ball

वूमेन्स प्रीमियर लीग अर्थात WPL (दैनिक ऐक्य, सातारा)

by

अखेर त्या गोष्टीची लवकरच सुरुवात होत आहे. गेली काही वर्षे महिलांची टी-२० लीग व्हावी या दृष्टीने अनेक खेळाडू, अधिकारी, क्रिकेट बोर्ड आणि इतरही अनेक मंडळी प्रयत्न करत होती. लवकरच, म्हणजे २-३ आठवड्यातच भारताची महिला क्रिकेट लीग – वूमेन्स प्रीमियर लीगचे सामने खेळवले जातील. महिला क्रिकेटच्या दृष्टीने ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे.  १५-१६ वर्षांपूर्वी आयपीएलची सुरुवात झाली तेंव्हा अनेक मंडळींनी नाके मुरडली होती. बघता बघता हे लीग क्रिकेट आता एका वेगळ्या उंचीवर येऊन पोहोचलं आहे. आयपीएल पाठोपाठ सुरु झालेल्या इतर लीग्सनी देखील आता चांगलं बाळसं धरलं आहे. या आयपीएलच्या धर्तीवरच महिलांसाठी एक वेगळी लीग खेळवली जावी अशी चर्चा होत होती. आयपीएलच्या दरम्यान महिलांचे ३ संघ तयार करून त्यांची एक मिनी लीग भरवण्याचा प्रयोग देखील झाला. पण आता या वर्षीपासून भारतात महिलांसाठी एक वेगळी, मोठी लीग सुरु होईल. इतर देशांमध्ये – प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड, आधीपासूनच अशा लीग्स खेळल्या जात आहेत. ऑस्ट्रेलियाची वूमेन्स ‘बिग बॅश लीग’ आणि इंग्लंडची ‘हंड्रेड’ या लीग्स मध्ये जगभरातील महिला खेळाडू खेळतात, आणि पुरुषांच्या सामन्या इतकेच हे सामने आणि या लीग्स देखील लोकप्रिय आहेत. स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा सारख्या काही भारतीय खेळाडू या लीग्स मध्ये खेळताना दिसतात देखील. पण Womens Premier League च्या माध्यमातून आता भारतीय महिलांना देखील एक मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. परदेशी लीग्स मध्ये खेळणाऱ्या आणि भारतीय संघाचा भाग असणाऱ्या या महत्वाच्या खेळाडूंबरोबरच आता देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या इतर महिला खेळाडूंना देखील मोठ्या स्तरावर, आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर क्रिकेट खेळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. 


बीसीसीआयने या लीगची सुरुवात अतिशय व्यावसायिक पद्धतीने केली आहे. आयपीएल प्रमाणेच ही लीग देखील कशी फायदेशीर असेल असा पक्का व्यावसायिक दृष्टिकोन समोर ठेवून या लीगची रचना आहे. त्याचबरोबर संघमालक, स्पॉन्सर्स, जाहिरातदार या बाह्य गोष्टींचा पुरेपूर विचार करताना वेगवेगळे संघ, त्यामध्ये खेळणाऱ्या भारतीय महिला खेळाडू, आंतरराष्ट्रीय खेळाडू यांचा पूर्णपणे विचार केलेला दिसतो. या लीगमध्ये मुंबई (मुंबई इंडियन्स), दिल्ली (दिल्ली कॅपिटल्स), बंगलोर (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर), अहमदाबाद (गुजरात जायंट्स) आणि लखनौ (यूपी वॉरियर्स) असे पाच संघ असतील. देशातील मोठमोठ्या उद्योग समूहांनी (उदा. अडाणी, अंबानी, JSW इ.) या संघांचे मालकीहक्क विकत घेतले आहेत. या सर्वच संघ मालकांनी संघ उभारणीसाठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. एकूणच आयपीएल प्रमाणेच ही लीग देखील सुरुवातीपासूनच फायद्यात कशी राहील याचा व्यवस्थित विचार केलेला दिसतो. पहिल्याच वर्षात या संघ उभारणीसाठी जवळजवळ ४७०० कोटी रुपयांची गुंतवणूक देशातील प्रमुख उद्योगपतींकडून झालेली दिसते. एका आंतरराष्ट्रीय रिसर्च कंपनीच्या मते महिलांसाठी असलेल्या कोणत्याही खेळातील लीग्सचा विचार करता ही दुसऱ्या क्रमांकाची गुंतवणूक आहे. नक्कीच येणाऱ्या कालावधीत ही लीग देखील

