बडा ख्याल
खेळ सुरू व्हायच्या आधीची हुरहूर. बघणाऱ्यांच्या आणि खेळणाऱ्यांच्या मनात वेगवेगळ्या प्रकारची. अगदी काहीच वेळात सुरुवात होणार आहे. सगळं काही सज्ज आहे. गोलंदाज, फलंदाज, आणि क्षेत्ररक्षक ह्या सगळ्यांनी आपापल्या मनातला खेळ थांबवलाय आणि ते आता मैदानावर आहेत. जिंकण्यासाठी कसं काय काय करायचं ह्यावर केलेला विचार मैदानावर येऊन तपासायला ते तयार झालेत. हा खेळ आता एक नाही, दोन नाही, चांगला पाच दिवस चालणार आहे. विरोधी संघानं लावलेल्या सापळ्यांतून सहीसलामत निसटत नव्या सापळ्याच्या दिशेनं हळूहळू जात सामना आपल्याच बाजूनं कसा झुकलेला राहील ह्यासाठी खेळाडू प्रयत्नांचे डोंगर हलवून इकडून तिकडे करायला सिद्ध झालेत. हा क्रिकेटचा बडा ख्याल आहे. हा कसोटी सामना आहे!
क्रिकेटच्या ह्या बडा ख्यालात आपला खेळाचा विचार शांतपणे, एखाद्या विद्वानासारखा मांडत मांडत शेवटाकडे नेणारे अगदी मोजके संघ. ह्यातल्याच दोन संघातल्या विचारपूर्वक मांडल्या गेलेल्या एका कसोटीची ही कहाणी आहे. ती कहाणी आपली आणि त्यांची, ती कहाणी भारताची आणि तितकीच ऑस्ट्रेलियाचीही. हे साल आहे २००१. बरोबर वीस वर्षं होऊन गेलेली आहेत. गोष्ट जरी भूतकाळातली असली तरी कसोटीच्या बाबतीत ती कायम वर्तमानातच असल्यासारखी आठवली गेली होती, आहे आणि असेल, कारण बडा ख्याल कधीही म्हातारा होत नाही!
गेल्या काही दशकांत भारताचा संघ भारताच्या मैदानांवर जवळपास अजिंक्य असतो. ते वारवांर सिद्ध झालेलं आहे. त्या वेळी मात्र ह्या अनभिषिक्त साम्राज्याला आव्हान द्यायला ऑस्ट्रेलिया संघ आलेला होता. हे आव्हान तगडं होतं कारण त्या आधी ह्या संघानं सलग १५ कसोटी सामने जिंकलेले होते. वेस्ट इंडीजला ५-० असं हरवून १९८४पासून अबाधित असलेला सलग ११ कसोटी जिंकण्याचा त्यांचाच विक्रम त्यांनी मोडीत काढला होता. ऑस्ट्रेलियानं त्यांच्या खेळाचा ‘रियाज’ सिद्ध करून दाखवला होता आणि आपल्या काळजीत भर पडली. झालंसुद्धा तसंच. आल्या आल्या ऑस्ट्रेलियानं द तेंडुलकर, द द्रविड, द लक्ष्मण आणि द गांगुली असलेल्या भारतीय संघाला पहिल्या कसोटीत दहा गडी राखून सहज हरवलं. सलग जिंकलेल्या एकूण कसोट्यांची संख्या आता झाली तब्बल सोळा! हा म्हणजे भारताच्या घरच्या साम्राज्याला लागलेला मोठा सुरुंग होता. मालिकेच्या पराभवाचं गडद काळं सावट घेऊन कोलकत्याच्या ईडन गार्डन्समध्ये सुरू झाला दुसरा कसोटी सामना.
