कसोटी क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट -विराट कोहली. 
३० डिसेंबर २०१४. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील शेवटचा दिवस. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यात महेंद्रसिंग धोनी आणि अश्विन यांनी टिच्चून केलेल्या फलंदाजीमुळे भारताला सामना अनिर्णित राखण्यात यश मिळाले. धोनी नेहमीप्रमाणे पत्रकार परिषदेला जाऊन आला आणि ड्रेसिंग रूम मध्ये त्यानी सर्व खेळाडूंना जमा करून आपण कसोटी क्रिकेटमधून रिटायरमेंट घेत आहोत असे जाहीर केले. सर्व खेळाडूंसाठी हा आश्चर्याचा धक्का होता. कोणाच्या ध्यानीमनी सुद्धा नव्हते कि धोनी असा काहीतरी निर्णय घेईल म्हणून. मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी धोनीने कसोटी क्रिकेटचा त्याग केला होता.
आता, भारताचा कर्णधार कोण होणार याची उत्सुकता सर्व क्रिकेट जगताला लागली होती. कसोटी क्रिकेट मध्ये कर्णधार पदासाठी एकच नाव सर्वांच्या डोळ्यासमोर होते ते म्हणजे विराट कोहलीचे. ऑस्टरेलियाविरुद्धच्या सिडनी मध्ये होणाऱ्या शेवटच्या सामन्यात विराटला कसोटी संघांचे नेतृत्व देण्यात आले. बचावात्मक पवित्रा घेणे विराटच्या स्वभावात न बसणारे होते. सिडनी कसोटीच्या शेवटच्या दिवशी भारताला जिंकण्यासाठी ३४८ धावांची आवश्यकता होती.
कोहलीने सर्व टीम ला एकत्र करून सांगितले की शेवटच्या डावात ३४८ धावांचा पाठलाग करणे सोपी गोष्ट नसली तरीही आपण आक्रमक क्रिकेटच खेळायचे. भले, तसे करताना आपल्याला सामना गमवावा लागला तरी चालेल पण आपण नेहमी जिंकण्याचा विचार करायचा, सामना अनिर्णित ठेवण्यासाठी खेळायचे नाही. ही कोहलीची आक्रमक विचारसरणी भारतीय टीम ला कसोटी क्रिकेट मध्ये वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणार होती. ही सुरुवात होती एका वेगळ्या विराट पर्वाची…..
मायदेशात टीम इंडिया अभेद्य…
विराट कोहलीने जेव्हापासून भारतीय कसोटी टीम चे नेतृत्व करायला सुरुवात केली तेव्हापासून आजतागायत भारताने मायदेशात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. भारताने २०१२ साली शेवटची कसोटी मालिका इंग्लंडविरुद्ध गमावली. त्यावेळी धोनी भारतीय टीम चे नेतृत्व करत होता. त्यानंतर २०१३ च्या ऑस्ट्रेलियाच्या मालिकेपासून ते डिसेंबर २०२१ पर्यंतच्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपर्यंत भारताने सलग १४ मालिकांमध्ये विजय मिळवला आहे.
विराट कोहली भारतीय टीम चा कर्णधार झाल्यापासून भारताने मायदेशात फक्त २ कसोटी गमावल्या आहेत यावरून भारताला भारतामध्ये येऊन हरवणे किती अवघड आहे याचा अंदाज येऊ शकतो. मायदेशात सलग १४ कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम भारताच्या नावावर आहे. यांनतर नंबर लागतो कांगारूंचा. त्यांनी घरच्या मैदानावर सलग १० कसोटी मालिका जिंकल्या होत्या.
