ball

भारतीय फलंदाजी बहरणार कधी? 

गेल्या काही दिवसात, मुख्यतः टी-२० विश्वचषकानंतर कसोटी मालिकांना चांगलीच मागणी आली होती. अर्थात डिसेंबर-जानेवारी हे महिने दक्षिण गोलार्धात (ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका) उन्हाळा असल्यामुळे क्रिकेटचे सामने घडत असतात. आणि गम्मत म्हणजे ह्याच कालावधीत भारतीय उपखंडात हिवाळा असल्याने इथे देखील क्रिकेटचे सामने खेळले जातात. दक्षिण गोलार्धात क्रिकेट हा खेळ उन्हाळी आहे भारतीय उपखंडात हिवाळी (खरं तर आपण बारा महिने तेरा त्रिकाळ क्रिकेट खेळत असतो). २०२२ च्या शेवटी ३-४ खूप छान आणि तितक्याच महत्वाच्या कसोटी मालिका खेळल्या गेल्या. बहुतेक मालिका टेस्ट चॅम्पियनशीप साठी खेळल्या जात होत्या. ऑस्ट्रेलिया मध्ये खेळली गेलेली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका, पाकिस्तान आपल्याच देशात इंग्लंड आणि न्यूझीलंड विरुद्ध लढले,आणि बांगलादेश मध्ये झालेली भारत विरुद्ध बांगलादेश अशी कसोटी मालिका. ह्या चार मालिकांमध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला अगदी लीलया हरवलं. आता आफ्रिकेचा संघ पूर्वीसारखा राहिला नाहीये. दक्षिण आफ्रिका ह्या संघाचं पूर्वी एक दडपण येत असे, अतिशय उत्तम खेळाडू आपण ह्या संघातून खेळताना बघितले आहेत. परंतु आताशा त्या संघाचा कुठेच प्रभाव दिसत नाही. कारणे काहीही असोत, पण आफ्रिकेचा संघ आता बलवान वाटत नाही. तिकडे इंग्लंडने पाकिस्तानवर अगदी आरामात ३-० अशी मात केली. हा मात्र इंग्लंडचा मोठा आणि महत्वाचा विजय होता. पाकिस्तानमध्ये नुकतेच क्रिकेट परत सुरु झाले आहे, तिकडे जाऊन त्यांना इतक्या सहज हरवणे हे इंग्लंड साठी नक्कीच आनंददायक आहे. इंग्लंड मालिकेनंतर न्यूझीलंड देखील पाकिस्तानच्या दौऱ्यावर होता. त्यांच्या दोन्ही कसोटी मधला शेवटचा सामना खरे तर न्यूझीलंडनेच जिंकायला हवा होता, पण नशिबाने साथ दिली नाही. इकडे आपण जरी बांगलादेशला दोन्ही कसोटींमध्ये हरवलं असलं तरीही, दुसरा कसोटी सामना जिंकताना आपल्या नाकी नऊ आले होते. 


इंग्लंडच्या विजयात खऱ्या अर्थाने चमकला तो त्यांचा तरुण फलंदाज हॅरी ब्रूक. त्याने तीन कसोटीत ९३.६० च्या सरासरीने ४६८ धावा केल्या, विशेष म्हणजे त्याने तीनही कसोटींमध्ये शतक केले. ह्या मालिकेत इंग्लंड आणि पाकिस्तान दोन्ही संघांनी मिळून ९ शतके ठोकली. पाकिस्तान-न्यूझीलंड मालिकेत देखील ७ शतके बघायला मिळाली. तिकडे ऑस्ट्रेलिया-आफ्रिका मालिकेतील ब्रिस्बेनचा कसोटी सामना केवळ दोन दिवसात संपला. त्या सामन्यात गोलंदाजांची चलती होती. पण इतर दोन सामन्यात फलंदाजांनी देखील आपले हात वाहत्या गंगेत धुवून घेतले. 

