ball

आपला तो बाब्या           

by कौस्तुभ चाटे


इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लॉर्ड्स मैदान, दुसरा कसोटी सामना. इंग्लंडला विजयासाठी ३७१ धावांची गरज होती, आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी त्यांची दाणादाण उडवली होती. एक वेळ अशी आली की इंग्लंडचा निम्मा संघ १७७ धावांत पॅव्हिलियन मध्ये परतला होता. मैदानावर इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्स आणि यष्टीरक्षक-फलंदाज जॉनी बेअरस्टो खिंड लढवत होते. इंग्लंडसाठी त्यांनी मैदानावर असणे आवश्यक होते. बेअरस्टो नुकताच फलंदाजीला आला होता. इंग्लंडसाठी या दोघांनी मैदानावर उभे राहणे आवश्यकच होते, आणि अचानक ‘ती’ घटना घडली. कॅमरून ग्रीनचा एक आखूड टप्प्याचा चेंडू बेअरस्टोने सोडून दिला. तो षटकातील शेवटचा चेंडू होता. चेंडू सोडून देताच तो क्रिझवर बॅट ठेवून (षटक संपले आहे असा विचार करत) बेन स्टोक्सशी बोलायला गेला. इकडे, यष्टीरक्षक कॅरीच्या हातात अजूनही चेंडू विसावत होता. त्याने चेंडू हातात येताच यष्टींकडे फेकला, चेंडू यष्टीला लागला तेंव्हा जॉनी बेअरस्टो क्रीझपासून चांगला दीड-दोन फूट पुढे होता. इथे मैदानावरील पंचांनी तिसऱ्या पंचाची मदत घेतली, आणि बेअरस्टोला बाद ठरवले गेले. जॉनी बेअरस्टो बाद झाला आणि मैदानावर एकच गोंधळ उडाला. अशा पद्धतीने त्याला बाद केले गेले म्हणून प्रेक्षकांनी ऑस्ट्रेलियन संघाला ‘बू’ करायला सुरुवात केले. क्षणातच त्यांच्यावर अखिलाडूवृत्ती असल्याचा  ठपका ठेवला गेला आणि क्रिकेटमध्ये ‘फेअर प्ले’ किती महत्वाचा आहे त्याचे गोडवे गायला सुरुवात झाली. इतकेच नाही तर, लंचच्या वेळी ऑस्ट्रेलियन संघ पॅव्हिलियनमध्ये परतत असताना, लॉर्ड्सच्या लॉंगरूम मध्ये – जिथे ‘मेरलीबोन क्रिकेट क्लब’ चे सदस्य बसतात, तिथे त्यांना ‘चिटर्स’ म्हणून हिणवण्यात आले. इंग्लंड पुढे कसोटी सामना हरले, पण आठवडाभर याच गोष्टीची चर्चा सुरु होती. 


