अशक्यप्राय विजय (दैनिक ऐक्य)
क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम सामना कोणता असं जर विचारलं तर प्रत्येक क्रिकेटप्रेमी वेगवेगळं उत्तर देईल. आता क्रिकेट हा नुसता खेळ राहिलेला नसून एक व्यवसाय झाला आहे. त्यामुळे प्रत्येक लीग मधील प्रत्येक सामना चुरशीचा होत असतो. त्यात भरीस भर म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट आहेच. एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटचे चाहते देखील जगभर आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे सर्वोत्तम सामना बदलत राहणारच आहे. चला, तात्पुरता कसोटी सामन्यांचा विचार करूया. गेल्या सुमारे १५० वर्षात साधारण २५०० कसोटी सामने खेळले गेले आहेत. (खरं म्हणजे लवकरच २५०० वा कसोटी सामना खेळला जाईल.) या सगळ्याचा विचार करता २ टाय टेस्ट मॅचचा उल्लेख बहुतेक सगळेच करतील. १९६०-६१ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज असा ब्रिस्बेन येथे झालेला सामना खऱ्या अर्थाने चुरशीचा झाला. दोन्ही संघ विजयाच्या अगदी जवळ पोहोचून देखील विजयी होऊ शकले नाहीत. दोन्ही संघांनी विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सामन्याची स्थिती सतत बदलत होती, आणि सामन्याचा शेवट मात्र ‘टाय’ म्हणजेच बरोबरीत झाला. तीच गत १९८६ च्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टाय टेस्टची. मद्रास इथे झालेला हा सामना देखील चांगलाच रंगला, पण एकही संघ विजयी ठरू शकला नाही, ना पराभूत झाला ना सामना अनिर्णित राहिला. या २ टाय टेस्ट वगळता अनेक सामने अत्यंत चुरशीने खेळले गेले. भारतीय रसिकांसाठी २००१ चा कोलकाताची भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट आणि २०२० चा ब्रिस्बेन कसोटी सामना कदाचित सर्वात जास्त संस्मरणीय असेल. पण इतर संघांनीही असेच काही संस्मरणीय आणि महत्वाचे सामने खेळले आहेत.
क्रिकेट रसिकांना २०१८ ची अबूधाबीची कसोटी आठवत असेल, जेंव्हा न्यूझीलंडने पाकिस्तानला फक्त ४ धावांनी हरवले होते. किंवा १९९४ साली दक्षिण आफ्रिकेने फॅनी डी व्हिलर्स च्या गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला सिडनी कसोटी मध्ये मात दिली होती. २०१९ मध्ये श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेचा डर्बनमध्ये १ विकेटने पराभव केला होता. १९८७ साली सुनील गावसकरने बंगलोरमध्ये आणि १९९९ साली सचिन तेंडुलकरने चेन्नईमध्ये अप्रतिम फलंदाजी करून सुद्धा पाकिस्तानने दोन्ही सामन्यात भारताला अतिशय कमी फरकाने हरवले होते. अशा एक ना अनेक सामन्यांचा दाखला आपण देऊ शकतो. क्रिकेटची आणि खास करून कसोटी क्रिकेटची मजा या अटीतटीच्या सामन्यांमध्येच आहे. १९९३ साली असाच एक सामना ऍडलेड मध्ये खेळला गेला, जिथे वेस्टइंडीजने ऑस्ट्रेलियाला फक्त एका धावेने हरवले होते. विजयासाठी केवळ १८४ धावांची गरज असताना कर्टली अँब्रोज आणि कोर्टनी वॉल्शच्या गोलंदाजीच्या जोरावर वेस्टइंडीजने चमत्कार घडवला होता. आजही खरा क्रिकेट रसिक त्या सामन्याची आणि अँब्रोज-वॉल्श जोडीची आठवण प्रेमाने काढतो. २००५ साली बर्मिंगहॅमला असाच एक सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया मध्ये खेळवला गेला. ऍशेस मालिकेचे महत्व दोन्ही संघांसाठी काय आहे ते वेगळे सांगायला नकोच. त्या सामन्यात विजयासाठी २८२ धावांची गरज असताना ऑस्ट्रेलियाचा संघ २७९ मध्ये सर्वबाद झाला होता. इंनिंग मधली शेवटची कॅस्प्रोविक्सची पडलेली विकेट, त्या नंतर चेहरे पडलेले ऑस्ट्रेलियन खेळाडू, जल्लोष करणारे इंग्लिश खेळाडू आणि त्याचबरोबर मैदानावरील दोन्ही फलंदाजांचे सांत्वन करणारे खेळाडू देखील जगाने बघितले. काही वर्षांपूर्वी शेवटच्या फलंदाजाबरोबर भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला हरवणारा बेन स्टोक्स देखील आपण बघितला. अशी एक ना अनेक सामन्यांची उदाहरणे देता येतील हे नक्की. आज या सगळ्याच सामन्यांची आठवण काढायचे कारण म्हणजे काहीच दिवसांपूर्वी संपलेली न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड कसोटी. अतिशय चुरशीने खेळल्या गेलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडचा केवळ १ धावेने पराभव गेला. २५८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ फक्त २५६ धावा करू शकला. ही कसोटी देखील ‘ऑल टाइम फेव्हरेट’ मध्ये नक्की गणली जाईल.
