ball

ही चौकट मोडणार कधी? (दैनिक ऐक्य, सातारा)

by

दक्षिण आफ्रिकेत टी-२० महिला विश्वचषकातील उपांत्य फेरीचा सामना चांगला रंगात आला होता. सुरुवातीला गेलेल्या विकेट्स नंतर जेमिमा रॉड्रिग्स आणि हरमनप्रीत कौर या दोन प्रमुख खेळाडूंनी भारताची गाडी रुळावर आणली होती. दोन्ही खेळाडू रनरेट कडे लक्ष ठेवून चांगल्या पद्धतीने मार्गक्रमण करत होत्या. अचानक ऑस्ट्रेलियन गोलंदाज डार्सी ब्राऊन हिचा एक उसळता चेंडू जेमिमा विकेटकीपर च्या डोक्यावरून मारायला गेली, आणि झेलबाद झाली. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीतने डावाची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली. काही वेळाने ती देखील धावबाद झाली आणि लगोलग भारताच्या सामना जिंकण्याच्या आशांना सुरुंग लागला. ऑस्ट्रेलियन खेळाडूंना एक मार्ग सापडला, आणि त्यांनी चूक केली नाही. टिच्चून गोलंदाजी करत त्यांनी विजय मिळवला. भारताचा त्या सामन्यात केवळ ५ धावांनी पराभव झाला, आणि विश्वचषकाच्या स्पर्धेतून आपण बाहेर गेलो. ठीक आहे, एक पराभव झाला, खेळ आहे, हे होणारंच, आपल्या मुली चांगल्या खेळल्या … सगळं मान्य आहे. खेळ आहे, विजय-पराजय होत राहणार यात काही शंका नाही. पण गेल्या काही वर्षात हीच कथा आपण किती वेळा ऐकली आहे? २०१७ साली विश्वचषक स्पर्धेत हरमनने अप्रतिम शतक ठोकून ऑस्ट्रेलियाला नामोहरम करत आपल्या संघाला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला होता. इंग्लंड समोर अंतिम फेरीत खेळताना देखील आपण शेवटच्या क्षणी अडखळलो. २०२० च्या विश्वचषकात पहिल्या फेरीत ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केलं होतं, पण अंतिम सामन्यात मात्र त्यांच्याच समोर परत एकदा नांगी टाकली. मागच्या वर्षी कॉमनवेल्थ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात देखील तेच. परत एकदा उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. या अशा महत्वाच्या स्पर्धेत, एखाद्या महत्वाच्या सामन्यात आपली प्रमुख खेळाडू (बहुतेकवेळा हरमनप्रीत) बाद होते आणि आपण तो सामना प्रतिस्पर्ध्याच्या हवाली करतो. हे का घडतंय? हे महिला क्रिकेट मधलं विजेतेपद अनेक वर्षे आपल्याला खुणावतंय, पण…ही चौकट आपण मोडणार कधी? 


ऑस्ट्रेलिया विरुद्ध उपांत्य सामना. उपांत्य सामना कसला, हा तर जीवाची बाजी लावून खेळण्याचा सामना. सध्याचा ऑस्ट्रेलियन महिला संघ अतिशय ताकदवान आहे. (कधी नव्हता?) या संघाची तुलना कदाचित क्लाइव्ह लॉइड किंवा स्टिव्ह वॉ च्या संघांशी करता येईल, इतक्या ताकदीचा हा संघ. या संघाविरुद्ध खेळताना आपण १०० नाही २०० टक्के योगदान द्यायला हवं होतं. ज्या संघात अलिसा हिली, बेथ मूनी, मेग लॅनिंग, एलिस पेरी सारख्या खेळाडू आहेत त्या संघाविरुद्ध काही वेगळ्या योजना आखायला हव्या होत्या. आपण फक्त ५ गोलंदाज घेऊन खेळलो, आणि त्या प्रत्येकीने टांकसाळ उघडल्या सारखी धावांची लयलूट केली. आपल्याकडे पर्यायच नव्हते. या स्पर्धेत आपली गोलंदाजी एकूणच वाईट झाली. रेणुका सिंगने इंग्लंड विरुद्ध घेतलेले ५ बळी वगळता आपल्या गोलंदाजीबद्दल काही बोलूच शकत नाही. दीप्ती शर्मा, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे सगळ्याच अपयशी ठरत होत्या. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी अक्षरशः दिवाळी साजरी केली. आपण शेवटच्या ५ षटकात तब्बल ५९ धावा दिल्या, त्यात रेणुकाच्या शेवटच्या षटकात दोन षटकारांसह १८ धावांचा समावेश होता. हीच सगळी खिरापत आपल्याला पुढे त्रास देणार होती. आपली फलंदाजीची सुरुवात देखील चांगली झाली नाही. पहिल्या दोन षटकातच आपली सलामीची जोडी – शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना बाद झाल्या होत्या, पाठोपाठ यास्तिका भाटिया गेली. नाही म्हणायला जेमिमा आणि हरमनने जबाबदारीने खेळ केला, पण त्या दोघी बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने आपल्याला डोकं वर काढू दिलं नाही. 