परिस्थिती सगळ्या बाजूनं आपल्यावर मात करायला टपून बसली आहे हे आधी आपल्याला कुठं माहीत असतं? तिच्या, परिस्थितीच्या कह्यात हळूहळू जायला लागलो की लक्षात येतं की, अरे असं आहे तर. मग त्यातून सुरक्षित बाहेर कसं पडायचं ह्याचा विचार सुरू होतो. त्यासाठी अधिष्ठान हवं, खेळाचा, जगण्याचा खरा विचार हवा. हा सगळा विचार कसाला लागावा, अशी परिस्थिती ऑस्ट्रेलिया संघानं भारतीय संघापुढे निर्माण करून ठेवली. जवळजवळ दोनशेच्या आसपास धावा कुटल्यानंतरही त्यांचा एकच खेळाडू बाद झाला होता. १ बाद १९३वर रुंद खांद्यांचा खंदा हेडन पाय गाडून उभा होता आणि चारही दिशांकडून धावा मिळवत होता. त्यानंतर मात्र भारताला संधीचं छोटंसं दार किलकिलं झालं आणि भारतानं आपला पाय त्या छोट्याशा फटीतून भक्कम आत सरकवला. पुढच्या चाळीसेक धावांत तीन गडी अंतराअंतरानं बाद झाले. फलंदाजांना नाचवणारा हरभजन ते दार धाडकन उघडून टाकण्यासाठी तयार झाला होता. धावसंख्या ४ बाद २५२ होती आणि पाँटिंग बाद झाला, त्यापाठोपाठ आलेला गिलख्रिस्ट पुढच्याच चेंडूवर एलबीडब्ल्यू झाला आणि त्याच्या पुढच्याच चेंडूला शेन वॉर्न! हरभजननं कसोटीत दुर्मिळ असलेली हॅटट्रिक साधली होती. ७ बाद २५२वर संधीचं दार सताड उघडं झालं होतं आणि आपल्याला चटकन त्यातून बाहेर पडायचं होतं. पण जगणं आणि खेळणं इतकं सोपं थोडंच असतं? दाराच्या पलीकडे त्यांचा एक खंदा सेनापती उभा होता. स्टीव वॉनं गिलेस्पी नावाच्या आपल्या चिवट पहारेकऱ्याला दारासमोर उभं केलं आणि आपल्या भक्कम बॅटनं ते उघडलेलं संधीचं दार पुन्हा आपल्या नाकासमोर लावून टाकलं. आपल्याच जखमा सहन करत शेवटी जेव्हा आपण ऑस्ट्रेलियाचे सगळे फलंदाज बाद केले झाले तेव्हा धावफलक ४४५ ही संख्या दाखवत होता. हरभजननं ७ मोहरे गारद केले होते पण ११० धावा करून स्टीव वॉनं करायचं ते नुकसान करून ठेवलं होतं.
ही संख्या आपल्या दणकट असलेल्या मधल्या फळीला अगदीच अशक्य होती असं नाही. सलामीची जोडी किती चांगली सुरुवात करते ह्यावर सगळं अवलंबून होतं. आपल्याला कसलीही सुरुवात करताना असंच वाटतं की हे आपल्याला जमू शकतं. आशा ही एक मोठी भावना आहे, ती भल्याभल्यांना सुटत नाही. म्हणून रमेश आणि दास ह्या दोघांनाही आपण प्रत्येकी शंभरशंभर धावा करून निम्मी आघाडी तर आपल्याआपल्यातच संपवू असं वाटलं असायची शक्यता नाकारता येत नाही. ह्याचा अर्थ ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज सहिष्णू होते असा होत नाही. त्यांनी तोफखाना सुरू केला आणि रमेश शून्यावर उडाला! त्यानंतर थोड्या थोड्या अंतरानं फलंदाज येऊन हजेरी लावून जात होते. एका बाजूला लक्ष्मण शांतपणे त्याच्या लयीत खेळत होता, पण भारतीय संघाच्या नावेला भलं मोठं भोक पडलं होतं, पाणी आत शिरत होतं, सगळा हलकल्लोळ माजला होता. पराभवाच्या भोवऱ्याकडे हळूहळू सरकत निघालो होतो आपण. तो आपल्याला आता लगेच गिळणार की काही वेळानंतर, एवढाच प्रश्न शिल्लक राहिला होता.