सध्या इंग्लंडचा कसोटी संघ वेगळ्याच फॉर्ममध्ये आहे. मागच्या वर्षी न्यूझीलंडचा माजी खेळाडू ब्रॅंडन मॅक्युलमने या संघाची धुरा हाताशी घेतल्यानंतर कसोटी क्रिकेटचे निकषच बदलून टाकले. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये एक वेगळीच आक्रमकता आणली. ‘बाझबॉल’ या नावाने ओळखली जाणारी ही आक्रमकता सध्याच्या घडीला कसोटी क्रिकेटमधील सर्वात चर्चिली जाणारी गोष्ट आहे. या आक्रमकतेला साथ लाभली ती इंग्लिश खेळाडूंची. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली या संघाने आक्रमकता अंगीकारून मैदान गाजवायला सुरुवात केली. स्टोक्स पाठोपाठच झॅक क्रॉली, जोस बटलर, ओली पोप, जो रूट आणि नवीन आलेला हॅरी ब्रूक, या सर्वांनी आक्रमक फलंदाजी करायला सुरुवात केली. न्यूझीलंड विरुद्धच्या या कसोटी मालिकेतही वेगळे काही घडत नव्हते. पहिला कसोटी सामना जिंकून इंग्लिश संघ भलत्याच जोशात होता. वेलिंग्टनला खेळला जाणारा दुसरा सामना देखील पाहुण्यांनी जवळजवळ खिशात घातलाच होता. पहिल्या डावात २२६ धावांची आघाडी मिळाल्यानंतर त्यांनी किवीना फॉलो-ऑन दिला. दुसऱ्या डावात मात्र न्यूझीलंडचे खेळाडू चांगले खेळले. केन विलियम्सनच्या शतकाच्या जोरावर त्यांनी ४८३ धावा जमवल्या. त्याला इतर खेळाडूंची मोलाची साथ लाभली. इंग्लिश संघाला हा सामना जिंकण्यासाठी चौथ्या डावात २५८ धावांची गरज होती, आणि त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न सुरु केलेही होते. चौथ्या दिवशीचा खेळ संपला तेंव्हा इंग्लंडच्या दुसऱ्या डावात एक गाडी बाद ४८ धावा झाल्या होत्या, आणि सामना अजूनही त्यांच्या ताब्यात होता.
पाचव्या दिवशी मात्र किवी गोलंदाजांनी सकाळपासूनच तिखट मारा सुरु केला, आणि त्यांना यश देखील मिळत गेलं. इंग्लिश फलंदाज बाद होत गेले, आणि एका वेळी त्यांची धावसंख्या ५ बाद ८० अशी होती. क्रॉली, डकेट, पोप.. इतकंच काय पण प्रचंड फॉर्म मध्ये असलेला हॅरी ब्रूक देखील लगेच बाद झाला. हा सामना न्यूझीलंड जिंकेल अशी लक्षणं असतानाच बेन स्टोक्स आणि जो रूटने डाव सावरला. पण परत एकदा किवी गोलंदाजांनी चांगली कामगिरी करून इंग्लिश फलंदाजांवर दबाव आणायला सुरुवात केली. जिंकण्यासाठी ७ धावांची गरज असताना इंग्लंडचा जेम्स अँडरसन फलंदाजीला आला. जोडीला इंग्लंडचा चष्मीश ऑफ स्पिन बॉलर जॅक लीच होता. दोघांनी ७ पैकी ५ धावा जमवल्या देखील. अँडरसनने एक चौकार मारून विजयाच्या दृष्टीने पाऊल देखील टाकले होते. पण न्यूझीलंडचे गोलंदाज – खास करून नील वॅग्नर हार मानणारे नव्हते. त्यांनी इंग्लिश फलंदाजांना चकवण्याचे सत्र सुरूच ठेवले होते. अशातच लेग स्टंपवर पडलेला एक चेंडू अँडरसन खेळला, चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन मागे गेला, आणि यष्टीरक्षक टॉम ब्लांडेलने उजवीकडे झेपावत कॅच घेतला आणि इंग्लंडचा डाव संपला. अतिशय चुरशीने खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लंडचा एक धावेने पराभव झाला. अर्थातच किवी खेळाडूंसाठी आणि समर्थकांसाठी हा सामना एक अजरामर सामना म्हणून कायमच लक्षात राहील.
इकडे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिका होत असताना, सामने ३ दिवसात संपत आहेत. स्पिन गोलंदाजीसाठी उपयुक्त असलेल्या विकेट्सवर ऑस्ट्रेलियन आणि भारतीय फलंदाज देखील काही खास करू शकले नाहीयेत, आणि त्यामुळे या सामन्यातील रंजकता देखील काहीशी कमी झाली आहे. त्यात हा असा (न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड) सामना रंगला की क्रिकेट रसिकांचे लक्ष हमखास तिकडे जाते. भारतातही अनेक रसिकांनी आपला कसोटी सामना बाजूला ठेवून या सामन्याचा आनंद घेतला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अनेक अजरामर सामने झाले आहेत, त्यातीलच हा एक सामना कायमच आपल्या लक्षात राहील. हीच कसोटी क्रिकेटची खरी गंमत आहे. हे असे अशक्यप्राय सामाणेच कसोटी क्रिकेट जिवंत ठेवतात.
– कौस्तुभ चाटे