कोण चुकलं? काय चुकलं? कधी सुधारणार? आपली गोलंदाजी खराब होती त्यात काही वादच नाही, पण क्षेत्ररक्षण… ते तर त्याही पेक्षा खराब होतं. आपण झेल सोडले, रनआऊटच्या संधी सोडल्या. अवांतर धावा दिल्या. त्याचं मोजमाप कोण करणार? शफाली आणि स्मृती आपल्या प्रमुख फलंदाज. पण कोणत्या महत्वाच्या सामन्यात त्यांनी जबाबदारीने खेळ केला आहे? खास करून ऑस्ट्रेलिया विरुद्ध स्मृती मंधाना कायमच अपयशी ठरत आली आहे. शफाली तडाखेबंद फलंदाजी साठी ओळखली जाते, पण महत्वाच्या सामन्यात मात्र तिची बॅट म्यान असते. दोघी स्वतःच्या बळावर कधी सामना जिंकून देणार आहेत? दीप्ती शर्मा आणि रिचा घोष दोघींनी खालच्या फळीत प्रयत्न निश्चित केले, पण ते अपुरे होते. दीप्ती संघातली वरिष्ठ खेळाडू आहे, तिने योग्य ती पावले उचलून फटकेबाजी करणे आवश्यक होते. रिचाने नुकताच अंडर १९ विश्वचषक जिंकून देण्यात मोठे योगदान उचलले होते, या स्पर्धेत देखील तिची कामगिरी चांगली झाली होती, पण या सामन्यात मात्र महत्वाच्या क्षणी ती जबाबदारी उचलू शकली नाही. आपल्या दोन प्रमुख फलंदाज जेमिमा आणि हरमन खेळल्या, पण स्वतःच्या चुकीमुळे दोघी पण बाद झाल्या. भारतीय संघ विजयाच्या मार्गावर होता. आता गरज होती संयमी खेळ करण्याची. अशा वेळी तो डोक्यावरून चाललेला चेंडू मारायची जेमिमाला काय गरज होती? हरमन धावबाद झाली. मान्य आहे की तिची बॅट अडखळली, पण इतक्या कॅज्युअली धावणं, कोणत्याही प्रकारे क्रिझमध्ये वेळेत पोहोचण्यासाठी कष्ट न घेणं भारतीय संघाला केवढ्याला पडलं? संघातल्या वरिष्ठ खेळाडूंकडून ही अपेक्षा नक्कीच नव्हती. या पराभवासाठी हे सगळे जबाबदार नाहीत का? ऑस्ट्रेलियन संघाला विजयाचा एक कवडसा जरी दिसला तरी ते दार उघडून मोकळे होतात. पराभव झाल्यानंतर हताश होणं स्वाभाविक आहे, पण ही कुऱ्हाड आपणच आपल्या पायावर मारून घेतली.    


आज भारतीय क्रिकेट बोर्ड आपल्या महिला खेळाडूंना पुरुष खेळाडूं इतकंच मानधन देत आहे. आणि मुळात प्रश्न त्यांना मिळणाऱ्या पैशांचा नाहीच आहे. त्या व्यावसायिक खेळाडू आहेत, त्यांना योग्य ते मानधन मिळालंच पाहिजे. पण क्रिकेट रसिक म्हणून त्यांनी चांगली कामगिरी करावी, संघाला विजेतेपद मिळवून द्यावं हीच आमची अपेक्षा आहे. (आणि ही गोष्ट आपल्या पुरुष संघाला देखील लागू होते.)  आता काही दिवसात WPL सुरु होईल. ही स्पर्धा सर्वच खेळाडूंसाठी महत्वाची असेल. कदाचित IPL प्रमाणेच WPL देखील आपलं क्रिकेट बदलून टाकेल. या स्पर्धेचा फायदा आपल्या खेळाडूंना आणि राष्ट्रीय संघाला व्हावा अशीच इच्छा आहे. मला खात्री आहे की आपल्या संघाचा कोच हृषीकेश कानिटकरने संघावर नक्की मेहनत घेतली असेल. राग आपल्या मुलींवर पण नाहीये. पण ही गोष्ट सतत घडते आहे. २०१७ मध्ये अंतिम  सामन्यात आपण इंग्लंड कडून फक्त ९ धावांनी पराभूत झालो होतो, तेंव्हा वाटलं ठीक आहे, आपल्या खेळाडूंना पुरेसा अनुभव नाही. पण आता तसं देखील म्हणता येत नाही. आपण महत्वाच्या सामन्यात कायमच कच खातो आहोत. या संघाला एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाची किंवा मेंटल कोचची गरज आहे का? आज महिला क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर आहे. कदाचित येणारं दशक हे महिला क्रिकेटचं असू शकेल. अशावेळी भारतीय संघ त्या रेसमध्ये मागे पडू नये हीच आमची इच्छा आहे. आपण त्या अंतिम रेषेच्या खूप जवळ पोहोचलो आहोत, एकदा नाही तर अनेकदा…. आता गरज आहे ती एका नॉकआऊट पंचची. तो ठोसा आपण कधी मारतोय हेच बघणे महत्वाचे आहे.

 
– कौस्तुभ चाटे        

To know more about Crickatha