ball

पुढचा सुपरस्टार (दैनिक ऐक्य, सातारा)

by

तो सगळ्यात पहिल्यांदा नजरेत भरला २०१८ च्या १९ वर्षांखालील विश्वचषकात. तो विश्वचषक आपण जिंकला होता. त्यावेळी सगळ्यात जास्त हवा झाली ती आपल्या कर्णधाराची, आणि ते साहजिकच होतं. पण संघाचा उपकर्णधार आणि प्रमुख फलंदाज म्हणून देखील त्याने छाप सोडली होती. ६ सामन्यात १२४ च्या सरासरीने ३७२ धावा, त्यात १ शतक आणि ३ अर्धशतके. शुभमन गिलने त्या स्पर्धेवर आपली छाप सोडली होती. पुढे रणजी ट्रॉफी, भारत ‘अ’ अश्या पायऱ्या चढत तो भारतीय संघात दाखल झाला. आणि आता तो ज्या प्रकारे खेळतो आहे, ज्या पद्धतीने बॅटिंग करतो आहे ते पाहता शुभमन गिल हा ‘लंबी रेसका घोडा’ आहे असं आपण निश्चित म्हणू शकतो. तो केवळ २३ वर्षांचा आहे, पण आज त्याच्याकडे भारतीय फलंदाजीचं भविष्य म्हणून बघितलं जात आहे. खेळाच्या तीनही प्रकारात तो चमकतोय. गेल्या दोन महिन्यात पट्ठ्याने तीनही प्रकारात शतके ठोकली आहेत. १४ डिसेंबर ला बांगलादेश विरुद्ध कसोटीमध्ये ११०, १५ जानेवारीला श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात ११६, पाठोपाठ न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय मालिकेत २ शतकं – त्यात एक द्विशतक, आणि नुकत्याच झालेल्या टी-२० मालिकेत परत एक खणखणीत शतक. शुभमन गिलचे ग्रह जोरात आहेत. हे बोलणं कदाचित खूप धाडसाचे असेल, पण शुभमन हा विराट नंतरचा भारतीय क्रिकेट मधला सर्वात मोठा स्टार होऊ शकतो. 


शुभमन एका टिपिकल पंजाबी घरातला. जलालाबाद जवळच्या एका खेड्यात वाढलेला. त्याच्या वडिलांना क्रिकेटपटू व्हायचं होतं, पण नशिबाने साथ दिली नाही. ते आपल्या गावात शेती करत राहिले. त्यांनी आपल्या मुलामध्ये आपली स्वप्नं बघितली, आणि ती पूर्ण करण्याचा ध्यास घेतला. स्वतःच्या शेतात एक छोटंसं मैदान तयार करून शुभमनला तिथेच क्रिकेटचे धडे द्यायला सुरुवात केली. योग्य वेळी ते त्याच्या क्रिकेटसाठी मोहालीला आले, तिथे पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या छताखाली त्यांनी मुलाला भरती केलं आणि तिथून प्रवास सुरु झाला शुभमनच्या स्वप्नांचा. बापाचा ध्यास त्या कोवळ्या वयातल्या पोरालाही दिसत होता. त्यानेही ध्यास घेतला होता क्रिकेटपटू बनायचा. पंजाबच्या १४ वर्षांखालील, १६ वर्षांखालील संघात उत्तम कामगिरी करत करत तो पुढील पायऱ्या चढत गेला. आज शुभमनकडे भारताचं भविष्य म्हणून बघितलं जात असेल तर त्याचं खूप मोठं श्रेय त्याच्या वडिलांना – लखविंदर सिंग यांना जातं. एका बापाने आपल्या पोरासाठी केलेले कष्ट, बघितलेली स्वप्नं आज शुभमनच्या बॅट मधून चमकताहेत.   