लक्ष्मणनं बाकी उपाय संपल्यावर फटकेबाजी केली आणि ५९ धावा करून बाद झाला. अजिंक्य, बलाढ्य आणि चिरडून टाकणाऱ्या अमर्याद सत्तेचा सम्राट स्टीव वॉ एखाद्या राजाला शोभेल असा सावकाश पुढे आला आणि एक हात पुढे करून म्हणाला, ‘प्लीज फॉलो ऑन!’ सलग सतराव्या विजयाचे पडघम आधीच त्याच्या मनात वाजायला सुरुवात झाली होती. कितीही मोठे फलंदाज असले तरी तब्बल तीन दिवस, अगदी तीन नाही तरी किमान दोन दिवस पाय रोवून उभं रहाणं केवळ अशक्य होतं.
त्या दुसऱ्या दिवसाच्या जे त्यांच्या आज्ञेचा मुकाट्याने स्वीकार करण्यापलीकडे आपल्याला काहीही करता येण्याजोगं नव्हतं. फॉलो ऑन मिळाला होता. आता ह्या वेळी काय वेगळं घडणार होतं? सगळ्यांच्या आशाआकांक्षा आपल्या मधल्या फळीवर रोखल्या गेल्या होत्या. ते काय करतील हाच एक प्रश्न. काही घडलं तर तिथंच. ‘किमान ड्रॉ, अनिर्णित तरी करा सामना’ अशी माफक अपेक्षा तमाम प्रेक्षकांच्या मनात. सगळीकडे पडझड होत असताना किडूकमिडूक तरी शिल्लक राहावं म्हणून आपण नाही का प्रयत्न करत? तसंच होतं ते. पराभव नको, कुठल्याही परिस्थितीत नको. नियतीच्या मनात असेल तेच होईल, म्हणून आपली दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. नाबाद ५२ धावा फलकावर लागल्या आणि तीन फलंदाज त्याच्या पुढच्या साधारण साठेक धावांत बाद झाले. धावफलक होता ३ बाद ११५. ज्यानं थांबावं, काहीतरी चमत्कार घडवून दाखवावा असा तेंडुलकरसुद्धा १० धावा करून परत पावली निघाला. मागच्याही डावात तेवढ्याच धावा! प्रेक्षकांची मनं ह्या उमद्या खेळाडूच्या खेळण्यावर अक्षरशः ओवाळून टाकली जायची. तोच आता मान खाली घालून परत निघालेला.
ह्या वेळी लक्ष्मण वरच्या क्रमांकावर आला असल्यानं तो आधीपासून खेळपट्टीवर जमून होता. नव्यानं आलेला गांगुली त्याला साथ द्यायला लागला आणि तेंडुलकरचा धक्का जरा सावरल्यासारखा वाटला. ऑस्ट्रेलिया थांबायला तयार नाही आणि आपण त्यांच्या धारदार चढाईला पूर्ण शक्तीनिशी रोखत आहोत हे चित्र होतं. अखेर गांगुली ४८वर पडला आणि त्यानंतर आलेल्या द्रविडच्या साथीत खेळत लक्ष्मणनं एक चोरटी धाव घेऊन आपलं शतक पूर्ण केलं. आपल्या झुंजीला नवं बळ आलेलं. सामोरं जायचं असेल पराभवाला तर कडवी झुंज दिल्याशिवाय बॅट्स कशा टाकाव्यात? शक्य असेल ते सगळं करण्यासाठी पूर्ण झटायला हवं. झटूयात तर. एका वेळी एक चेंडू. फक्त पावलापुरता विचार. पुढचं पुढे. तिसरा दिवस ४ बाद २५२वर संपला.
तिसऱ्या दिवसानंतरची रात्र मात्र इतक्या लवकर संपणार नव्हती. ती रात्र खरोखर वैऱ्याची होती! आपल्या शेवटच्या दोन भक्कम फलंदाजांना पेचात टाकून बाहेरचा रस्ता दाखवायला उत्सुक विरोधी संघ आपले पाश उद्या आवळणार, सापळे लावणार, डावपेच बदलणार हे नक्की. मग आपली भिंत खरंच खचणार का? माहीत नाही. चौथा दिवस लवकरात लवकर उगवावा. खेळ सुरू व्हावा आणि जे व्हायचं असेल ते होऊन जावं. कारण वाट पाहाणं सहन होत नाही. रात्रीचा अंधार गडद आहे. त्याला प्रकाशाची एक किनार लाभावी आणि आणि सगळं उजळून जावं.