Series | NO. of Tests | Result |
2012-2013 – India v. England | 4 | Eng 2-1 |
2013 – India v. Australia | 4 | India 4-0 |
2013-2014 – India v. West Indies | 2 | India 2-0 |
2015-2016 – India v. South Africa | 4 | India 3-0 |
2016-2017 – India v. New Zealand | 3 | India 3-0 |
2016-2017 – India v. England | 5 | India 4-0 |
2016-2017 – India v. Bangladesh | 1 | India 1-0 |
2016-2017 – India v. Australia | 4 | India 2-1 |
2017-2018 – India v. Sri Lanka | 3 | India 1-0 |
2017-2018 – India v. Afghanistan | 1 | India 1-0 |
2018-2019 – India v. West Indies | 2 | India 2-0 |
2019-2020 – India v. South Africa | 3 | India 3-0 |
2019-2020 – India v. Bangladesh | 2 | India 2-0 |
2020-2021 – India v. England | 4 | India 3-1 |
2021-2022 – India v. New Zealand | 2 | India 1-0 |
परदेशातही टीम इंडियाचा दबदबा…
भारतीय टीमच्या घरच्या मैदानावरील कामगिरीबाबत कोणाच्या मनात तसूभरही शंका नव्हती. पण, भारतीय संघाची विदेशातील कामगिरी खऱ्या अर्थाने सुधारली जेव्हा विराट कोहली टीमचा कर्णधार झाला. धोनी कर्णधार असताना भारतीय टीमने ऑस्ट्रेलियामध्ये आणि इंग्लंडमध्ये ४-० असा सपाटून मर खाल्ला होता. २०१८ च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून भारतीय टीमच्या कामगिरीमध्ये लक्षणीय फरक पडला.
त्या दौऱ्यात भारताने जोहान्सबर्ग येथे झालेल्या अतिशय अटीतटीच्या सामन्यात विजय मिळवला. भलेही भारताने ती मालिका २-१ अशी गमावली पण टीमचा नवा अवतार सगळ्यांना पाहायला मिळत होता. त्याच वर्षी भारत इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला. तिथेही भारताला फक्त एक सामना जिंकण्यात यश मिळाले पण त्या संपूर्ण मालिकेत भारतीय टीम ने खूप आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले होते.
२०१८ चा ऑस्ट्रेलिया दौरा भारतीय टीम साठी खूप ऐतिहासिक ठरला. भारताने तब्बल ७० वर्षांनंतर कांगारूंना त्यांचाच मैदानावर धूळ चारली आणि मालिका २-१ अशी खिशात घातली. याच कामगिरीची पुनरावृत्ती भारताने पुढच्या म्हणजेच २०२०-२१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर केली आणि कांगारूंना २-१ अशी मालिका गमवावी लागली. रिषभ पंतने केलेल्या तुफान फलंदाजीमुळे भारतने कांगारूंना ब्रिसबेन येथील कसोटी सामन्यात मात देत मालिकाविजय मिळवला.
२०२१ च्या इंग्लंड दौऱ्यात धमाकेदार कामगिरी केली. पहिल्या चार सामन्यात भारताने २-१ अशी आघाडी घेतली. पाचवा सामना कोविडच्या उद्रेकामुळे पुढे ढकलण्यात आला. तो सामना या वर्षी जुलै महिन्यात खेळवण्यात आला. इंग्लंडने सामना जिंकल्यामुळे मालिका २-२ अशी बरोबरीत राहिली. गेल्या काही वर्षात भारतीय टीमच्या विदेशातील कामगिरीत कमालीची सुधारणा झाली.
गांगुली, धोनी आणि विराट- भारताचा सर्वोत्कृष्ठ कसोटी कर्णधार कोण?
गंगीली, धोनी आणि विराट कोहली यांच्या कर्णधारपदाची तुलना करायला गेल्यास विराट कोहलीने भारताचे सर्वाधिक म्हणजे ६८ कसोटी सामन्यात नेतृत्व केले आहे. त्यापैकी ४० कसोटी सामन्यात विजय मिळवण्यात त्याला यश मिळाले. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय टीम ऑक्टोबर २०१६ ते मार्च २०२० असे सलग चार वर्ष कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर होती.
कोहलीच्या नेतृत्वाखालीच भारतीय टीमची परदेशातील कामगिरी सुधारली.विदेशात ३६ कसोटी सामन्यांमध्ये भारतीय टीम चे नेतृत्व करताना कोहलीने सर्वाधिक १६ विजय मिळवले. महेंद्रसिंग धोनीची घरच्या मैदानावरील कामगिरी चांगली असली तरी त्याला विदेशात विशेष असे यश मिळाले नाही. ६० सामन्यांमध्ये नेतृत्व करताना धोनीने २७ कसोटी सामन्यांमध्ये विजय मिळवला.
गांगुलीने ४९ सामन्यांमध्ये भारतीय टीमचे नेतृत्व करताना २१ विजय मिळवले त्यापैकी ११ विजय हे परदेशात जाऊन मिळाले होते.
Player | Matches | Won | Lost | Draw | Win % |
ViratKohli | 68 | 40 | 17 | 11 | 58.82 |
MS Dhoni | 60 | 27 | 18 | 15 | 45 |
SouravGanguly | 49 | 21 | 13 | 15 | 42.85 |