बेअरस्टोच्या बाद होण्यानंतर क्रिकेटमधील ‘फेअर प्ले’ बद्दल पुन्हा बोलले गेले. गेली अनेक वर्षे त्याबद्दल वेळोवेळी बोलले जात आहे. मुळात क्रिकेटच नाही, कोणत्याही खेळात ‘फेअर प्ले’ असणे आवश्यकच आहे. कोणत्याही खेळाचा गाभा तोच असला पाहिजे. त्याचबरोबर कोणताही खेळ हा जिंकण्यासाठीच खेळला गेला पाहिजे. खेळभावना महत्वाची आहेच, पण खेळात जिंकणे देखील महत्वाचे आहे, किंबहुना काकणभर जास्त महत्वाचे आहे. क्रिकेटमधील ‘फेअर प्ले’ आणि अथलेटिक्स किंवा टेनिस मधील ‘फेअर प्ले’ वेगळा नसतो. ही भावना प्रत्येक खेळाडूंच्या रक्तात असलीच पाहिजे. पण क्रिकेटमध्ये या भावनेचे थोडे जास्तच अवडंबर केले जात आहे का? ‘फेअर प्ले’ या गोंडस नावाखाली खेळाचे महत्व कमी केले जात आहे का? आज परत एकदा हा प्रश्न विचारावासा वाटतो कारण ज्या संघावर ‘अन्याय’ होतो, तो संघ आणि त्यांचे समर्थक या गोंडस नावाखाली अनेकदा दुसऱ्या संघाचे वाभाडे काढताना दिसतो. लॉर्ड्सच्या सामन्यात देखील हेच झाले. ऑस्ट्रेलियन संघ धुतल्या तांदळाचा आहे असे माझे मत नक्कीच नाही, पण झालेल्या प्रसंगात त्यांची बाजू निश्चितच बरोबर होती. इंग्लिश समर्थकांनी, क्रिकेट समीक्षकांनी, माजी खेळाडूंनी आणि कर्णधार, कोचसकट बहुतेकांनीच त्यांना ‘अपराधी’ म्हणून घोषित करून टाकले. अगदी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी देखील यावर भाष्य केले. हे सगळे बघितल्यावर मला मराठीमधली एक म्हण आठवली – ‘आपला तो बाब्या, आणि दुसऱ्याचे ते कार्टे’. 

हे असेच प्रसंग गेल्या काही वर्षात आपण बघितले आहेत. आयपीएल खेळताना अश्विनने जोस बटलरला गोलंदाजी करताना धावबाद केले. (ज्याला मंकडींग असा अत्यंत चुकीचा शब्द वापरला जातो.) त्यावेळीदेखील गदारोळ माजला होता. जोस बटलर क्रीझपासून लांब असताना यष्टीला चेंडू लावून त्याला बाद करण्याचा अधिकार अश्विनला होता, त्याने तो अधिकार वापरला असेल तर त्यात चूक काय आहे. हीच गोष्ट २ वर्षांपूर्वी भारताच्या दीप्ती शर्माने इंग्लंडच्याच चार्ली डीनच्या बाबतीत केली होती. अनेक वर्षांपूर्वी कपिल देवने दक्षिण आफ्रिकेच्या पीटर कर्स्टनला असेच बाद केले होते. या प्रत्येक प्रसंगी फलंदाज चुकीचे वागून सुद्धा, गोलंदाजाला ‘व्हिलन’ ठरवले गेले आहे. ओरडा करणाऱ्यांचे मत बहुतेकवेळा ‘आधी वॉर्निंग द्यायला पाहिजे’ असे असते. मुळात प्रश्न आहे की वॉर्निंग देण्याची गरज का आहे? फलंदाजाला खेळाचे हे साधे नियम ठाऊक नाहीत? आणि हो, या सर्व ठिकाणी गोलंदाज भारतीय आहेत म्हणून मी बोलतो आहे असे कृपया समजू नका. गोलंदाजी करणारा नॅथन लायन अथवा शाहीन शाह आफ्रिदी असेल आणि क्रिझ सोडून जाणारा फलंदाज विराट किंवा सूर्यकुमार यादव असेल तरी देखील माझे मत हेच असेल. 


