना कैसा मजा आ राहा हैं” अमित कुमार आणि एस जानकी ह्यांच्या आवाजातील हे गाणे देव आनंद निर्मित-दिग्दर्शित आणि अमीर खान अभिनित विस्मृतीत गेलेल्या ‘अव्वल नंबर ह्या १९९० च्या चित्रपटातील आहे. हा चित्रपट क्रिकेट ह्या विषयाला वाहिलेला होता. असो तसही भारतात क्रिकेट आणि चित्रपट यांचं घट्ट नातं आहे. क्रिकेट आणि क्रिकेटचे वेगवेगळे सामने ह्यांच्याशी निगडित कितीतरी स्मृती आहेत पण त्यांची चर्चा पुन्हा कधीतरी.