आधी होऊन गेलेल्या साऱ्या अप्रतिम भारतीय कसोटी खेळाडूंची पुण्याई पाठीशी बांधून व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आणि राहुल द्रविड खेळपट्टीवर उतरले. त्यांच्या वर्षानुवर्षांच्या मेहनतीचा कस पाहणारा हा दिवस होता. त्यांना आता दुसरं काही दिसणं शक्य नव्हतं. त्यांना फक्त दिसत होता समोर टाकला जाणारा एक चेंडू. त्याव्यतिरिक्त काहीही नाही. मॅग्रा, गिलेस्पी, कॅस्प्रोविच आणि फिरकीसम्राट वॉर्न आपल्या गोलंदाजीची सगळी यादगारी ओतायला लागले. आलटून पालटून वार होऊ लागले. त्यांचा विचार असा की, दोन जणांच्या अभेद्य तटबंदीला एकच भगदाड पाडलं की विजय आपला! नंतर येणारे बाकीचे लवकरात लवकर गिळता येतील. फक्त ह्यातला एक जण पडायला हवा. पण आपले शिलेदार लढत राहिले. शांत डोक्यानं आपल्यावर असलेली आघाडी कमी करून शून्यावर आणली. आता नवीन सुरुवात. जणू पहिल्या धावेपासून सुरुवात.
आईनस्टाईनच्या रिलेटीविटीच्या नियमानुसार दिवस पुढं सरकायला लागला. गिलेस्पीला एका पाठोपाठ चार चौके मारले गेले की वाटायचं वेळ पुढे पळतोय. ही काय दुपार होऊन आता काही वेळात संपतोय खेळ. एखादं पायचीतचं जोरदार अपील झालं की काळजाचा ठोका चुकायचा आणि पुढचा वेळ अजगरासारखा संथपणे पुढे जायला लागायचा. आता काय होणार? एखादा फटका मागे स्लिपमध्ये गेला की वाटायचं संपला खेळ! पण तसं काही झालं नाही. हा ३००चा टप्पा, हा ४००चा, असं करत गडी लढत राहिले. हरले नाहीत, थकले नाहीत, बसले नाहीत, फक्त लढत राहिले.
अखेरीस लक्ष्मणनं आपल्या २०० धावा पूर्ण केल्या आणि सगळं स्टेडीयम आनंदानं उसळलं. विरोधी संघाचे खेळाडू थक्क होऊन लक्ष्मणचं टाळ्या वाजवत अभिनंदन करत असताना त्यानं नव्यानं गार्ड घेतलाही होता. अजून काहीही संपलेलं नव्हतं. ते खेळत राहिले आणि काही वेळानंतर द्रविडनंही आपलं शतक साजरं केलं. ह्या दोघांचा खेळ म्हणजे एकाग्रता, जिद्द आणि तंत्राचा एक आदर्श नमुना होता. खेळानं त्यांच्याकडे फेकलेलं आव्हान त्यांनी पेललं होतं. ऑस्ट्रेलिया संघ इतका नामोहरम झाला होता की त्यांनी अॅडम गिलख्रिस्ट आणि कप्तान स्टीव वॉ असे दोघं सोडून तब्बल नऊ गोलंदाज वापरले. गेला बाजार स्लेटर आणि लँगरसुद्धा येऊन एकदोन षटकं टाकून गेले पण काही फरक पडला नाही. लक्ष्मणनं गावसकरांचा २३६चा विक्रम पार केला आणि तो शांतपणे त्याच्या वाटेनं पुढं निघाला. लक्ष्मण आणि द्रविड हे बहाद्दर चक्क दोन दिवस खेळत राहिले आणि आघाडी एकेका धावेनं वाढवत राहिले!