आणि क्रिकेटमधील खिलाडूवृत्तीबद्दल इंग्लंड सारख्या संघाने न बोललेलेच बरे. २०१९ च्या विश्वचषकातील अंतिम सामन्याचे उदाहरण आपल्या सर्वांच्या समोर आहे. बेन स्टोक्सच्या हाताला चेंडू लागून सीमापार गेला, तेंव्हा पंचाला नियमाप्रमाणे ४ धावा – चौकार देणे भाग पडले. त्याच चेंडूनंतर अंतिम सामन्यात इंग्लंडचा संघ न्यूझीलंडच्या धावसंख्येच्या जवळ पोहोचला, नंतर सामना आणि सुपर ओव्हर मध्ये समान धावसंख्या झाल्यावर शेवटी ‘चौकार’ कोणी जास्त मारले यावर विश्वविजेता ठरवावा लागला. त्यावेळी इंग्लंडची खिलाडूवृत्ती कुठे गेली होती? तेंव्हा तुम्ही नियमांचाच आधार घेतला ना? अगदी काही वर्षांपूर्वी धोनीने इंग्लंडमध्येच इयान बेलला बाद दिल्यानंतर ‘खिलाडूवृत्ती’ चा आदर करत आपले अपील मागे घेऊन फलंदाजी सुरु ठेवण्यास सांगितले होते. धोनीच्या त्या निर्णयाचे कौतुक झाले, अगदी त्याला ‘स्पिरिट ऑफ द क्रिकेट’ असे बक्षीस देखील देण्यात आले. धोनीचा तो परत बोलावण्याचा निर्णय देखील नक्कीच चुकीचा होता. एखाद्या खेळाचे नियम खेळ सुरु होण्याच्या आधीच ठरवलेले असतात. मग अशावेळी नियमानुसार बाद ठरवल्या गेलेल्या फलंदाजाला खेळण्यासाठी परत बोलावणे हाच खेळाचा अपमान नाही का? 

आपण सगळ्यांनी इंटरनेटवर व्हिव रिचर्ड्सचा व्हिडीओ बघितला असेल. फलंदाजाला बाद करण्याची संधी असताना देखील त्याने यष्टीला चेंडू लावला नाही. किंवा अजून एका प्रसंगात कोर्टनी वॉल्श गोलंदाजी करताना नॉन स्ट्रायकर असलेला फलंदाज क्रिझ सोडून पुढे गेला तरी, त्याने त्या फलंदाजाला बाद केले नाही. या दोन्ही प्रसंगात त्या गोलंदाजांचे कौतुक झाले. त्यांनी खेळभावनेने खेळ केला असे म्हटले गेले. पण त्यांनी फलंदाजाला बाद न करण्याचा निर्णय घेतला, याचा अर्थ प्रत्येक गोलंदाजाने तसेच वागले पाहिजे असे होत नाही. जर प्रत्येक गोलंदाजाने असे वागायचे असेल तर नियमांना काय अर्थ राहतो? 
आणि कल्पना करून बघा, इथे ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक कॅरीच्या जागी आशियाई खेळाडू असता तर? एव्हाना आशियाई खेळाडू कसे चुकीचे आहेत या विषयावर रकानेच्या रकाने भरून आले असते. एव्हाना क्रिकेटमधील ‘महायुद्धाचे’ पडसाद सगळीकडे दिसायला लागले असते. हा जेंटलमन लोकांचा खेळ कसा बिघडत चालला आहे याच्या कहाण्या रचल्या गेल्या असत्या. जॉनी बेअरस्टोच्या प्रसंगात कमी जास्त प्रमाणात हेच घडलं. लॉर्ड्सच्या प्रेक्षकांनी, इंग्लिश समीक्षकांनी आणि त्या लॉंगरूम मधील इंग्लिश समर्थकांनी जे केलं ते नक्कीच चुकीचं होतं. 

इंग्लंडचा कोच ब्रॅंडन मॅक्युलम याने देखील ऑस्ट्रेलियन संघावर टीका केली. मजा आहे ना, काही वर्षांपूर्वी अशाच एका प्रसंगात या मॅक्युलमच्याच नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाने श्रीलंकेच्या मुरलीधरनला असाच क्रिझ सोडून गेल्यावर धावबाद केलं होतं. त्यावेळी त्याचा तो निर्णय बरोबर होता. तिथे खेळभावनेचे उल्लंघन झाले नव्हते. पण हा प्रसंग त्याच्या संघावर ओढवला तर मात्र… 

बरोबर आहे… आपला तो बाब्या, दुसऱ्याचे कार्टे       

To know more about Crickatha