आयपीएल प्रमाणे इतरही अनेक गुंतवणूकदार आणि जाहिरातदारांना भुरळ घालेल यात वाद नाही. 
नुकताच आयपीएल च्या धर्तीवर WPL साठी देखील लिलाव करण्यात आला. सुमारे १५०० खेळाडूंनी या लिलावात भाग घेतला आणि एकूण ८७ खेळाडूंची निवड करण्यात आली,ज्यामध्ये ३० परदेशी खेळाडू आहेत. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज या देशातील खेळाडूंचा या लीग मध्ये समावेश असेल. तसेच तारा नॉरीस या अमेरिकन खेळाडूचा देखील दिल्ली कॅपिटल संघाने आपल्या संघात समावेश केला आहे. मेग लँनिंग, सोफी डिव्हाईन, एलिस पेरी, हीथर नाईट, ऍशली गार्डनर, बेथ मूनी, अलिसा हिली हेली मॅथ्यूज सारख्या अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू या विविध संघांचा भाग असतील. भारतीय खेळाडूंचा विचार करता स्मृती मंधाना, रिचा घोष, रेणुका सिंग (बंगलोर), हरमनप्रीत कौर, पूजा वस्त्रकार (मुंबई), शफाली वर्मा, शिखा पांडे (दिल्ली), हरलीन देओल, स्नेह राणा (गुजरात), दीप्ती शर्मा, राजेश्वरी गायकवाड, देविका वैद्य (यूपी) या सर्वच खेळाडू WPL मध्ये खेळताना दिसतील. पैकी स्मृती मंधाना सारख्या खेळाडूवर तब्बल ३ कोटी ४० लाखांची बोली लावली गेली. बंगलोरच्या संघाने तिची कप्तान म्हणून देखील निवड केली आहे. त्याचबरोबर नुकत्याच निवृत्त झालेल्या मिताली राज आणि झुलन गोस्वामी यांना देखील या स्पर्धेत महत्वाची जबाबदारी पार पाडायची आहे. मिताली गुजरातच्या संघाची मेंटॉर असेल, तर झुलन मुंबईच्या. त्याचबरोबर प्रसिद्ध भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हिची बंगलोरच्या संघाच्या मेंटॉरपदी निवड करण्यात आली आहे. रॅचेल हेन्स, शार्लोट एडवर्ड्स, जोनाथन बेटी, जोन लुईस सारखे नामांकीत प्रशिक्षक या संघांना प्रशिक्षण देताना दिसतील.  

या पहिल्या वहिल्या WPL ची जोरदार तयारी सुरु आहे. आयपीएल प्रमाणेच ही लीग सुद्धा यशस्वी व्हावी यासाठी बीसीसीआय आणि लीगचे इतर पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. या लीगचे सर्व सामने मुंबईत (ब्रेबॉर्न स्टेडियम आणि डी. वाय. पाटील स्टेडियम) खेळले जातील. भारतीय खेळाडूंसाठी ही अतिशय चांगली संधी आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या अनेक महिला खेळाडूंना या लीग द्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना जवळून अनुभवता येईल. त्यांच्याबरोबर खेळणे, प्रॅक्टिस करणे, ड्रेसिंग रूम शेअर करणे हा त्यांच्यासाठी देखील एक मोठा अनुभव असेल. गेल्या काही वर्षात महिला क्रिकेटने कात टाकायला सुरुवात केली आहे. आता महिला क्रिकेटची आणि पर्यायाने क्रिकेटपटूंची परिस्थिती चांगल्या प्रकारे बदललेली दिसून येते. ही सुरु होणारी नवीन लीग या खेळाडूंना – खास करून भारतीय खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळवून देणार आहे यात शंका नाही. गेल्या काही वर्षात महिला क्रिकेट मोठ्या प्रमाणावर खेळले जात आहे. आयसीसी देखील नियमितपणे वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून ते जिवंत ठेवत आहे. आता या स्पर्धा टीव्ही आणि इतर मीडियावर नियमितपणे दाखवल्या जातात, त्यांना चांगला प्रेक्षकवर्ग देखील लाभतो. त्यामुळे साहजिकच स्पॉन्सर्स देखील या स्पर्धांकडे आणि महिला क्रिकेटकडे लक्ष ठेवून असतात. महिला क्रिकेटमध्ये होणाऱ्या दोन लीग्स – महिला बिग बॅश लीग आणि हंड्रेड, देखील तितक्याच लोकप्रिय आहेत. एकूणच महिला क्रिकेटला सोनेरी दिवस लाभले आहेत, आणि अशातच या नवीन WPL ची सुरुवात होत आहे. आयपीएल मुळे देशभरातील क्रिकेटपटूंना चांगले स्थैर्य तर मिळालेच, पण मोठ्या पातळीवर चांगला खेळ दाखवण्याची संधी देखील उपलब्ध झाली. त्याचप्रमाणे ही WPL देखील महिला क्रिकेटला आणि महिला क्रिकेटपटूंना निश्चितच एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल. 

– कौस्तुभ चाटे      

To know more about Crickatha