भारत आणि बांगलादेश मालिकेत मात्र केवळ २ शतकांवर समाधान मानावे लागले. पहिल्या कसोटी सामन्यात शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा ह्या दोघांनीही शतक ठोकले, तर दुसऱ्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतने केलेल्या ९३ धावा दोन्ही डावातील सर्वोच्च धावसंख्या ठरली. ह्या मालिकेत फलंदाजीत पुजारा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत आणि शुभमन गिल ह्यांनी चमक दाखवली. तर दुसरी कसोटी केवळ अय्यर आणि अश्विनच्या चांगल्या खेळीमुळे आपण जिंकू शकलो. ह्या सर्वात आपल्या प्रमुख खेळाडूंनी न केलेल्या कामगिरीचीच सगळ्यात जास्त चर्चा झाली असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. ह्या मालिकेत आपला कप्तान रोहित शर्मा दुखापतीमुळे खेळू शकला नाही. रोहित आणि त्याला होणाऱ्या दुखापती हा एक परिसंवादाचाच विषय. त्याच्या अनुपस्थितीत राहुलने संघाचे नेतृत्व केले. आता हीच गोष्ट खरे म्हणजे हास्यास्पद आणि तितकीच वेदना दायक आहे. के एल राहुलचे संघातील स्थान सध्या इतके डळमळीत आहे की त्याची तुलना फक्त पडणाऱ्या शेअर मार्केटशीच होऊ शकते. तरी देखील तो संघाची धुरा त्या मालिकेत वाहत होता. त्या दोन्ही सामन्यात त्याची कामगिरी तशी यथा तथाच होती. जी गत राहुलची तीच विराटची. आपला प्रमुख खेळाडू बांगलादेश मालिकेत प्रचंड चाचपडत खेळत होता. बांगलादेशच्या तुलनेने हलक्या गोलंदाजांसमोर त्याने अक्षरशः नांगी टाकली. गेली अडीच तीन वर्षे तो फॉर्मसाठी झगडतो आहे. आता बांगलादेश मालिकेनंतर झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याचा फॉर्म परत आला आहे हे आपल्यासाठी महत्वाचे आहे. ऋषभ पंत हा वेगळाच खेळाडू आहे. त्याचा खेळ हाणामारीचा आहे खरा, पण (नकळत होतेच तुलना) सेहवागच्या तुलनेत तो कमीच वाटतो. तो कसोटी सामन्यात खेळताना वाटतं की हा एकदिवसीय सामन्याचा खेळाडू आहे, आणि छोट्या फॉरमॅटमध्ये तो कसोटीचा खेळाडू वाटतो. दुर्दैवाने ह्या मालिकेनंतर त्याला झालेल्या जीवघेण्या अपघातामुळे त्याची पुढील क्रिकेट कारकीर्द धोक्यात आहे. तो लवकरात लवकर बरा व्हावा अशीच क्रिकेट रसिकांची प्रार्थना आहे.

आता ह्या नंतर आपल्या संघाची खऱ्या अर्थाने कसोटी आहे. पुढील महिन्यापासून आपली ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका सुरु होईल. ही मालिका जिंकणे हे दोन्ही संघांसाठी आव्हान असणार आहे. ह्या दोन्ही संघांमधील कसोटी मालिका किती चुरशीच्या होतात ह्याची आपल्याला कल्पना आहेच. त्यात भर म्हणजे ह्या मालिकेनंतरच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत कोणते संघ असतील ह्याचा निर्णय होईल. आणि विशेष म्हणजे भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ त्या अंतिम सामन्यात खेळताना दिसू शकतात. ह्या मालिकेत भारतीय फलंदाजांच्या कामगिरीवर सगळ्यांचं लक्ष असणार आहे. विराट, रोहित, पुजारा, राहुल, गिल, श्रेयस हे सगळेच फलंदाज त्यांच्या ठिकाणी चांगले आहेत, पण मालिकेत कोण चांगली कामगिरी करून भारताला जिंकवून देतो ते बघणे महत्वाचे असेल. ही मालिका खऱ्या अर्थाने ‘टर्निंग पॉईंट’ ठरणार आहे. ह्या मालिकेत आपल्या प्रमुख फलंदाजांनी चांगली कामगिरी केली नाही तर त्यांची कारकीर्द कदाचित धोक्यात येऊ शकते. आपली बेंच स्ट्रेंग्थ भक्कम आहे. रणजी ट्रॉफी आणि भारत ‘अ’ साठी उत्तम कामगिरी केलेले अनेक फलंदाज त्यांना संधी मिळायची वाट बघत आहेत. 

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिका म्हटली की आपल्याला लक्ष्मण आणि द्रविडची ती खेळी आठवते. सेहवागचा धमाका आणि सचिनची संयत खेळी आठवते. अजिंक्य, विराटच्या त्या अप्रतिम खेळी, आणि पुजारा नावाचा ‘रॉक ऑफ जिब्राल्टर’ आठवतो. ह्यातले काही खेळाडू आजही संघात असले तरी आता खऱ्या अर्थाने गरज आहे ते म्हणजे ह्या प्रमुख खेळाडूंनी भार स्वतःवर घेण्याची आणि त्या कामगिरीवर विजय मिळवून देण्याची. पुन्हा एकदा त्यांच्या बॅटमधून धावा निघोत आणि क्रिकेट रसिकांना त्या फलंदाजीचा आनंद घेता येवो हेच क्रिकेट देवाकडे मागणे असेल. कसोटी क्रिकेटमध्ये संघाला दोन डाव मिळतात. आपल्या खेळाडूंचा पहिला डाव पार पडला आहे, आता प्रतीक्षा आहे ती दुसऱ्या डावात चांगली कामगिरी करण्याची. हा दुसरा डाव त्यांच्यासाठी लाभदायी ठरो. 

– कौस्तुभ चाटे     

To know more about Crickatha