दिवस पाचवा आणि कुणीतरी येऊन वाचवा असा धावा ऑस्ट्रेलियाचा संघ करत होता कारण लक्ष्मण २८१वर, तर १६७वर द्रविड खेळत होता. धावसंख्या होती ४ बाद ६०८ आणि आपली आघाडी चांगली घसघशीत ३३४ची झाली होती. ऑस्ट्रेलियाच्या प्रार्थनेला फळ आलं आणि अखेर लक्ष्मण बाद झाला. थोड्याच वेळात १८० धावा करून द्रविडही धावबाद झाला आणि ऑस्ट्रेलियाच्या जखमांवर मीठ चोळत त्या आणखी खोलवर जाव्यात म्हणून कप्तान गांगुलीनं डाव चालू ठेवण्याचा निर्णय घेतला! शेवटी काही अजून बळी देऊन ३८३ धावांची आघाडी असताना त्यानं ७ बाद ६५७वर डाव घोषित केला. ऑस्ट्रेलियाचं लक्ष्य होतं ३८४.
एका दिवसाहून कमी वेळात हे लक्ष्य गाठता येणं अशक्य होतं. ऑस्ट्रेलियाला सामना अनिर्णित ठेवण्यासाठी प्रयत्न करता आला असता. पण हे करण्यासाठी त्यांची मानसिकता कणखर असणं गरजेचं होतं. आपण फॉलो ऑन दिल्यावर एवढं प्रचंड लक्ष्य समोर येईल ह्याची अजिबात कल्पना नसलेला तो संघ गांगरून गेलेला स्पष्ट दिसत होता. कसोटीच्या त्या अनभिषिक्त सम्राटाला एक हादरा बसला होता. पाय लटपटायला लागले होते. आता फक्त एक धक्का आणि विजय आपला!
हा धक्का द्यायला पुन्हा सरसावला हरभजन. पत्त्याचा बंगला कोसळावा तशी ऑस्ट्रेलियाची फलंदाजी धाडधाड कोसळली. हरभजननं सहा बळी घेतले आणि स्टेडीयम प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं! एकूण २१२ धावांत ऑस्ट्रेलिया संघाची फलंदाजी गुंडाळली गेली. एका साम्राज्याची सद्दी आपण आपल्या मातीत संपवली होती. बडा ख्यालातला हा द्रुतगतीचा टप्पा आपण एका उन्मनी अवस्थेत नेऊन संपवला होता. हा सामना कोट्यवधी क्रिकेट रसिक प्रेक्षकांच्या मनात कायमचा कोरला गेला होता.
वीस वर्षं उलटली तरी ह्या सामन्यातलं काव्य काही संपत नाही. आणि गंमतीची गोष्ट बघा की, फलंदाजी करून त्यातही द्रविडचे कष्ट संपले नाहीत. २ बाद १०६ अशी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या असताना नयन मोंगियाला हरभजनचा उसळलेला चेंडू नाकावर लागला आणि त्यानं मैदान सोडलं. द्रविडनं पॅड्स बांधले आणि दिवसभर पुन्हा राबला! ह्याच वेळी अजून एक काव्यात्म न्याय घडत होता. दोन्ही डावांत दहा दहा धावा केलेला तेंडुलकर एखाददुसरं षटक टाकायचं म्हणून आला आणि चक्क तीन महत्त्वाचे बळी टिपून गेला! ह्या सामन्यानंतर ऑस्ट्रेलिया अजूनच गर्तेत गेला आणि मालिकाही गमावून बसला.
क्रिकेट खेळाचा पाच दिवसांचा हा डाव जगण्याच्या एका मिनिएचर मॉडेलसारखा आहे. प्रचंड भावनिक आणि शारीरिक चढउतार, आनंद, दुःख, पुन्हा आनंद, अखेरचा प्रयत्न आणि शेवट गोड, पण फक्त एकासाठी! जगण्याचा सारा संघर्ष फक्त ह्या एका सामन्यात एकवटलेला आहे असं नेहमी वाटून जावं इतका हा सामना हिरिरीनं, तीव्रतेनं खेळला गेला. आणि ज्या आखाड्यात १७१ धावांत ऑस्ट्रेलियानं आपल्याला धोबीपछाड देत पहिल्या डावात आपटलं नेमक्या तेवढ्याच १७१ धावांनी आपण त्यांना हरवलं!
कसोटी क्रिकेटच्या इतिहासातला एक अविस्मरणीय असा हा बडा ख्याल!