मोठ्या स्तरावर शुभमन पहिल्यांदा चमकला त्या प्रसिद्ध ब्रिस्बेन कसोटी सामन्यात. संघात मोठे खेळाडू नसताना अजिंक्य राहणेच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेटच्या चिल्ल्यापिल्ल्यांनी चमत्कार घडवला. त्यात एक प्रमुख नाव होतं ते म्हणजे शुभमन गिल. तो पहिल्या डावात लवकर बाद झाला असला तरी दुसऱ्या डावात ९१ धावांची चमकदार खेळी केली. त्या पायावरच आपली विजयाची इमारत बांधली गेली. शतक झळकवण्यात तो कमनशिबी ठरला खरा, पण कदाचित ती खेळी त्याच्या आतापर्यंतच्या प्रवासातील सर्वात मोठी आणि महत्वाची खेळी म्हटली पाहिजे. त्याने कसोटी स्तरावर स्वतःला सिद्ध केलं होतं. हळूहळू भारतीय संघातली सलामीवीराची जागा रिकामी दिसत होती, अनेक खेळाडू तिथे पोहोचून देखील कमी पडत होते, काही दुखापत ग्रस्त होते. हीच संधी साधून शुभमनने स्वतःला त्या जागी सिद्ध केलं. संघातल्या एका सलामीवीराची जागा आता पक्की झाली होती. 
१५ जानेवारी २०२३ ते आजपर्यंत, फक्त २०-२२ दिवसात शुभमनने क्रिकेटविश्व हलवून सोडलं आहे. आधी श्रीलंकेविरुद्ध एक कडक शतक. नंतर न्यूझीलंड विरुद्ध झळकावलेलं द्विशतक. त्याची ती द्विशतकी खेळी कदाचित पुढील अनेक दिवस चर्चिली जाईल. हैदराबादच्या त्या मैदानावर केवळ १४९ चेंडूत २०८ धावा, त्यात १९ चौकार आणि ९ उत्तुंग षटकार. त्याची ती खेळी अविश्वसनीय होती. शुभमनने स्वतःला सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्माच्या पंगतीत नेऊन ठेवलं होतं. पाठोपाठ एकदिवसीय सामन्यात अजून एक शतक आणि नंतर टी-२० सामन्यात देखील शतक. शुभमनची बॅट आता खऱ्या अर्थाने बोलू लागली आहे. २०२३ चा आपला क्रिकेटचा भरगच्च मोसम आहे, त्यावेळी खऱ्या अर्थाने शुभमनच्या खेळीची भारतीय संघाला गरज असेल. येणारी ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका, त्यानंतर (कदाचित) टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना आणि वर्षाच्या शेवटी असणारा एकदिवसीय क्रिकेटचा विश्वचषक. पुढे येणारी आव्हाने मोठी आहेत, आणि म्हणूनच शुभमन गिल फॉर्म मध्ये येणं हे भारतीय क्रिकेटसाठी खूप महत्वाचं आहे.   

भारतीय क्रिकेटमध्ये कायमच एक सुपरस्टार असतो. पूर्वी भारतीय संघात गावसकर आणि कपिल सारखे स्टार्स होते, नंतर बऱ्याच कालावधीसाठी ती जागा सचिन कडे होती. सचिन नंतर धोनी, आणि नंतर खऱ्या अर्थाने स्टार्स आहेत रोहित आणि विराट. आता पुढे कोण हा प्रश्न भारतीय क्रिकेट रसिकांना कायमच सतावत असतो. शुभमन असाच खेळत राहिला तर लवकरच शुभमन गिल भारतीय क्रिकेट मधला पुढचा सुपर स्टार होऊ शकतो. कॉर्पोरेट मध्ये बरेचदा SWOT Analysis केलं जातं. त्यातला ‘O’ म्हणजे Opportunities – पुढे येणाऱ्या संधी. शुभमनच्या समोर असलेल्या संधी मोठ्या आहेत, महत्वाच्या आहेत. येणारी ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका महत्वाची असेल. कदाचित पुढील काही महिन्यात आपण ऑस्ट्रेलिया विरुद्ध ५ कसोटी सामने खेळणार आहोत. ते सामने शुभमन साठी एक संधी आहे. आणि अर्थातच येणारा विश्वचषक आहेच. या सगळ्याच संधीवर आरूढ होण्यासाठी शुभमन आणि त्याची बॅट सज्ज असेलच. या संधींवर विजय मिळवला तर नक्कीच एक मोठा सुपर स्टार म्हणून शुभमन गिल आपल्या समोर येऊ शकतो. त्याची बॅट तळपत राहो आणि भारतीय क्रिकेटला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जावो हीच इच्छा आहे. 

– कौस्तुभ चाटे  

To know more about Crickatha